मध्यरात्री प्रशासनिक अधिकारी आणि चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा चालकांचा थरार!
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हुलकावणी देणाऱ्या हायवांना शिताफिने पकडले
तहसीलदार शेळके, आरटीओ माने यांचा ही थरारक कारवाईत मोलाचा सहभाग
बीड (एस.एम.न्युज़) - मंगळवार दिनांक २६ रोजी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मध्यरात्रीच्या सुमारास गेवराई कडून बीडकडे येत असताना त्यांना वाळूने भरलेल्या दोन हायवा दिसल्या. जिल्हाधिकारी यांनी या हायवा थांबविण्याच्या सूचना दिल्या असता या हायवाच्या चालकांनी हुलकावणी देत वेगाने पळविल्या. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सुद्धा त्यांचा पाठलाग करत पाडळसिंगी टोल नाका येथे त्यांना गाठले. यावेळी त्यांनी योगेश तुकाराम गीते, राहणार अंदरुड, जिल्हा धाराशिव यांची हायवा क्रमांक एम.एच. ४८ सी.क्यू. २७८९ तसेच शेख उमर शेख गफ्फार, रा. खासबाग देवी, बीड याची हायवा क्रमांक एम.एच.१२ क्यू.डब्ल्यू ९५९७ या हायवा पकडल्या. अत्यंत सिनेस्टाईल पद्धतीने केलेल्या या कारवाई दरम्यान पाठलाग करता करता जिल्हाधिकाऱ्यांनी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांना फोन करून तात्काळ सदरील वाहने कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये. अशा सूचना देत तात्काळ बोलावले. यावेळी गेवराई पोलीस ठाणेचे गस्तीवर असलेले अधिकारी, टोल नाक्यावरील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून ठेवले. यावेळी तात्काळ बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी दादा शेळके, तलाठी कृष्णा रत्नपारखी घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाहने थांबविल्यानंतर त्यात किती वाळू आहे याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना दोन्ही वाहनात अंदाजे प्रत्येकी सहा ब्रास वाळू असल्याचे दिसून आले. वाहनांच्या चालकांना त्यांनी विचारणा केली की, सदरची वाळू वाहतूक करण्यासाठी तुमच्याकडे परवाना आहे काय, यावर चालकांनी आमच्याकडे असा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी सदरची वाहने बीड येथे घेऊन जाण्याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सुचित केले. मध्यरात्री सुमारे ०३:०० वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सदरच्या वाहनांचा रितसर पंचनामा करून घेतला. त्यानंतर सदरची वाहने पुढील कारवाईसाठी पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस संरक्षणात घेऊन जाण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी सुद्धा तातडीने कारवाई करत त्यांचे वायुवेग पथक या ठिकाणी पाठविले. या पथकाने सदरच्या वाहनांची तपासणी केली. वायुवेग पथकाच्या असे लक्षात आले की, सदरची वाहने हे रस्ता सुरक्षा व वाहन वापरकर्त्यांच्या सुरक्षेस धोका उत्पन्न करत आहेत. तसेच क्षमतेपेक्षा अधिकचा भार वहन केल्यामुळे त्यांनी तसा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सादर केला. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांनी तात्काळ या वाहनांची नोंदणी निलंबित का करण्यात येऊ नये अशा आशयाच्या नोटिसा दिनांक २७ नोव्हेंबर बुधवारी रोजी वाहन चालकांना बजावल्या. तत्पूर्वी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी दादा शेळके, तलाठी कृष्णा रत्नपारखी यांच्या पथकाने नामलगाव जवळ धुळे-सोलापूर हायवेवर वसीम इनामदार याच्या मालकीचा हायवा क्रमांक एम.एच. ०१ सी.व्ही. ८९११ हा अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करीत असताना पकडला. या हायवातुन सुमारे पाच ब्रास वाळू अनधिकृतरित्या वाहतूक करत असल्याचे दिसून आल्यामुळे रीतसर पंचनामा करून हायवा शहर पोलीस ठाणे बीड येथे लावण्यात आला. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शिताफिने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यामुळे आणि त्यावर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई तसेच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पथकाने केलेली कारवाई अशा तिहेरी स्वरूपाच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अशाच प्रकारच्या कारवाया जिल्हाभर सुरू ठेवण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सुचित केलेले आहे. कोणीही अनधिकृतरित्या गौण खनिजाची वाहतूक करू नये तसेच नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारची गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याबाबत संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांना तात्काळ कळवावे असे बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची हयगय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. अवैधरित्या गौण खनिजाची म्हणजेच वाळू, मुरूम यांची वाहतूक करणारी वाहने दिसल्यास अथवा साठे आढळून आल्यास त्याची माहिती संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी, पोलीस पाटील यांना तात्काळ देऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
==================================
*आमच्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा