Breaking News

मुद्रांक बाजारात ५०० च्या बॉण्डचा भयंकर तुटवडा; १०० च्या बॉण्डचा आलाय ऊत! हे शासनाचे सुशासन की सुडासन?


मुद्रांक बाजारात ५०० च्या बॉण्डचा भयंकर तुटवडा; १०० च्या बॉण्डचा आलाय ऊत!

शासन निर्णयामुळे १ ऐवजी घ्यावे लागताहेत ५ बॉण्ड

५०० चे बॉण्ड मुद्रित केलेले नाही तर मग लागू कशाला केले?

हे शासनाचे सुशासन की सुडासन?

बीड (एस.एम.न्युज़) - बीड शहरात ५०० रुपये मूल्याच्या बॉण्डचा भयंकर मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून शासन-प्रशासन दरबारी सरकारी कामांसाठी लागणाऱ्या ५०० च्या बॉण्ड ऐवजी नाविलाजाने लोकांना १०० रुपयाचे ५ बॉण्ड विकत घ्यावे लागत आहे. त्यापैकी फक्त एका बॉण्डचा वापर लेखी कामासाठी होत असून बाकीचे ४ कोरे करकरीत बॉण्ड कागदपत्रांसोबत विनाकारण जोडावे लागत आहेत. यामुळे लेखी काम एकाच बॉण्डवर होत असून सुद्धा सोबत अजून जास्तीचे व बिनकामाचे ४ बॉण्ड जोडावे लागत असल्याने लोकांमध्ये शासन-प्रशासनाविरुद्ध प्रचंड चीड व संताप व्यक्त होऊ लागला असून जर ५०० चे बॉण्ड पाहिजे तेवढ्या संख्येत मुद्रित केलेले नाही तर मग ते सक्तीने लागू कशाला केले? हे शासनाचे सुशासन आहे की सुडासन? असे उद्विग्न प्रश्नही या अवस्थेमुळे उपस्थित होऊ लागले आहे.

जेव्हा १०० रुपयांच्या एका बॉण्डवर काम व्हायचे, तेव्हा लोकांना मुद्रांक विक्रेत्यांकडे १ बॉण्ड लवकर मिळायचा नाही. मिळाला तर शासन नियमाऐवजी जास्तीची रक्कम देऊन तेव्हा तो लोकांना विकत घ्यावा लागायचा. आता एकाच माणसाला तेच बॉण्ड एका कामासाठी विनासायास पाच-पाच मिळू लागलेत. एवढ्या मोठ्या संख्येने आता १०० रुपयांच्या बॉण्ड चा उत कसा आणि कुठून आला? जेव्हा हे बॉण्ड कामासाठी लागायचे तेव्हा एका बॉण्ड करिता दहा मुद्रांक विक्रेत्यांकडे हेलपाटे मारावे लागायचे. आता मात्र सरकारने १०० रुपयांचे बॉण्ड बंद करून कोणत्याही कामासाठी ५०० रुपयांचे बॉण्ड लागेल, हा निर्णय करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने बहुतेक दाबून ठेवलेल्या १०० रुपयांच्या बॉण्ड चा उत मुद्रांक बाजारात आला आहे. आता कोणत्याही कामासाठी जेव्हा ५०० रुपयांचा बॉण्ड मुद्रित करून जोडावे लागू लागले तेव्हा ५०० ऐवजी १०० रुपयांचे ५ बॉण्ड जोडून द्यावे लागत आहेत. यामुळे शासन-प्रशासनासह लोकांना मुद्रांक विक्रेत्यांचा सुद्धा प्रचंड राग येऊ लागला आहे. कारण जेव्हा १०० रुपयांच्या बॉण्डला किंमत होती, तेव्हा ते सहजासहजी मिळायचे नाही आणि आता त्यांची किंमत शासनाने शून्य करून टाकल्याने ते भरमसाठ संख्येने मिळू लागले आहेत. जिथे एका कामासाठी एक बॉण्ड लागायचा तिथे आता एका कामासाठी एक दोन नव्हे तर पाच बॉण्ड म्हणजेच पाचपट अगदी चुटकीसरशी मिळू लागले आहेत. बीड शहरातील न्यायालय, तहसील कार्यालय आणि रजिस्ट्री ऑफिस मधील मुद्रांक विक्रेत्याकडे बॉण्ड साठी ग्राहक गेला की, एकेकाला प्रत्येक बॉण्ड विक्रेता कुठलेही आढेवेढे न घेता १०० रुपये मूल्याचे पाच-पाच बॉण्ड ते ही अगदी सहजपणे देऊ लागला आहे. यामुळे लोकांकडून शासन-प्रशासनासह मुद्रांक विक्रेत्यांवर ही राग आणि रोष व्यक्त होत आहे.

*मुद्रित केलेले नाही तर लागू कशाला केले?* 

शासनाने नुकतेच  १०० ऐवजी ५०० रुपयांचा बॉण्ड कुठल्याही शासकीय-प्रशासकीय कामासाठी यापुढे जोडावा लागणार, असा निर्णय तर घेतला मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर ज्या संख्येत हे ५०० रुपयांचे बॉण्ड मुद्रांक बाजारात उपलब्ध करून द्यायला हवे, त्या संख्येत उपलब्ध करून दिले नाही. म्हणून आता लोकांसह मुद्रांक विक्रेते सुद्धा जेरीस आले आहे. कारण त्यांनाही बॉण्ड विकताना बॉण्ड विकत घेणाऱ्याची जी माहिती थोडक्यात एका बॉण्डवर लिहून द्यायचे असते. तीच माहिती आता त्यांना पाच-पाच बॉण्डवर लिहून द्यावी लागत आहे. यामुळे ५०० रुपयाचे बॉण्ड हवे त्या संख्येत मुद्रित केलेले नाही तर लागू कशाला केले? असा प्रश्न करून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

*१०० रुपयांचे एवढे बॉण्ड आले कुठून? कसे? कधी?*

५०० रुपयाच्या बॉण्ड चा निर्णय होण्याअगोदर जिथे मुद्रांक बाजारात १०० रुपयाचा एक बॉण्ड लवकर मिळत नसे किंवा त्यासाठी लोकांना मुद्रांक विक्रेत्याच्या मनमानी प्रमाणे जास्तीची रक्कम देऊन तो घ्यावा लागत असे. आता मात्र शासन निर्णयानुसार १०० रुपयाचा बॉण्ड एकटा वापरू शकत नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने एका ऐवजी एकाच कामासाठी तेच बॉण्ड आता चक्क पाच-पाच अगदी सहज मिळत आहेत. यामुळे फक्त बीड शहरापुरता जरी विचार केला तर शहरात दररोज हजारो बॉण्ड ची विक्री होते. समजा दिवसभरात १००० बॉण्ड जिथे लागत होते, तिथे आता एका ऐवजी पाच लागत असल्याने एका हजारा ऐवजी ५००० बॉण्ड ची विक्री सर्रासपणे होऊ लागली असे समजण्यास हरकत नाही. अशा प्रकारे दररोज खप होणारे १०० रुपयांचे हजारो बॉण्ड एवढ्या मोठ्या संख्येने आलेत कुठून? कधी? आणि कसे? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

*जोपर्यंत १०० चे बॉण्ड आहे तोपर्यंत .......*

एकंदरीत मुद्रांक बाजारातील ही स्थिती पाहता जोपर्यंत ५०० रुपयाचे बॉण्ड मुबलक प्रमाणात मुद्रांक बाजारात येत नाहीत, तोपर्यंत १०० रुपयाचे एका कामासाठी आज पाच-पाच ऐवजी एकच जोडावे असे आदेश शासनाने लवकरात लवकर काढावेत. जेणेकरून एकाच कामासाठी विनाकारण पाच-पाच बॉण्ड घेण्याची वेळ लोकांवर येणार नाही.

*आहे की नाही गंमत पहा?*

शासनाने लागू केल्याप्रमाणे मुद्रांक बाजारात ५०० रुपये किमतीचे बॉण्ड नाहीत. यामुळे भरमसाठ आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या १०० रुपयाच्या बॉण्डवर आता "५०० रु.ची पूर्तता १०० च्या ५ ने केली" असे लिहिलेले एक स्टॅम्प मारून मुद्रांक विक्रेत्यांकडून लोकांना बॉण्डची विक्री केली जात आहे. म्हणजे किती गंमत आहे बघा, आहे की नाही?

*जिल्हा प्रशासनानेही शासनाकडे वस्तुस्थिती मांडावी*

मुद्रांक बाजारातील ही अवस्था लोकांना मानसिक संताप देणारी व चीड निर्माण करणारी आहे. हे लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील जबाबदार अधिकारी आणि पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून आपापल्या मार्फत शासनाकडे ही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. अन्यथा 'आले सरकारच्या मना, तिथे कुणाचे चालेना' अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.

*लोकप्रतिनिधींनी ही लक्ष द्यावे*

काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक होऊन बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून बजरंग सोनवणे हे निवडून आले आहेत तर काही दिवसांपूर्वी विधानसभेचा निकाल लागून बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर हे निवडून आले आहेत. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी मुद्रांक बाजारातील या संतापजनक प्रकरणात लक्ष घालावे. असेही या अनुषंगाने बोलले जात आहे.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत