Breaking News

इथे ओशाळला मानवता धर्म! - रूपाली देशपांडे


 इथे ओशाळला मानवता धर्म! - रूपाली देशपांडे

हॉस्पिटल च्या वारेमाप वाढत्या बिलाकडे कोणाचे लक्ष आहे का? असेल तर ते नियंत्रणात कधी आणायचे? अगणित माणसे मेल्यावर का?
बंद पडलेल्या पतसंस्था,बँका, यात डॉक्टर लोकांचे करोडो रुपये जे बुडाले, तो बुडलेला पैसा आला कोठून?

तपासनी फिस पासून ते पेशंट चे एखादे ऑपरेशन होऊन घरी येईपर्यंत येणारे हॉस्पिटल च्या बिलाचा आकडा पेशंट च्या नातेवाईकचे कंबरडे मोडूस्तर जीव जायची वेळ येते. हॉस्पिटल म्हटले की पैसा लागणारच. पण इतके महागडे ऑपरेशन, महागड्या शंभर तपासण्या, 50 वेळेस एक्सरे आणि हजारो रुपयाचे मेडिसीन. एखादेच डॉक्टर क्वचितच भेटतील जे आवश्यक तेवढेच सांगतील. ओरबाडून खाणारे मात्र पायलीचे पन्नास मिळतील. बरं एवढे पैसे घेऊनही हॉस्पिटल मधील वागणूक अतिशय कनिष्ठ दर्जाची असते. अगदी नाव लिहून घेणाऱ्या पासून सलाईन लावणाऱ्या पर्यंत व्यवस्थित बोलत नाहीत. वयस्कर व्यक्ती पाहूनही यांच्या अंगी नम्रता नसते. उलट हेच म्हणतात आम्हाला रोजचंच काम. असे म्हणावे वाटते की, आम्ही तर रोज येत नाही ना तुमच्याकडे जरा तर वयाचे भान ठेवा.
आजही आपण डॉक्टरकडे खूप आदराने पाहतो. देवा नंतर डॉक्टरच आहे असे म्हणतो.
*आपण जन्मदाता देवाला म्हणतो तर तारणहर्ता डॉक्टर ला समजतो*
*आता हा डॉक्टर मारनकर्ता झाला आहे.*
हो आता असेच झाले आहे. पेशन्टला जीव असेपर्यंत वारेमाप बिल करून आणि वाटेल तशी ट्रीटमेंट देऊन अर्धमेलं करायचं अन पेशंट मेला तरी त्याच्या टाळू वरचं लोणी खायला तयारच. अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त भ्रष्ट झालेली यंत्रणा म्हणजे हॉस्पिटल्स. पेशन्ट आणि पैसा म्हणजे त्यांच्या साठी खेळच. अगदी खेळचं म्हणावे लागेल. पेशन्ट वाचला तरी अफाट पैसे आणि पेशंट मेला तरी पैसे वारेमाप. वाटेल तसे पेशंटच्या आयुष्याशी खेळायचे. बरं हे लोक इथेच थांबत नाहीत, यांना दाही दिशा परत खायचे असते. प्रत्येक गोष्टीतून पैसे घेतात. मेडिकल वाल्यांशी यांची हातमिळवणी असतेच, तर पॅथॅलाजीवाल्यांबरोबर यांची कटींग वाली भाषा असते. एक्सरे, एम.आर.आय. अजून काय नी काय नानाविध तपासण्या या सर्वातून यांची कमाई अफलातून असतेच. हॉस्पिटल्स आता सामान्य माणसाच्या आवक्या बाहेरील गोष्ट झाली आहेत. किती ओरबडाल रे पेशंट ला? थोडीशी तरी बाळगा. आपण या समाजाचे खूप मोठे घटक आहात हे लक्षात घ्या. तुम्ही डॉक्टर झाल्यावर जी शपत घेतात ती तर आजकाल फॅशन म्हणून घेता. ती शपथ मनावर घेऊन किंवा ती शपथ एक जबाबदारी आहे असे समजणेच डॉक्टर लोकं विसरून गेले आहेत. त्या शपथेसाठी इमान जागा करा. प्रत्येक डॉक्टर म्हणजे कोणताही जनरल फिजियेशन असो, स्त्रीरोगाचे डॉक्टर, बालरोगतज्ञ, त्वचा रोग तज्ञ अशी अजून डॉक्टर लोकांची भली मोठी लिस्ट आहे. भयानक म्हणजे स्त्रीरोग तज्ञ  आणि हाडाचे डॉक्टर तसेच दातांचे डॉक्टर. कमालीचे मायाजाळ साठवून ठेवण्यात पटाईत.
जन्म आणि मृत्यू अटळ आहे, म्हणतात तर लहान बाळ जन्मला घालायच्या आधीच यांची जय्यत तयारी असते. पेशन्ट ची डिलेव्हरी नॉर्मल करायची की सिजरिंग हे सगळे स्त्रीरोग तज्ञंच ठरवतात.  जन्म अटळ असल्यामुळे यांचे पैसे हि तेवढेच अटळ आहेत.
हाडाचे डॉक्टर म्हणजे एनी टाईम मनी असणारे डॉक्टर. कारण म्हातारे माणसे पडायचे काही थांबत नाहीत. तरुण मंडळी सुद्धा अपघात, लचकणे, मुरगळणे हे चालायचेच. त्यामुळे या पेशन्टची अफाट गर्दी कमी नाही. त्यामुळे यांच्या पैशाला हि कमी नाही.
सर्वात भयानक म्हणजे दातांचे डॉक्टर. एक दात आता एक लाखात झाला. असा विचार येतोय की, यांना कसे जमते हे सर्व? हे सर्व सेवा नसून अगदी बिजनेसच करून टाकला आहे.
डॉक्टर की पाहून अस म्हणावं वाटत की डॉक्टर की हा पेशा आहे, धंदा नाही. दात एवढा महाग ऐकूनच ऐकूनच दातखिळी बसायची वेळ येते.
खरंतर डॉक्टर लाईन मध्ये खूप बोलण्यासारखे आहे आणि सामान्य माणसाला वाटतं इतके सोज्वळ राहिलेले नाही. आतमध्ये  प्रचंड मोठी भ्रष्ट यंत्रणा आहे. यांच्यात टक्के, कमिशन, कटींग असे भरपूर आहे. मला एवढेच म्हणायचे आहे. डॉक्टर लोकांनो, आम्ही सर्वसामान्य माणसे तुम्हाला एवढीच विनंती करतो की, माणसाचा जीव परतवणारे तुम्ही अशाप्रकारे जीव घेऊ नका हो. पेशंटचे कंबरडे मोडूस्तर पैसाही घेऊ नका हो. काही वेळेला तुमचे बिल भरताना खूप कष्टाने पैसे जमविलेले असतात. कधी सोनं विकून, तर कधी व्याजाने आणून तर कधी शेती जुमला विकून तो  पैसा तुमच्याकडे येत असतो. पेशन्टचा जीव वाचेल आणि वाजवी एवढेच पैसे घ्या. वारेमाप पैसे घेऊन कुणाची हाय घेऊ नका. तुमच्या बद्दलचा आदर समाजात कायम टिकू दया. पांढऱ्याशुभ्र तुमच्या गणवेशला कसलाच काळिमा नको लागायला.

*लेखन - रुपाली देशपांडे*
बीड.
संपर्क - *8888955539*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत