मुंडे साहेबांचा आत्मा तळमळत असेल! अधिकाऱ्यांची बदली किंवा निलंबन करून जमणार नाही
मस्साजोग येथील हत्या प्रकरण ताजे असताना तसेच या हत्येप्रकरणी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी भव्य मोर्चा जाहीर केलेला असतानाच अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पोलीस चौकी समोर जमीर शेख या तरुणाला कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. त्या तरुणाची रुग्णालयात जीवन-मृत्यूशी लढाई सुरू आहे. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी सिरसाळा येथील निसार पट्टेदार यांचीही दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचे प्रकरण कालांतराने दबले.
याशिवाय गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात अपहरण, खंडणी, खून असे प्रकार सातत्याने होत आहे. बीड जिल्ह्यात असे प्रकरण हळूहळू विक्राळ रूप धारण करत आहे. या विरोधात आता मराठा समाज पुढे आला असून समाजाकडून काढण्यात येत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चात सामील होण्याकरिता मराठा समाजासह इतर समाजांनीही मोठ्या प्रमाणात आवाहन केले आहे. म्हणून यावेळी सरपंच सुभाष देशमुख यांचे हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात तापले असतानाच जमीर शेख या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
मराठा समाजाकडे गुंड आणि झुंडशाही विरोधात आवाज उठवण्याइतके सक्षम नेतृत्व महाराष्ट्रात आहे. सर्व पक्षातील मराठा नेतृत्व पेटून उठले तर अशाप्रकारे उपद्व्यापी घटना करणाऱ्यांना पडता भुई थोडी होईल. मराठ्यांची एकता मराठा आरक्षण आंदोलन, क्रांती मोर्चा, मूक मोर्चा यात अख्या महाराष्ट्राने यापूर्वी अनेकदा पाहिली आहे. हा इतिहास पाहता आता महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक पक्षात मोठ मोठे मातब्बर मराठा नेते आणि त्यांना मिळणारी समाजाची मोठी साथ यामुळे आता यापुढे अशाप्रकारे हिंसात्मक कारवाया दाबल्या जाणार नाहीत. त्यावर आवाज उठवण्याइतकी क्षमता मराठा नेतृत्व आणि मराठा समाजात नक्कीच आहे. म्हणून आता यापुढे अशा हिंसात्मक कारवाया झाल्या तर फक्त उच्च पदस्थ पोलीस अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांची बदली करून किंवा त्यांना निलंबित करून चालणार नाही. कुठे काहीही अघटीत घडले किंवा अप्रिय घटना घडली की, याचे खापर अधिकाऱ्यांवरच फोडले जाते आणि त्यांनाच हटविले जाते. राजकारणी आणि गुंडगिरी करणारे मात्र नामानिराळे राहतात असे आता जनतेतून उघडपणे बोलले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अनेक अप्रिय आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. यात खुनापासून अपहरण, खंडणी, बलात्कार वगैरे सारखे गुन्हे सामील आहेत. असे सर्व प्रकार फक्त जिल्ह्यातील एका तालुक्यातच कसे आणि का घडतात? या प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक सहकार्य पोलिसांना शासनकर्त्यांकडून का मिळत नाही? पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून परळी तालुक्यात जंगल राज सुरू झाले आहे का? असे प्रश्न आता जनतेतून उपस्थित होऊ लागले आहेत. मस्साजोग येथे देशमुख यांच्या अमानुष हत्येमुळे या सर्व प्रकारांना आता सर्व विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात वाचा फोडली असून सत्ताधाऱ्यांविरोधात जवळपास सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. जनतेतही अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात त्यातल्या त्यात परळी तालुक्यात होत असलेल्या अशा वेगवेगळ्या विदारक घटना पाहून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा आत्मा सुद्धा तळमळत असेल असेही जनतेतून बोलले जात आहे. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना मात्र याचे कुठलेही सोयर सुतक नसल्याचे बोलले जात आहे. त्यांचा वारसा सांगणारे फक्त सत्तेत आमदार, खासदार, मंत्री, संत्री होण्यातच धन्यता मानत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण येत असल्याचे दिसून येत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा