Breaking News

जिल्हा प्रशासन, बीड नगर परिषद आणि वन विभागाची अनास्था "चला थोडंसं वाचूया" या व्हाट्सएप ग्रुपच्या मेहनतीला नतदृष्टांची लागली नजर!


बीड (एस.एम.न्युज़) - जिल्हा प्रशासन बीड नगर परिषद आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे शहरातील बशीरगंज चौक ते थोरातवाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय या दोन्ही रस्त्यांवर "चला थोडंसं वाचूया" या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून वर्गणी करत जुलै महिन्यात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याऐवजी आता लोकंच या वृक्षांचे उच्चाटन करू लागल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच अवस्था राहिली तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरणार आहोत.
         बीड शहरातील बशीरगंज परिसरातील दुसऱ्या चौकात असलेल्या न्यू सुंदर मेडिकल ते थोरातवाडी आणि जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्याकरिता "चला थोडंसं वाचूया" या व्हाट्सअप ग्रुप ने जून चा पूर्ण महिना ग्रुपमध्ये जनजागृती करून वृक्षारोपणासाठी ६ हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यातून जुलै महिन्यात १२ कडंबाची तर ३ गुलमोहराची ८ ते १२ फूट उंचीची एकूण १५ झाडे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा लावली. ही १५ ही झाडे लावल्यानंतर आतापर्यंत चांगली वाढत आहे. असे असताना काही नतदृष्टांची नजर या झाडांना लागली. १५ पैकी २ गुलमोहराची तर ३ कडंबाची झाडे अज्ञात नतदृष्टांनी तोडली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कडंब आणि गुलमोहर ही दोन्ही झाडे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या यापैकी कोणतेही जनावर खाणे तर दूर या झाडांजवळ जात सुद्धा नाही. यामुळेच येथे कडंब आणि गुलमोहरांची झाडे लावली होती. परंतु ज्या झाडांना जनावर इजा पोहोचवीत नाही, त्याचा पाला किंवा साल खात नाही, अशा कडंब आणि गुलमोहराच्या झाडांपैकी ३ कडंबांची तर २ गुलमोहराची झाडे काही नतदृष्टांनी तोडून टाकली आहे. आता उर्वरित १० झाडांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित जाळ्या लावण्याएवढे आर्थिक पाठबळ "चला थोडंसं वाचूया" या व्हाट्सअप ग्रुप कडे नाही. आणि जनावरांऐवजी लोकंच अशा प्रकारे वृक्षारोपण केलेली झाडे तोडू लागले, वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्षांचे उच्चाटन करू लागले तर आपणच आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरणार आहात. कारण वृक्षांपासून मिळणारी हवा आणि सावली आपल्याला मिळू शकणार नाही.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना देणे न घेणे!

"चला थोडंसं वाचूया" या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुलै महिन्यात जेव्हा या दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यात आली, तेव्हा या कार्याची बातमी स्थानिकांसह विभागीय वृत्तपत्रांनीही मोठ्या प्रमाणात घेतली होती. येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची बातमी जवळपास ३० वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. याची दखल जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषद, वन विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाने घेतली असती आणि या कार्यालयाने प्रशासकीय पातळीवर कार्य करत येथे लावण्यात आलेल्या १५ झाडांना सुरक्षित जाळ्या लावल्या असत्या तर आज १५ पैकी ५ झाडे अशाप्रकारे नतदृष्ट तोडू शकले नसते. समाजाकडून करण्यात आलेल्या चांगल्या कार्याची दखल प्रशासनिक पातळीवर अधिकारी-कर्मचारी घेत नसल्याचे यामुळे दिसून आले.

शासनाकडून आलेला निधी जातो कुठे?

दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात शासनाकडून राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वृक्षारोपणाकरिता मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला जातो. याचा प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणात गवगवाही करण्यात येतो. राज्यभरात अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा चुराडा वृक्षारोपणाच्या नावाखाली शासन-प्रशासनाकडून केला जातो. ज्या प्रमाणात निधीची उधळपट्टी करण्यात येते त्या प्रमाणात ना शासनाकडून ना प्रशासनाकडून झाडे लावली जातात, ना जाहीर करण्यात आलेल्या संख्येत झाडे लावली जातात. अत्यंत तोकड्या संख्येत लावलेल्या झाडांचे जतन, संगोपन आणि संवर्धन केलेच जात नाही. ही वस्तुस्थिती पाहता प्रश्न पडतो की, शासनाकडून वृक्षारोपणासाठी जिल्हा प्रशासनास, नगर परिषदास आणि वन विभागास देण्यात येणारा निधी नेमका जातो कुठे?

=================== 

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत