Breaking News

मुख्यमंत्र्यांचा बीड शहर विशेष दौरा; बीड नगर परिषद कामाला लागणार?डॉ. आंबेडकर जयंती, राम नवमीसाठी संपूर्ण शहर स्वच्छ करून घेणार!

बीड (एस.एम.न्युज़) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि राम नवमी असे सण उत्सव पुढे काही दिवसात येणार असल्याने बीड शहर स्वच्छ व सुंदर दिसावे म्हणून दस्तूरखुद्द मुख्यमंत्री बीड शहराचा दौरा करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ते स्वतः जातीने बीड शहरात पायी फिरून संपूर्ण शहर स्वच्छ करून घेणार असल्याचे कळते. तसेच यापुढे स्वच्छतेविषयी माझ्यापर्यंत तक्रार आली नाही पाहिजे अशी तंबी देणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
           बीड नगर परिषदेचे बीड शहर स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. नुकताच ९ एप्रिल रोजी हिंदू बांधवांचा गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला सण साजरा करण्यात आला. तर ११ एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमज़ान ईद हा सण साजरा करण्यात आला. या दोन्ही सणासाठी सुद्धा बीड नगर परिषदेला बीड शहरात स्वच्छता मोहीम किंवा अभियान राबवावे असे वाटले नाही. यामुळे गलिच्छता जशास तशी राहिली. आता येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. शिवाय दिनांक १७ एप्रिल रोजी हिंदू बांधवांचा रामनवमी हा सणही येत आहे. या पार्श्वभूमीवर बीड नगर परिषद स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा कुंभकर्णासारखी राहू नये म्हणून बीड शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न हाताळून बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री जातीने बीड शहरात येऊन संपूर्ण शहरात पायी फिरून स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती मिळाली आहे तसेच यापुढे शहर स्वच्छतेबाबत वरपर्यंत तक्रारी येऊ नये अशी तंबी ही देणार असल्याचे कळाले आहे. यामुळे बीड नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. मुख्यमंत्री येत असल्यामुळे का होईना बीड शहर स्वच्छ व सुंदर होईल हेही तेवढेच खरे! आतापर्यंत विविध वृत्तपत्रांनी एप्रिल फुल विषयी अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत मात्र पहिल्यांदाच स्वच्छता गुल ही परिस्थिती मांडण्याकरिता ही एक आगळ्यावेगळ्या तऱ्हेची बातमी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी लिहिली आहे.


==========================================


१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील. 
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत