Breaking News

साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती द्या - यशवंत पवार

सोलापूर (एस.एम.न्युज) - महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्राना उभारी मिळावी. वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा. मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट,२६ जानेवारी, दिवाळी व ०१ मे महाराष्ट्र कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा राज्य सरकार कडून ५ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपयांच्या जाहिराती मिळायच्या. परंतु सन २०१८ पासून राज्य सरकार ने राज्यातील सर्वच साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणं बंद केले आहे. सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीचे झाले आहे. कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी कच खाल्ली असून अनेक संपादकांनी छपाई चा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केली आहेत. समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढता छपाई व इतर खर्च परवडत नाही. त्याच बरोबर छोट्या वृत्तपत्रांना राजकीय व इतर जाहिराती मिळत नसल्याने अनेक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत. राज्यात अनेक वृत्तपत्रे प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृती चे काम करत आहेत. परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत झाली आहे. राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे पाच वर्षांपासून पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहे. राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिराती बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय वाईट असून दिवाळी अंक, विशेष अंक  वर्धापन दिन सारख्या वृत्तपत्राशी निगडीत असलेल्या बाबी आता जवळपास नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. अनेक साप्ताहिक वृत्तपत्रे बंद पडली आहेत. त्यांना पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. अशा भावना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केली असून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


======================================

१} कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल
२} वृत्तपत्रे व एस.एम.न्युज साठी जाहिराती आणि बातम्या स्वीकारल्या जातात 
३} विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल. 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज
आसेफ़नगर, बीड 
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत