Breaking News

आमदार साहेब, काकू-नाना गॅरेज लाईनचे व्यापारी, मेकॅनिक आणि रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला!काकू-नाना आडत मार्केट रस्ता आणि महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठीही मेहेर नजर टाका!


बीड (एस.एम.न्युज़) - बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना गॅरेज लाईन चा रस्ता व नाली कामाचे उद्घाटन केल्याने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथील व्यापारी, मेकॅनिक आणि रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असला तरी काकू-नाना याच नावाने असलेल्या आडत मार्केट च्या रस्त्याकडे आणि महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठीही मेहेर नजर टाकावी अशी मागणी होऊ लागली आहे.
        शहरातील जालना रोड वरून शाहूनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काकू-नाना च्या नावाने असलेल्या गॅरेज लाईन चा रस्ता व नाल्या गेल्या अनेक वर्षांपासून कामाविना रखडलेल्या. शेवटी एकदाचे येथील रस्ता व नाल्यांच्या कामाचे उद्घाटन बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांच्या हस्ते केले. शहरातील जालना रोड ते काकू-नाना गॅरेज लाईन ते शाहूनगर येथील रस्ता व नालीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी निधी मंजूर करून घेत रस्ता व नालीबांधकामाचे उद्घाटन करून या कामास प्रत्यक्ष सुरूवात केली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. नीता अंधारे, कर्मचारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कामाचे कंत्राटदार तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सय्यद सलीम यांच्यासारखे सारथी असूनही कामे प्रलंबित आहेत

आमदार संदीप क्षीरसागर हे तरुण तडफदार असले तरी त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. असे असले तरी त्यांच्याकडे माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व आहे. असे असून सुद्धा आमदार म्हणून निवडून आल्यापासून ते आतापर्यंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकाळात अनेक कामे प्रलंबित आहेत. आता राज्यात विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यात येऊ घातल्या आहेत. उर्वरित वेळेत शहरातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण होणे अगत्याचे आहे. मात्र उरलेल्या वेळेत प्रलंबित कामे होतील की नाही ? हा प्रश्नच आहे. अशाच प्रलंबित व रखडलेल्या कामांमध्ये काकू-नाना आडत मार्केटचा रस्ता ही एक आहे. जो गेल्या अनेक वर्षांपासून तयार करण्यात आलेला नाही. या रस्त्यावर पहाटे ०४:०० वाजल्यापासून ते सकाळी ११:०० वाजेपर्यंत मोठमोठ्या ट्रक व टेम्पोची ये-जा सुरू असते. भाजीपाला, फळ-फळावळ करणाऱ्या विक्रेत्यांचे हातगाडे, ऑटो रिक्षा व तत्सम वाहने यांचीही वर्दळ असतेच. एवढ्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक असूनही तसेच आमदारांचे आजी-आजोबा म्हणजेच काकू-नाना यांचे नाव या आडत मार्केटला असताना सुद्धा शिवाय माजी मंत्री व माजी नगराध्यक्ष असलेल्या चुलत्यांकडून सुद्धा काकू-नाना यांच्या नावाने असलेल्या या आडत मार्केटच्या रस्त्याच्या कामाला आजपर्यंत मुर्त रूप काही मिळाले नाही. विशेष म्हणजे आमदारांच्या दिमतीला माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व सारथी सारखे सोबत असूनही शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत.

महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळाला नाही 

आमदारांनी पाहणी करून नऊ महिने उलटले तरी महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले नाही. दस्तूर खुद्द आमदारांनी दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी कब्रस्तान व तूट फूट झालेल्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतींची पाहणी केली होती. यावेळी सुद्धा त्यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासह नगरपालिकेचे अभियंते, गुत्तेदार व अन्य लवाजमा होता. एवढ्या सर्वांच्या उपस्थितीत आमदारांनी पाहणी केल्यानंतरही व नऊ महिने उलटून गेल्यावरही अजून सुद्धा महेदवीया दायरा कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीच्या कामाला मुहूर्त लागला नाही व अजूनही हे काम सुरू झाले नसून प्रलंबितच आहे.
======================================
1) एस.एम.न्युज वेबपोर्टल/यूट्यूब चैनल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी, लेख व जाहिराती स्वीकारल्या जातील
2) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल 
3) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
(मुक्तपत्रकार) आसेफ़नगर, बीड 
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत