मुंडे यांच्यानंतर "साहेब" संबोधन मिळालेले मेटे एकमेव नेते होते
विनायकराव मेटे तसे पाहिले तर सुरुवातीला एक संघटना आणि काही वर्षांपूर्वी त्या संघटनेचे रूपांतर पक्षात करणारे एक राजकीय नेते. परंतु संघटना स्थापन करण्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचे त्यांचे राजकारण म्हणा किंवा कार्य म्हणा हे फक्त कोणत्या एका जाती धर्मासाठी नव्हते तर त्यांनी सर्व समावेशक दृष्टिकोन ठेवून राजकीय क्षेत्रात आपली वाटचाल केली होती. शिवाय प्रथम राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होत विधान परिषदेत प्रवेश करणारे मेटे त्यानंतर लागोपाठ चार वेळेस विधान परिषदेत आमदार म्हणून निवडले गेले. विधान परिषद सारख्या लोकशाहीच्या दालनात दरवेळी वेगवेगळ्या आमदारांची मते मिळवून आमदार होणे वाटते तेवढे सहज सोपे नक्कीच नाही. मात्र मेटेंनी ही किमया एक दोनदा नव्हे तर चक्क पाच वेळेस करून दाखविली.
मेटे जगलेल्या वयाच्या ५२ वर्षातून २८ वर्षे विधान परिषदेत आमदार म्हणून राहिले. यातच त्यांचा राजकीय वकूब किती उंच होता याची कल्पना येते. राजकीय क्षेत्रात नेतृत्व करताना त्यांच्या नेतृत्वामध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी अर्थातच आमदारांकडून जनतेच्या मूलभूत गरजांसाठी जी कामे होणे आवश्यक आहे मात्र ती त्यांच्याकडून होत नसेल तर अशावेळी मेटे त्यात जातीने लक्ष घालून रखडत पडून असलेली कामे पूर्ण करण्याचा विडा उचलत होते आणि कामे पूर्णत्वास नेत असत.
अशाच प्रकारे बीड शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या बार्शी रोडवर बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पुलाला भगदाड पडले व त्यावरून वाहतूक करणे जोखमीचे बनले तेव्हा जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून त्या पुलासाठी आवश्यक कार्य होत नव्हते. अशावेळी मेटे साहेब जनतेसाठी धावून आले आणि आपल्या पातळीवर पाठपुरावा करत सूत्रे हलविली आणि कित्येक वर्षांपासून खितपत पडलेला बिंदुसरा नदीवरील हा पूल तयार करण्याचे कार्य सुरू करावयास मेटे साहेबांनी भाग पाडले आणि अत्यंत झपाट्याने काम करायला लावून अगदी कमी कालावधीत बिंदुसरा नदीवर नवीन पूल बनवून जनसेवेत दिला. खरे तर राजकीय क्षेत्रात मेटे साहेब काय रसायन आहेत हे बीडच्या जनतेला तेव्हाच कळून चुकले.
जनतेतून निवडून येणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यांच्याविषयी खाजगीत बोलताना मागच्या दाराचे आमदार म्हणून हिणवले जायचे. बहुतेक राजकीय विरोधकांचे हे टोमणे मेटे साहेबांच्या कानावरही गेले असतील म्हणूनच की काय त्यांनी बीड विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरून विधानसभा निवडणूक लढवली आणि अगदी भरभरून मतदान मिळविले. मात्र अल्पमतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु या पराभवामध्ये सुद्धा त्यांचा एक प्रकारे मोठा विजयच होता. कारण त्यांच्याकडे इतरांसारख्या भरमसाठ संस्था नाहीत. जिथे शेकडोंनी लोक नोकऱ्यांवर आहेत आणि ते चाकरमानी व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या हक्काचे मतदार ही नाहीत. शिवाय बीड शहरात वास्तव्यास नसल्याने बीड तालुक्यातील जनतेशी हवे त्या प्रमाणात संपर्कही नव्हता. तरीसुद्धा त्यांनी भरभरून मतदान मिळविले. ते त्यांच्या ठायी असलेल्या सर्व समावेशक दृष्टिकोनामुळे आणि सर्वसामान्य जनतेत त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमळ आपुलकीमुळे. ते जरी वास्तव्यास बीड शहरात नसले तरी बीडकरांना ते आपले जवळचे आणि आपल्या घरातीलच एक वाटायचे. कारण त्यांना भेटायला गेल्यास भेट घेणारा ओळखीचा असो किंवा नसो ते प्रत्येकाला मोठ्या आपुलकीने भेटायचे येणाऱ्याच्या काही अडीअडचणी असेल तर त्या आपल्या पातळीवर सोडवायचा प्रयत्न करायचे व सोडवायचे सुद्धा.
एवढेच काय मी कधीही कोणत्याही राजकीय व्यक्तीला त्याने कोणते काम समाजहितासाठी करावे म्हणून थेट आवाहन करीत नाही परंतु मेटे साहेब येथे सुद्धा अपवाद ठरले. कारण त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष लक्ष घालून बिंदुसरा नदीवरील बार्शी रोड वरील पूल बनवून दिला तेव्हापासून ते माझ्या लक्षात राहिले होते. म्हणून २०२० साली जेव्हा बिंदुसरा नदीला पूर आला तेव्हा खासबाग-मोमीनपुरा भागातील नागरिकांसाठी नदीतील दगड, गोटे व मुरूम टाकून बनविण्यात आलेला कच्चा पूल दरवर्षीप्रमाणे त्यावेळी ही वाहून गेला होता. दरवर्षी वाहून जाणारा हा कच्चा पूल प्रत्येक वेळी नजरेने पाहत असल्याने हे कुठेतरी थांबावे आणि या ठिकाणी कायमचा पक्का पूल बनवण्यात यावा म्हणून मी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या लेखणीने मेटे साहेबांना आवाहन करत लिहिले होते "आ. मेटे साहेब तुम्हीच खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील पूल बनवून द्या" ही बातमी दिनांक २० व २१ सप्टेंबर २०२० रोजी बीड जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. तेव्हा सुद्धा मेटे साहेबांनी तत्परता दाखवून बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात जातीने बिंदुसरा नदीत येऊन कुठे पुलाची आवश्यकता आहे आणि पूल होणे कसे गरजेचे आहे याची पाहणी केली. नदीवर पाहणी करण्याकरिता येण्याअगोदर त्यांचे पदाधिकारी असलेले घुमरे व शेषेराव तांबे यांना सांगून मला फोन केला आणि बिंदुसरा नदीत पाहणी करण्यासाठी येत असल्याचा निरोप दिला परंतु मी त्यावेळी एका अत्यंत महत्त्वाच्या कामात अडकलेलो असल्याने त्यांच्यासोबत बिंदुसरा नदीच्या पाहणी करिता जाऊ शकलो नव्हतो. मात्र यावरून हे लक्षात येते की, एक राजकीय नेते म्हणून ते किती दक्ष व जागरूक होते. ज्या पत्रकाराने आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाहन केले त्याची मुंबईत असताना सुद्धा दखल घेऊन अवघ्या दोनच दिवसात बीडमध्ये येऊन बिंदुसरा नदीची पाहणी केली व नंतर बिंदुसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला व त्यास मंजुरी मिळवून घेतली. परंतु नंतरच्या काळात त्यातही काही जणांनी श्रेय वादाची लढाई सुरू केली आणि दोन वर्षाचा काळ उलटूनही अद्याप पर्यंत या पुलाचे कार्य अजून काही प्रत्यक्षात सुरू झाले नाही.
परंतु तेव्हापासून मेटे साहेबांसोबत भ्रमणध्वनी वरून नेहमी बोलणे व्हायचे शिवाय व्हाट्सअप च्या माध्यमातून निरोपांचे आदान-प्रदान ही व्हायचे. यातून कधीही असे जाणवायचे नाही की ते कोणी फार मोठे नेते आहेत. पाच वेळा विधान परिषदेत आमदार झाले आहेत. याचा साधा लवलेशही कधी त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा नाही. इतक्या साधेपणाने ते मोबाईलवर बोलायचे. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा नेहमी दिसायचा. एकदा कुणाशी त्यांचे ऋणानुबंध जुळले तर ते त्याला व्यस्ततेतही विसरायचे नाही.
त्यांच्या याच स्वभावामुळे ईद मिलन असो की दिवाळी मिलन असो जेव्हा जेव्हा हे कार्यक्रम बीड शहरात ते घ्यायचे तेव्हा तेव्हा त्यांचे खंदे समर्थक अख़ीलभाई, शेषराव तांबे, घुमरे, गुंदेकर यांच्यामार्फत कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका आवर्जून पाठवायचे. एवढेच काय गेल्यावर्षी माझा मोठा मुलगा शेख वासेख़ हा कोणतेही कोचींग क्लास किंवा ट्युशन न लावता तसेच नववी व दहावी अशी दोन सलग वर्षे कोरोना मुळे शाळा कुलूप बंद असताना सुद्धा स्वतः घरीच केलेला अभ्यास व अडचणी च्या वेळी विषय शिक्षकांचे भ्रमणध्वनीवरून घेतलेले मार्गदर्शन या बळावर इयत्ता दहावीत ९४.८० टक्के गुण घेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला. तेव्हा त्यावर्षी दिवाळी मिलन च्या कार्यक्रमात मेटे साहेबांनी माझ्यासह त्याला व्यासपीठावर बोलावून पुष्पगुच्छ व मिठाई देत अभिनंदन केले होते. यावरून मराठीतील एक म्हण आवर्जून मनात येते "घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी"
लोकशाहीमध्ये आज आपल्या जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला सुद्धा अशाच नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे. की जे कुठेही असले तरी त्यांचे चित्त हे जनतेकडे, जनतेच्या हिताकडे असायला हवे. अशा या मेटेरूपी घारीचे आपल्यातून अनाकलनीय अशा पद्धतीने अवेळी प्रस्थान झालेले आहे. एका अपघाताने आपल्यातून हे विशाल नेतृत्व हिरावून नेले आहे. त्यांच्या जाण्याने फक्त आपल्या बीड शहराचे किंवा जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नुकसान झालेले आहे. सर्व सामान्य व गरीब परिस्थितीतून पुढे येत आपल्या कार्याच्या माध्यमातून मोठे झालेले मेटे हे गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर फक्त बीड जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जनतेचे साहेब झाले होते. मुंडे नंतर केवळ मेटे यांनाच जनतेकडून साहेब हे आदरातीर्थी संबोधन मिळाले होते. म्हणून लेखाच्या शीर्षकातच ही बाब अधोरेखित केली आहे. मुंडे साहेबांसारखे मेटेंनाही साहेब हे आदरार्थी संबोधन मिळाले परंतु त्यांच्यासारखे जे मिळायला नको होते तेही नियतीने त्यांच्या नशिबी दिले आणि मुंडे साहेबांसारखाच त्यांचाही रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी भयंकर अपघात घडला व त्यातच त्यांना अपघाती मृत्यू आला. हा जिव्हारी लागणारा योगायोग मुंडे साहेबानंतर मेटे साहेबांसोबत घडून आला असे व्हायला नको होते. मुंडे साहेबांनंतर मेटे साहेबांच्या अकाली मृत्यूमुळे बीड जिल्ह्याच्या नशिबी दुसऱ्यांदा असे दुर्दैव आले. बीड जिल्ह्यासाठी ही फार मोठी शोकांतिका आहे.
शिवसंग्राम संघटनेच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत अनेक जण जोडले गेले. अनेक जण मोठे झाले. काहींनी त्यांच्याशी दगाफटकाही केला तर अनेक जण त्यांना सोडून इतर पक्षातही गेले. असे असले तरी त्यांनी कधीही अशा लोकांसोबत सूड भावनेचे राजकारण केले नाही. जे सोबत येतात त्यांच्यासाठीही त्यांचे दार नेहमी उघडे असायचे जे सोडून जातात त्यांच्यासाठीही त्यांचे दार नेहमी उघडे असायचे. त्यांच्याकडे येणाऱ्यांना ते नाही म्हणायचे नाही तर सोडून जाणाऱ्यांना का सोडून चाललास विचारायचे नाही. शिवाय सोडून गेलेल्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचे नाही. त्यांना संपविण्याचे कटकारस्थान कधी करायचे नाही.
नाहीतर आजकाल अनेक राजकारणी असे पाहायला भेटतात जे त्यांच्यासोबत असताना त्यांचे असतात परंतु त्यांना सोडून गेल्यानंतर गेलेल्यांना राजकारणातून उठविण्याचे प्रयत्न मोठ्या हिकमतीने करतात परंतु मेटे साहेब इथेही अपवाद होते. त्यांच्यात सूड भावनेचा किंवा कुणाला संपविण्याचा लवलेश ही नव्हता. अशा मेटे साहेबांच्या अपघाती मृत्यूनंतर जेव्हा त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा गेल्या जवळपास आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा पडू लागला आणि जसे काही सांगू लागला की, या विनायकाच्या जगातून जाण्याने "मीही वरून अश्रू वाहू लागलोय, अश्रू वाहू लागलोय !" जसे त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते आणि शेकडो लोक धाय मोकलून रडत होते. तसाच आभाळ ही रडत होता. मेटे साहेब आपल्या सर्वांतून जाऊन अनंतात विलीन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, त्यांच्या पश्चात त्यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेल्या शिवसंग्राम पक्षाला सांभाळण्याची ताकद त्यांच्या शिलेदारांना देवो. हीच या निमित्ताने प्रार्थना करतो.
- एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा