Breaking News

लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलनाने बिंदुसरा दणाणली नदी अस्तित्वात आल्यापासून प्रथमच झाले असे आंदोलन

 


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील खासबाग-मोमीनपुरा  जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या निर्माणासाठी सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी नदीपात्रात लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देण्यात आलेल्या घोषणेने कधी नव्हे ते बिंदुसरा नदी पहिल्यांदाच दणाणली शिवाय ही नदी अस्तित्वात आल्यापासून प्रथमच नदीपात्रात असे आंदोलन करण्यात आल्याने जिल्हाभरात याची चर्चा सुरू झाली आहे.

बिंदुसरा नदीपात्रात खासबाग-मोमीनपुरा जोडण्यासाठी अत्यावश्यक असलेला, या दोन्ही भागातील शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असलेला नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण कार्य व्हावे अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून सातत्याने शासन-प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत असून सुद्धा या पुलाचे गांभीर्य या दोन्ही स्तरावर गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आल्याने लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़, सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रमेशराव गंगाधरे, शेख युनूस, संदीप कदम, शेख मुबीन, मोमीन आसेफ़ यांनी येथील नियोजित पुलाचे निर्माण कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन केले. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांसह इंजि. मुहम्मद मोईजोद्दिन, सय्यद आबेद, इंजि. मोमीन तारेख हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी १२ वाजेपर्यंत चालले. या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुल होत कसा नाही ? झालाच पाहिजे ! येथे पुल व्हायलाच हवा ! अशा घोषणांनी नदीपात्र दणाणून सोडले होते. विशेष म्हणजे बिंदुसरा नदी अस्तित्वात आल्यापासून नदीपात्रात अशाप्रकारे प्रथमच आंदोलन करण्यात आल्याने याची चर्चा जिल्हाभरात होत आहे.

पोलीस प्रशासनाची कर्तव्यदक्षता !

डुबकी लगाव आंदोलनासाठी पेठ बीड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांसह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षपणे आंदोलनासाठी नियोजन केले होते. कारण नदीपात्रात सध्याही कमरेच्या वर पाणी वाहत आहे. यामुळे काही अघटीत व अप्रिय घटना घडू नये म्हणून अग्निशामक दलाची गाडी आणि कर्मचारी सुद्धा पाचारण करण्यात आले होते. तसेच नदीपात्राच्या पूर्वेला पेठ बीड पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लवाजमा होता तर पश्चिमेस शहर पोलीस ठाणेचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लवाजमा आंदोलनकर्त्यांवर दक्षतेने नजर ठेवून होता. यामुळे आंदोलन स्थळी जमलेले शेकडो नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले.

पुलाचे निर्माण कार्य सुरु होईपर्यंत आंदोलनांची शृंखला सुरूच राहील !

डुबकी लगाव आंदोलना दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आंदोलनकर्ते तथा दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा प्रतिनिधी एस.एम. युसूफ़ यांनी म्हटले की, खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण कार्य जोपर्यंत प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या पुलाच्या मागणीसाठी सुरूच राहतील. कारण  शासकीय-प्रशासकीय पातळीवर गेल्या पाच वर्षात पुलाविषयी अनेक निवेदने दिलेली आहेत. आता यापुढे फक्त निवेदनच नाही तर एकानंतर एक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनेही याच नदीपात्रात करण्यात येतील असे म्हटले. याला आंदोलनकारी सय्यद इलयास, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ नागरिक तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, शेख युनूस चर्‍हाटकर, संदीप जाधव यांनी अनुमोदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत