Breaking News

पोटाच्या आगीपुढे जळीत आगीची ही तमा नसते - एस.एम.युसूफ़
कोरोना निमित्ताने लॉकडाउन लावू इच्छिणाऱ्यांनी बोध घ्यावा !
बीड (एस.एम.न्युज) - माणूस असो की जनावर प्रत्येकाला आपल्या पोटाच्या आगीपुढे जळीत आगीची ही तमा नसते हे या गाईंनी दाखवून दिले आहे
म्हणून कोरोना निमित्ताने लॉकडाउन लावू इच्छिणाऱ्यांनी यातून बोध घ्यावा.
     याविषयी सविस्तर असे की, बीड शहरातील पांगरी रस्त्यावर उमाकिरण शैक्षणिक संकुलच्या पुढे एका जागी लोकांकडून उष्टे-खरकटे फेकले जाते. तिथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी,भुकेची आग शमवण्यासाठी काही गायी जमा झाल्या. विशेष म्हणजे त्याच उकिरड्यावर कुणीतरी प्लास्टिक कॅरीबॅग जाळण्याकरिता आग लावून टाकली होती. परंतु भुकेल्या गाईंना आपल्या पोटात लागलेल्या भुकेच्या आगीपुढे या जळीत आगीची कोणतीही तमा दिसून आली नाही. त्या आगीचा दाह गाईंचा फोटो घेताना मला जाणवला. परंतु माझ्यापेक्षा आगीजवळ असलेल्या गाईंना त्याची कुठलीही भीती जाणवली नाही. हे पाहता स्पष्ट होते की, माणूस असो की जनावर जेव्हा भूक लागते तेव्हा इतर काहीही दिसत नाही. या प्रसंगामुळे म्हणावेसे वाटते की, कोरोना च्या निमित्ताने पुन्हा एकदा लॉक डाऊन लावायची इच्छा असणाऱ्यांनी अगोदर माणूस आणि जनावर यांच्या पोटाची खळगी भरण्याचे नियोजन करावे. जनावरं तरी उकिरडे हुडकून आपल्या पोटाची खळगी भरतात. परंतु घरी अन्नधान्य नसलेल्या माणसांनी काय करावे ? उद्योग-धंदे, मोलमजुरी सगळे काही बंद केल्यास पोटाची खळगी भरण्याकरिता पैसा कुठून आणावा ? याचा विचार व्हायला हवा. थोडक्यात गाई आणि आग यांच्या या प्रसंगामधून शासन-प्रशासनाने बोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
==========================
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक ,
एस.एम.न्युज़,बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत