डॉ.अशोक थोरात यांच्या बदलीने सर्वसामान्य रुग्णांच्या मनाला लागली रुखरुख; डॉ.गित्ते कडून ही अपेक्षा- एस.एम.युसूफ
बीड (एस.एम.न्युज) - दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते २६ नोव्हेंबर २०२० असे त्यांनी एकूण ३ वर्ष, ३ महिने, १९ दिवस जिल्हा शल्य चिकित्सक पद सांभाळले. जिल्हा शल्य चिकित्सक पदी आल्यानंतर त्यांच्यासोबत जबाबदारी सह इतर अनेक वाद-विवाद ही आले. याबाबत जेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चा झडू लागल्या तेव्हा साहजिकच ते या पदाला आणि रुग्णांना योग्य तो न्याय देतील का ? असा प्रश्न व शंका ही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु त्यांनी कार्यकुशलतेने हे पद फक्त सांभाळलेच नाही तर आपल्या कार्याने जिल्हा रुग्णालयाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविला. यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या विश्वासाने व अपेक्षेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येऊ लागले होते. काही अवघड शस्त्रक्रिया ज्यासाठी रुग्णांना पुर्वी औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा मोठ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी पाठविले जायचे. अशा शस्त्रक्रिया सुद्धा त्यांनी जिल्हा रुग्णालयात लिलया यशस्वी करून दाखविल्या. शिवाय ते आतापर्यंतचे एकमेव असे जिल्हा शल्यचिकित्सक असतील ज्यांनी आपला भ्रमणध्वनी व व्हाट्सअप क्रमांक सर्वसामान्यांसाठी २४ तास खुला करून दिला होता. रुग्णांसाठी
आवश्यक कार्य करण्यास ते सदैव तत्पर असत. अर्ध्या रात्री त्यांना मोबाईल वरून कॉल लावला किंवा दिवसा कधीही व्हाट्सअप वर मेसेज टाकला तरीसुद्धा ते कधीही, कोणताही त्रागा किंवा राग न करता शांतचित्ताने रुग्णांसाठी आवश्यक असलेले कार्य तडीस न्यायचे. रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक ते कार्य करत असतानाच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जगासोबत आपल्या देशात ही कोरोना नावाचा महाभयंकर व न दिसणारा रोग आला. याला तोंड देताना भल्याभल्या आरोग्य तज्ञांची भंबेरी उडाली. मात्र डॉ. अशोक थोरात यांनी या रोगाच्या आक्रमण काळात सुद्धा जराही न डगमगता, विचलीत न होता मोठ्या आत्मविश्वासाने जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे तोंड दिले. आणि बीड जिल्ह्यात कोरोना चे अक्राळविक्राळ तांडव थोपविण्यात यशस्वी ठरले. या त्यांच्या खुबी मुळे ते रुग्णांसाठी आरोग्याचे मुकुटमणी ठरले होते. अशा कार्यकुशल व कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची अखेर बदली झाली. त्यांच्या बदलीने जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तोंडून डॉ. थोरात यांच्या विषयी माणुसकीची महत्ता सांगणारी अनेक बोलकी उदाहरणे ऐकायला मिळत असल्याने त्यांच्या बदलीने सर्वसामान्यांच्या मनाला मोठ्या प्रमाणात रुखरुख लागली असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आलेले डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याकडूनही आता सर्वसामान्य रुग्ण डॉ. थोरात यांच्यासारखीच अपेक्षा व्यक्त करीत आहेत. डॉ. गित्ते यांनी ही डॉ. थोरात यांच्यासारखे सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून रुग्णांची सेवा करावी. आपला भ्रमणध्वनी व व्हाट्सअप क्रमांक सर्वसामान्य रुग्णांसाठी २४ तास खुला करून द्यावा. रुग्णांना डॉ. थोरात यांची उणीव भासू देऊ नये. असे आवाहन केले आहे.
एस.एम.युसूफ
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा