Breaking News

राष्ट्रीय महामार्गानंतर आता बीड नगर परिषदेचा एअरटेल कंपनीला दणका!

राष्ट्रीय महामार्गानंतर आता बीड नगर परिषदेचा एअरटेल कंपनीला दणका!जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांचे एअरटेलला काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

प्रकाश वडमारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

बीड।एस.एम.न्युज़ - शहरात एअरटेल ऑप्टिकल फायबर (OFC) केबल टाकण्यासाठी सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामाविरोधात अखेर बीड नगर परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानंतर आता बीड नगर परिषदेनेही एअरटेल कंपनीला दणका दिला असून, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत शहरातील सुरू असलेले ऑप्टिकल फायबरचे काम तात्काळ पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय एअरटेल लिमिटेड कंपनीला जा.क्र. ५७७६ अन्वये अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये शहरातील सुरू असलेले काम तात्काळ बंद करण्याचे तसेच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अहवाल व खुलासा नगर परिषद कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दखल; नगर परिषद प्रशासनाची कारवाई!

या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, बीड यांच्या दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशाची नगर परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र जा.क्र. १६५२२ याचा संदर्भ नगर परिषदेच्या नवीन नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्तरावरूनही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

यापूर्वी नगर परिषद प्रशासनाने दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीला नोटीस बजावली होती. तसेच दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राचाही नवीन नोटीसमध्ये संदर्भ देण्यात आला आहे. मात्र, वारंवार तक्रारी होऊनही खोदकाम आणि रस्त्यांच्या नुकसानीचा प्रश्न कायम असल्याने आता प्रशासनाने काम पूर्णतः बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकाश वडमारे यांच्या पाठपुराव्याला यश!

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मारुती वडमारे यांनी बीड शहरातील एअरटेल ऑप्टिकल फायबरच्या खोदकामामुळे रस्त्यांचे होणारे नुकसान, नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा वाढता धोका याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी, बीड नगर परिषद आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत सुरू असलेले खोदकाम थांबविण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत बीड नगर परिषदेने एअरटेल कंपनीला काम बंद करण्याचे निर्देश दिल्याने त्यांच्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

केवळ नोटीस नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!

मात्र, केवळ कागदोपत्री आदेश देऊन चालणार नाही. बीड शहरातील एअरटेलचे सर्व खोदकाम प्रत्यक्षात बंद झाले पाहिजे, खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्यात यावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीसह संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रकाश वडमारे यांनी केली आहे.

आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, तसेच एअरटेल कंपनीवर पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण बीडकरांचे लक्ष लागले आहे.

कोच - लईख़ शेख (लक्की सर)
संपर्क - 920 980 1768
S.K.P. Motor Driving School
Nursery road, Beed.

___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत