Breaking News

पुरस्कार वितरण समारंभात उपस्थितांच्या सहनशीलतेचा अंत

पुरस्कार वितरण समारंभात उपस्थितांच्या सहनशीलतेचा अंत

पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात उपस्थितांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जाऊ लागला आहे.

               समाजातील अनेक संस्था किंवा संघटनांकडून विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी चालणारी निवड प्रक्रिया एक ते सहा महिन्यापर्यंत चालते. त्यानंतर एकदाचे पुरस्कारार्थी ठरविले जातात आणि एखाद्या दिवशी, एखाद्या जागी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो. कार्यक्रम असतो पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा परंतु तत्पूर्वी आयोजकांकडून भाषणपीठावर (येथे मुद्दामहून व्यासपीठ शब्दाचा प्रयोग करत नाहीये) अर्धा एक डझन तथाकथित नामवंत मंडळींना आसनस्थ करण्यात येते. मग यातून एक-एक करत सर्वांची भाषणे उपस्थितांना ऐकवली जातात. बरं या भाषणातून उद्बोधनात्मक, प्रबोधनात्मक असे काही बहुमूल्य उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळते का? तर असे काहीही मिळत नसल्याचेच बहुतेक वेळा दिसते. तरीही अशा अर्धा एक डझन वक्त्यांच्या भाषणांचा उपस्थितांवर भडीमार करून कार्यक्रम चार-चार तासापर्यंत अक्षरशः ताणला जातो. यामुळे पुरस्कारार्थींसह उपस्थितही जाम मेटाकुटीला येतात. उपस्थितांची एकदा चुळबुळ सुरू झाली की मग पुरस्कार वितरण समारंभ सुरू करण्यात येतो आणि तो अगदी पाट्या टाकल्यासारखा भरभर उरकला जातो.

              ज्यांच्यासाठी  पुरस्कार वितरण समारंभ ठेवला जातो, त्याच पुरस्कारार्थींना पुरस्कारांनी सन्मानित करण्याकरिता अवघे काही सेकंदच आयोजकांकडून देण्यात येते. एक मिनिटाच्या आत पुरस्कारार्थी भाषणपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारत कसेतरी वेडेवाकडे फोटो घेतात. याचे कुठलेही सोयरसुतक ना आयोजकांना, ना भाषण करणाऱ्यांना असते. पुरस्कारार्थी ५, २५, ५० कितीही असो त्यांना १० ते ३० मिनिटाच्या आत पुरस्कार देऊन उरकण्यात येते. मात्र लांबलेल्या भाषणांमुळे सुरुवातीपासून ते पुरस्कार वितरण सुरू होईपर्यंत कार्यक्रम अडीच, तीन ते साडेतीन तासांचा झालेला असतो आणि संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत साडेतीन ते चार तासांची वेळ निघून गेलेली असते. यामुळे पुरस्कारार्थींसह उपस्थित ही पार त्रासून जातात. ही बाब लक्षात घेऊन आयोजकांनी पुरस्कार समारंभात अर्धा ते एक डझन वक्त्यांच्या रटाळ भाषणांऐवजी फक्त कार्यक्रमाचा सूत्रसंचालक, प्रस्ताविक करणारा एक, एका प्रमुख वक्त्याचे भाषण आणि शेवटी अध्यक्षीय भाषण अशा चारच व्यक्तींना बोलायची संधी दिली आणि पुरस्कारार्थींविषयी चांगली माहिती देऊन निदान त्याला पुरस्कार स्वीकारण्याकरिता दोन ते चार मिनिटे दिली तर त्याला व त्याच्यासोबत येणारे त्याचे कुटुंबीय आणि मित्रआप्तेष्ट यांनाही काहीतरी ढंगाचा पुरस्कार आपल्याला किंवा आपल्या माणसाला मिळाला याचे समाधान वाटेल. सध्या तरी असे समाधान पुरस्कारदात्यांकडून पुरस्कारार्थींना मिळत नसल्याचे अनेक पुरस्कार समारंभामध्ये दिसून येते. असे पुरस्कार समारंभ उपस्थितांच्या सहनशीलतेचा अंत पाहू लागले आहे.

*लेखन - एस.एम.युसूफ़*

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*

शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.

म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत