Breaking News

रेल्वे स्थानकासाठी बीड शहरांतर्गत शहर बस वाहतूक सेवा! एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे यांनी मांडला तिकिटाचा मुद्दा आणि मार्गांची यादी

रेल्वे स्थानकासाठी बीड शहरांतर्गत शहर बस वाहतूक सेवा!

एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे यांनी मांडला तिकिटाचा मुद्दा आणि मार्गांची यादी

बीड।एस.एम.न्युज़

नुकतेच बीड-अहिल्यानगर-पुणे या रेल्वे मार्गावर १७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथमच रेल्वे धावली आणि आता येत्या २२ सप्टेंबर २०२६ पासून दररोज बीड-पुणे व पुणे-बीड अशी रेल्वे धावणार आहे. तेव्हा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बीड शहरांतर्गत शहर वाहतूक बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण यांना दिलेल्या निवेदनातून केली असून शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांची यादीही सादर केली आहे.
                  याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड रेल्वे स्थानक सुरू झाले आहे. येत्या २३ सप्टेंबर २०२६ पासून दररोज तेथून बीड ते पुणे ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे. रेल्वे मार्ग सुरू झाल्याने आता पुणे सारखे महानगर बीड शहराला जवळ आल्यासारखे झाले आहे. रेल्वे स्थानक हे बीड शहरातील अनेक भागापासून अनेक किलोमीटर लांब असल्याने अहिल्यानगर-पुणे ला जाण्याकरिता रेल्वेचे तिकीट दर बसच्या मानाने अत्यंत कमी असले तरी रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याकरिता बीड शहरवासियांना आर्थिक अडचणीचे ठरणार आहे. बीड शहरवासियांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड होऊ नये, याकरिता बीड शहरातील काही मुख्य ठिकाणावरून प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याकरिता एस.टी. महामंडळाच्या बसेस ची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून रात्री रेल्वे स्थानकापर्यंत जाताना वाजवी दरात प्रवासी जाऊ शकतील. म्हणून शहरातील काही ठिकाण जेथून रेल्वे स्थानकापर्यंत शहर बस वाहतूक सेवा सुरू करणे गरजेचे आहे. बीड शहरांतर्गत शहरातील पाच ठिकाणाहून प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी रात्री ०८:०० वाजता शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी. जेणेकरून बीडहून अहिल्यानगर (अहेमदनगर), पुणे व मधील अन्य थांब्यावरील गावांना जाण्याकरिता निघालेल्या प्रवाशांना बीड रेल्वे स्थानकापर्यंत सुलभतेने पोहोचता येईल, असे एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.

बीड ला आलेल्या प्रवाशांसाठी सुद्धा रेल्वे स्थानकापासून शहर बस वाहतुक सुरू करणे आवश्यक

पुणे-अहिल्यानगर येथून आलेली रेल्वे बीड रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर तिथून प्रवाशांना शहराच्या विविध भागात येण्यासाठी निवेदनात उल्लेख केलेल्या सर्व मार्गावर जाण्याकरिता सुद्धा शहर वाहतूक बसची व्यवस्था आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

प्रथम या पाच मार्गांवरून शहर वाहतूक बस सुरू करणे आवश्यक

१) शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) पासून नाळवंडी नाका-तेलगाव नाका-बार्शी नाका-शिवाजीनगर पोलीस ठाणे चौक-पंचशील नगर-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.
२) एमआयडीसी एरिया पासून रामतीर्थ-मन्सूर शाह दरगाह-नवा मोंढा रोड-जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-तुळजाई चौक-आशा टॉकीज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.
३) आनंदवाडी पासून जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.
४) करपरा नदीपासून पांगरी रोड-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-पंचशील नगर रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.
५) चऱ्हाटा फाटा चौक पासून बालेपीर-पोलीस मुख्यालय-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.
शहरांतर्गत या सर्व मार्गांवरून रेल्वे स्थानकाकरिता ये-जा करण्यासाठी शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी.

शहर बससाठी पूर्ण तिकीट आकारावे

रेल्वे स्थानकासाठी शहर बस वाहतूक सेवा सुरू केल्यावर त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण तिकीट आकारले जावे. त्यात अर्धे तिकीट, पाव तिकीट, पूर्णतः मोफत अशा एस.टी. महामंडळाच्या इतर बसेसच्या सवलती देण्यात येऊ नये. जेणेकरून ही शहर बस वाहतूक सेवा एस.टी. महामंडळाला ही परवडली पाहिजे आणि प्रवाशांनाही वेळेवर बस मिळाली पाहिजे. याकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून शहर बस वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर ती बंद पडू नये. असेही शेवटी नमूद केले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत