अनावृत्त पत्र धडाकेबाज धाडसत्र... पण कोर्टात काय?
अनावृत्त पत्र
धडाकेबाज धाडसत्र... पण कोर्टात काय?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्यासाठी एका सजग नागरिकाचे 'अनावृत्त पत्र'
प्रति,
मा. श्री. तुकाराम मुंढे (I.A.S.) आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन (FDA), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महोदय,
सस्नेह नमस्कार.
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची धुरा आपण हाती घेतल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोराविरुद्ध सुरू असलेले आपले धाडसत्र अत्यंत कौतुकास्पद आणि स्पृहणीय आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील दूध, पनीर, मावा आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थांमधील विषारी भेसळ उघड करण्यासाठी आपण जे 'युद्ध' पुकारले आहे, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रशासनाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपले हे 'सिंघम' आणि 'नायक' रूप पाहून गैरव्यवहार करणाऱ्या मोठ्या उद्योजकांपासून ते स्थानिक माफियांपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहेत. याबद्दल एक सजग नागरिक म्हणून आपले मनःपूर्वक त्रिवार अभिनंदन!
*तथापि...*
आपल्या या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यात रोज शेकडो नवीन गुन्हे आणि खटले न्यायालयात दाखल होत असतीलही. *पण महोदय, "पुढे काय?"* हा प्रश्न आज अत्यंत गंभीर बनला आहे. आपण घेतलेल्या अतोनात कष्टावर आणि धाडसी कारवाईवर कनिष्ठ पातळीवरील अन्न निरीक्षकांची निष्क्रियता आणि सरकारी वकील यंत्रणेची उदासीनता पाणी फिरवणार नाही ना? याची प्रचिती देणारे आणि थेट *अन्न व औषध प्रशासनाच्या कायदेशीर अपयशाचे वाभाडे काढणारे एक अत्यंत धक्कादायक वास्तव* मी आपल्यासमोर मांडत आहे. हे वास्तव वाचल्यानंतर आपल्यालाही तीव्र खेद वाटल्याशिवाय राहणार नाही.
*१७ वर्षांची प्रदीर्घ कायदेशीर लढाई आणि 'एफडीए'ची अक्षम्य निष्क्रियता:*
महोदय, मी स्वतः *राजेंद्र धारणकर (रा. पुणे),* एक साधारण नागरिक. ९ मे २००८ रोजी मी पुणे येथील 'एच.पी. गॅस' वितरकाकडून ' *Miltea Gold* ' नावाचा चहा खरेदी केला होता. त्या पुड्यावर उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट किंवा एफडीएचा परवाना क्रमांक असे काहीही नव्हते. जनआरोग्याचा प्रश्न असल्याने मी स्वतःचा जीव धोक्यात घालून, जोखीम पत्करून अत्यंत मोठ्या कंपन्यांविरुद्ध (H.P. Gas dealer, मे. मार्स टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) थेट एफ.डी.ए. पुणे कार्यालयाकडे दि. 04/05/2008 रोजी समक्ष लेखी तक्रार नोंदवली.
माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या विभागाने धाड टाकून घायरी येथील गोदामातून *६,१६३ किलो घातक रंग मिश्रित चहा पावडर जप्त केली, ज्याची तत्कालीन किंमत ९ लाख ४७ हजार रुपये होती.* राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या विश्लेषण अहवालानुसार (अहवाल क्र. ५८२/४३९१) या चहामध्ये ' *Sunset Yellow FCF' आणि 'Carmosine' हे मानवी आरोग्याला अत्यंत घातक असणारे कृत्रिम रासायनिक रंग आढळले होते.*
या भक्कम पुराव्यांच्या आधारे एफडीएने पुणे मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) न्यायालयासमोर दोन नियमित फौजदारी खटले दाखल केले:
1. R.C.C. No. 405250/2008 (दाखल दिनांक: १२/१२/२००८)
2. R.C.C. No. 405526/2008 (दाखल दिनांक: २९/१२/२००८)
*२५० न्यायालयीन तारखा आणि निकाल काय? तर गुन्हेगार निर्दोष!*
महोदय, तब्बल १७ वर्षे हा खटला न्यायालयात प्रलंबित राहिला. या कालावधीत काय घडले?
• खटला क्र. ४०५५२६/२००८ मध्ये तब्बल १४९ सुनावणीच्या तारखा पडल्या.
• खटला क्र. ४०५२५०/२००८ मध्ये तब्बल १०० न्यायालयीन तारखा पडल्या.
परंतु, अत्यंत शरमेची बाब म्हणजे, *फेब्रुवारी २०२६ मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी कीर्ती प्रवीण जैन-देसरडा यांनी हे दोन्ही खटले "Want of Prosecution" (फिर्यादीने पाठपुरावा न केल्यामुळे) अंतर्गत फेटाळून लावले!*
न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट शब्दांत ताशेरे ओढले आहेत की:
_*"तक्रारदार (FDA अन्न निरीक्षक) आरोपींची उपस्थिती न्यायालयात सुनिश्चित करण्यात अपयशी ठरले. अनेक वर्षांपासून पुढील कोणतीही कायदेशीर पावले (Steps) उचलली गेली नाहीत. असे दिसते की तक्रारदाराला हा खटला चालवण्यात आता कोणताही रस उरलेला नाही."*_
महोदय, न्यायालयात आपल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तारखांची कारणे पाहिली तर डोके चक्रावून जाईल. खटला १ मध्ये १३ वेळा आणि खटला २ मध्ये तब्बल ८० वेळा आपल्या अन्न निरीक्षकांनी *"Steps_Unready"* (पुढील कायदेशीर पावले उचलण्यास अपूर्ण तयारी) म्हणून तारखा मागून घेतल्या! न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट (NBW) आरोपींवर बजावण्यास पोलीस व अन्न निरीक्षकांनी २२ वेळा दुर्लक्ष केले. आरोप निश्चितीपूर्वीचा पुरावा (Evidence Before Charge) नोंदवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने तब्बल ४६ सुनावण्या दिल्या, तरीही आपले अधिकारी न्यायालयात साक्षीदार उभे करू शकले नाहीत!
*गैरकारभाराचे हेच सत्र राहिले, तर सध्याच्या आपल्या धाडसत्राचे काय होणार?*
महोदय, हा माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. आज आपल्या नेतृत्वाखाली एफ.डी.ए. अत्यंत जोमाने धाडी टाकत आहे. परंतु, आय.ए.एस. अधिकाऱ्यांची बदली साधारणपणे २ ते ३ वर्षांनी होते. आपल्या बदलीनंतर आपल्या कडक कार्यकाळात दाखल झालेल्या शेकडो खटल्यांचे काय होणार? जर आपल्या विभागातील अन्न निरीक्षक आणि सरकारी वकील पुन्हा न्यायालयात "Steps_Unready" म्हणून बसून राहिले, तर आज आपण पकडलेले भेसळखोर १७ वर्षांनंतर अशाच तांत्रिक कारणास्तव सन्मानाने सुटतील आणि आपण जप्त केलेले विषारी अन्न पुन्हा जनतेच्या ताटात येईल!
एका प्रामाणिक नागरिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून माफियाविरुद्ध पुरावे द्यायचे, साडेसहा हजार किलो विषारी चहा जप्त करून द्यायचा आणि आपल्या विभागाच्या निष्काळजीपणामुळे आरोपी कोर्टातून हसत हसत सुटायचे, हा कायद्याचा आणि जागरूक नागरिकाचा घोर अपमान नाही का?
*माझ्या या अनावृत्त पत्राद्वारे आपल्याकडे थेट ४ मागण्या आहेत:*
1. *तात्काळ अपील दाखल करा:* पुणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या या संतापजनक निकालाला मुंबई उच्च न्यायालयात कलम ३७८(४) CrPC अंतर्गत आव्हान देण्यासाठी पुणे एफ.डी.ए. विभागाला तात्काळ आदेश द्यावेत आणि हे दोन्ही खटले पुन्हा सुरू करावेत.
2. *दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई:* १७ वर्षांत तब्बल १०० हून अधिक वेळा "Steps_Unready" राहणाऱ्या आणि न्यायालयाचे वॉरंट न बजावता आरोपींना मदत करणाऱ्या संबंधित अन्न निरीक्षकांची तात्काळ विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
3. ' *कोर्ट केस मॉनिटरिंग सेल'ची स्थापना:* एफ.डी.ए. मुख्यालयात सर्व प्रलंबित खटल्यांच्या दैनंदिन देखरेखीसाठी एक विशेष संगणकीय कक्ष सुरू करावा, जेणेकरून सुनावणीच्या दिवशी अधिकारी न्यायालयात हजर राहतील आणि 'Steps_Unready' सारख्या नामुष्कीजनक तारखा पडणार नाहीत.
4. *जुन्या प्रलंबित खटल्यांचे ऑडिट:* महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सर्व एफ.डी.ए. खटल्यांचे तात्काळ कायदेशीर ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किती गुन्हेगार सुटले आहेत हे समोर येईल. व यापुढे अशाप्रकारे खटले dismiss होणार नाहीत याची उपाय-योजना आपणास करता येईल.
महोदय, आपण या विभागाला नवी दिशा देत आहात. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पुणे येथील त्या दोन्ही चहा भेसळ खटल्यातील गुन्हेगारांना पुन्हा पिंजऱ्यात उभे कराल आणि कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांवर कठोर बडगा उचलाल.
माझ्या पत्राची दखल घेऊन आपल्याकडून योग्य न्याय मिळेल, याच अपेक्षेसह!
राजेंद्र दिनकर धारणकर
कार्याध्यक्ष, सिस्कॉम पुणे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा