Breaking News

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्जदार झाले बेजार बॅंकांचे कर्ज फेडण्यासाठी मराठा तरुण सावकाराच्या दारात - जे.डी.शाह

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्जदार झाले बेजार

बॅंकांचे कर्ज फेडण्यासाठी मराठा तरुण सावकाराच्या दारात - जे.डी.शाह

बीड (एस.एम.न्युज़) - मराठा समाजातील
तरुणांना हक्काचा रोजगार आणि उद्योजक बनवण्याचे स्वप्न दाखवून स्थापन झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सध्या निधी अभावी अडचणीत सापडले आहे. महामंडळाच्या माध्यमातून १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरुवातीला अत्यंत यशस्वी ठरली. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनेतील लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने बीड जिल्ह्यासह राज्यभरातून मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सरकारकडून व्याजाचा परतावा मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक तरुण उद्योजकांनी आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि योजनेतून बाद होऊ नये म्हणून चक्क आपल्या जवळच्या खासगी सावकारांच्या दारात उभे राहिले आहे. ही बाब खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण खासगी सावकारांचा फास आवळला गेला तर मराठा तरुणांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व आमदार, मंत्री यांनी वेळीच लक्ष देऊन व्याजाचा परतावा मिळवून द्यावा अशी मागणी समाजसेवक जे.डी.शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना सक्षम स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार कडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे - एकूण नोंदणीकृत अर्जदार ४ लाख २२ हजार, बँक कर्ज मंजूर लाभार्थी १ लाख ८० हजार, त्यांना आतापर्यंत झालेला व्याज परतावा १,६३३ कोठी ५१ लाख रुपये आहे तर
वितरित केलेली कर्ज रक्कम १८ हजार २२२ कोटी रुपये. महामंडळाची सरकारकडे नवीन मागणी ४०० कोटींची आहे. हा निधी मिळाल्यास प्रलंबित व्याजाचा प्रश्न सुटू शकणार आहे. तोपर्यंत मात्र राज्यातील हजारो मराठा तरुण उद्योजक हप्त्यांच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.
कारण गेल्या एक वर्षापासून जिल्ह्यातील तरुण राज्य सरकारकडे तातडीने व्याजाचा परतावा करण्याची मागणी करत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले हे महामंडळ सरकार बंद करण्याच्या विचारात आहे का? अशी शंका आता मराठी तरुणांच्या मनात उपस्थित होत आहे. दुसरीकडे सरकारने लवकरात लवकर निधी न दिल्यास मराठा समाजातील तरुणांना फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल. वेळीच खासगी सावकारांच्या जाचाला मराठा व्यवसायीक तरुण लागला तर भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून मागचा इतिहास पाहता आमदार, खासदार, मंत्री यांनी आपले घरे सुरक्षित ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील मराठा समाजातील तरुणांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशारा पत्रात दिला आहे.
पत्रात शेवटी म्ह्टले आहे की, नियमानुसार लाभार्थ्याने बँकेचे तीन हप्ते नियमित भरले की महामंडळ त्यावरील व्याजाचा परतावा लाभार्थ्याच्या खात्यात जमा करते. जर एक जरी हप्ता चुकला तर लाभार्थी योजनेतून कायमचा बाद होतो. या भीतीपोटी मराठा तरुणांनी बँकांचे हप्ते वेळेवर भरले, पण आता सरकारने व्याजाचा परतावा रोखल्याने हे तरुण आर्थिक कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कर्जाचा परतावा सरकारकडून हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी मराठा  समाजातील तरुणांच्या वतीने समाजसेवक जे.डी.शाह यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत