सेवानिवृत्त मुख्याध्यापक उस्मान खान पठाण यांचे निधन; आज दुपारी ०३:०० वाजता होणार दफनविधी
सेवानिवृत्त मुख्याध्यापक उस्मान खान पठाण यांचे निधन
आज दुपारी ०३:०० वाजता होणार दफनविधी
बीड।एस.एम.न्युज़
सायं. दैनिक बीड किसान चे कार्यकारी संपादक अदनान खान पठाण यांचे वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक उस्मान खान पठाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची नमाज़ ए जनाज़ा आज दिनांक १४ मे २०२६ गुरुवार रोजी दुपारी ०३:०० वाजता बालेपीर दरगाह मस्जिद येथे पठण करण्यात येणार आहे तर दरगाह कब्रस्तान येथेच दफनविधी करण्यात येणार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्ष होते.
उस्मान खान सर हे प्रथम सहशिक्षक म्हणून शिक्षण विभागात रुजू झाले होते. शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊन चांगले विद्यार्थी घडवीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना काही वर्षातच मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली होती. विद्यार्थ्यांना नेहमी चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे हाच ध्यास त्यांना नेहमी असायचा. विद्यार्थ्यांना ते आपल्या मुलांप्रमाणे जीव लावायचे. शिक्षक म्हणून ते जेवढे कर्तव्यदक्ष होते तेवढेच कठोर निर्णय घेणारे म्हणूनही प्रसिद्ध होते. शाळा, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कठोर निर्णय घेतले होते म्हणून ते सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यावरही समाजात तेवढेच लोकप्रिय होते.
गेल्या काही काळापासून वृद्धापकाळाने आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांच्या शरीराने उपचारांना साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत अखेर मालवली. त्यांच्या निधनाने खान कुटुंबीयांनी घरातला कर्ता पुरुष आणि समाजाने एक चांगला सुहृदयी हाडाचा शिक्षक गमावला. त्यांच्या पश्चात तीन मुली-जावई, एक मुलगा-सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे खान कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा