ना इंसान तुझ्सा तेरे बाद आया, हॅरीसन रेड्डी तू बहुत याद आया!
ना इंसान तुझ्सा तेरे बाद आया, हॅरीसन रेड्डी तू बहुत याद आया!
रेड्डी साहब को गुज़रे हुए पाँच साल गुज़रे, उनके चाहनेवाले दिल से हमेशा कहते है - ना इंसान तुझ्सा तेरे बाद आया, हॅरीसन रेड्डी तू बहुत याद आया!
हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पश्चात चंपावतीरत्न पुरस्काराचे भावनात्मक वातावरणात वितरण
डॉ. संजय तांदळे, प्रवीण पालीमकर, एस.एम.युसूफ़ यांचा पुढाकार
मान्यवरांसह उपस्थितांकडून तिघांच्या पाठीवर कौतुकाची थाप
बीड।एस.एम.न्युज़
अवलिया अजातशत्रू व्यक्तिमत्व, हळवे समाजसेवक दिवंगत हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पश्चात चंपावतीरत्न पुरस्काराचे भावनात्मक वातावरणात वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थींमध्ये पोलीस अधिकारी, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार यांचा समावेश होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय तांदळे, प्रवीण पालीमकर आणि एस.एम.युसूफ़ यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मान्यवरांनी तिघांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिनांक २४ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रात्री नऊ वाजेपर्यंत चालला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला ताई मोराळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहासकार प्रा. सतीश साळुंखे, प्रा. सविताताई शेटे, शिक्षक नेते उत्तमराव पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, मारियन रेड्डी यांची उपस्थिती होती.
यावेळी रेड्डी यांचे बालपणीचे मित्र प्रा.डॉ. सतीश साळुंखे यांनी रेड्डी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनीही साध्या, सरळ, सोज्वळ, समाजसेवकांबद्दल समाजात जी अनास्था निर्माण झाली आहे ती अत्यंत भावनात्मकरीत्या विषद केली. प्रा. सविता शेटे यांनी रेड्डी यांच्या स्मृतीसह पुस्तक दिनाचे औचित्य साधून अलीकडच्या काळात लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृती बद्दल खंत व्यक्त केली. शिक्षक नेते उत्तमराव पवार, मारियन रेड्डी यांनीही आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले.
कार्यक्रमात बाजीराव ढाकणे, डॉ. पवळ, डॉ. गणेश ढवळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विद्यमान नोडल अधिकारी मिसबाहुल आबेदिन खतीब, विकास सर्वदे सर, पठाण अमर जान, फारुख शेख, लईख शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आयोजकांसह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी तसेच सभागृहात उपस्थित प्रत्येकाने रेड्डी यांच्या कार्यावर अनेक भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
*म्हणून या पुरस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण*
हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांनी २०२१ साली निवड केलेल्या सर्व पुरस्कारांची स्मृतिचिन्हे तयार करून ठेवली होती. लवकरच कार्यक्रम घेऊन ते पुरस्कारार्थींना चंपावतीरत्न पुरस्कार वितरित करणार होते. त्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे २० एप्रिल २०२१ ला निधन झाले. त्यांचे हे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते प्रविणकुमार पालीमकर आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पुढाकार घेतला व २० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अवघ्या दोनच दिवसात नियोजन करून २४ एप्रिल २०२६ रोजी चंपावतीरत्न पुरस्कारांचे वितरण केले. रेड्डी साहेबांनी निवडलेल्या चंपावतीरत्नांना त्यांच्या पश्चात कार्यक्रम घेऊन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने या पुरस्काराचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.
*पुरस्कारार्थी शोधताना मोठी कसरत*
चंपावतीरत्न पुरस्कारासाठी हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांनी निवडलेल्या पुरस्कारार्थींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त पुरस्कारार्थींना डॉ. संजय तांदळे, प्रवीण पालीमकर आणि एस.एम.युसूफ़ ओळखत नव्हते. स्मृती चिन्हावर असलेल्या नावाशिवाय त्यांच्याविषयी इतर कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यांचे पत्ते किंवा संपर्क क्रमांक काहीही माहीत नसताना, तिघांनी मिळून फक्त स्मृती चिन्हावर असलेल्या नावावरून अवघ्या दोनच दिवसात पुरस्कारार्थी शोधून काढले. मात्र यासाठी तिघांनाही मोठी कसरत करावी लागली.
*रेड्डी साहेबांचे वर्ग मित्र मज़हरूद्दीन शेख यांच्याकडून भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात*
या कार्यक्रमाची सुरुवात बीड शहरातील प्रसिद्ध संगीत विशारद गायक तथा रेड्डी यांचे वर्गमित्र मज़हरुद्दीन शेख यांनी - "ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान" हे भक्तीगीत गाऊन केली.
*हॅरी सारखी माणसं आता राजकारणात तयार होत नाहीत तर खऱ्या समाजसेवकांना सामाजिक पाठबळ मिळत नाही - सुशीलाताई मोराळे*
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्रा. सुशीला ताई मोराळे यांनी म्हटले, हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी हा अत्यंत सडेतोड आणि परखड असा नेता होता. त्याने समाजसेवेसह जेव्हा राजकारणात पाऊल ठेवले तेव्हा तो माझा कार्यकर्ता होता. यामुळे त्याचे व्यक्तिमत्व मला चांगल्या प्रकारे माहीत होते. आता अशी माणसं राजकारणात तयार होत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे आणि समाजकारणात असे निस्वार्थी समाजसेवक असले तरी त्यांना सामाजिक पाठबळ मिळत नाही. ही त्यापेक्षा जास्त मोठी शोकांतिका आहे असे म्हटले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा