स्काऊट चळवळीचा आधारस्तंभ हरपला ज्येष्ठ शिक्षक, पत्रकार मधुकर सरपते यांचे निधन
स्काऊट चळवळीचा आधारस्तंभ हरपला
ज्येष्ठ शिक्षक, पत्रकार मधुकर सरपते यांचे निधन
बीड (एस.एम.न्युज़) - मादळमोही येथील रहिवासी तसेच ज्येष्ठ शिक्षक, पत्रकार आणि स्काऊट चळवळीतील मार्गदर्शक मधुकर अप्पाराव सरपते यांचे दिनांक १५ एप्रिल २०२६, बुधवार रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मादळमोहीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शिक्षण, सामाजिक व स्काऊट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मधुकर सरपते यांनी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, गेवराई येथे शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच पत्रकारितेतही सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनजागृती केली. मात्र त्यांची खरी ओळख स्काऊट चळवळीतील निष्ठावंत, कर्तव्यदक्ष आणि प्रेरणादायी मार्गदर्शक अशीच होती. स्काऊट चळवळीत त्यांनी आयुष्यभर निस्वार्थी सेवा दिली. जिल्हा मेळाव्यांमध्ये स्वतः पहाटे उठून साधेपणाने दिनक्रम पार पाडत असताना इतरांसाठी मात्र उत्तम सोयी उपलब्ध करून देण्याची त्यांची वृत्ती सर्वांसाठी आदर्श ठरली. भोजन समिती प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येकाला वेळेवर चहा, नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी घेतलेली मेहनत आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या परिश्रमशील वृत्तीची प्रचिती त्यांच्या दैनंदिन जीवनातूनही दिसून येत होती. वयाची पर्वा न करता मादळमोही ते पाडळसिंगी असा पायी प्रवास करून वर्तमानपत्र आणण्याची त्यांची जिद्द तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘श्रावण बाळ’ योजनेअंतर्गत केलेले प्रयत्नही उल्लेखनीय होते. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले, तर पत्रकार म्हणून समाजातील प्रश्नांना वाचा फोडली. शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, हसतमुख स्वभाव आणि सेवाभाव हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयांचेच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण, सामाजिक आणि स्काऊट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, मुलगी व जावई पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड असा मोठा परिवार आहे.
मरणोपरांत सरपते कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला आदर्श
मधुकर सरपते यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या अस्थींना नदीत विसर्जित करण्याऐवजी त्यांच्या शेतात खड्डा खांदून त्या जागी चिकूचे झाड लावण्यात आले. दहावा, तेरावा असे विधिवत कार्यक्रम टाळून पर्यावरण पूरक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा