बेरोजगार तरुणांची कंपन्यांच्या नोकऱ्यांकडे पाठ!
बेरोजगार तरुणांची कंपन्यांच्या नोकऱ्यांकडे पाठ!
*राज्यातच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशात एकीकडे बेरोजगारी भरमसाठ वाढली आहे तर दुसरीकडे कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांकडे बेरोजगार तरुण पाठ फिरवू लागले आहेत. या मागची कारणे काय चला जाणून घेऊ यात.*
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात मिळालेल्या नोकऱ्यांच्या ऑफरकडे बेरोजगार तरुणांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. या रोजगार मेळाव्यात बेरोजगार तरुणांना १२ ते १८ हजार रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्यांसाठी ऑफर लेटर देण्यात आले होते. मात्र अनेक तरुणांनी प्रत्यक्ष नोकरीत रुजू होण्यात रस दाखविला नसल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विविध ट्रेड उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनाही आपापल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पाचारण केले होते. यानंतर काही विद्यार्थी संबंधित कंपन्यांमध्ये गेले देखील आणि त्यांनी काही दिवस कंपन्यांमध्ये कामही केले परंतु तिथे होत असलेले हाल बघून गेलेले विद्यार्थी बीडला परत आले.
एकीकडे चांगल्या नोकऱ्या मिळत नसल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे. तर दुसरीकडे रोजगार मेळाव्यात ५१ तरुणांना थेट ऑफर लेटर देण्यात आले असतानाही महिनाभरात फक्त चार बेरोजगार तरुणच नोकरीवर रुजू झाले. १२ जानेवारी रोजी अंबाजोगाई तालुक्यात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुणे, औरंगाबाद, अहेमदनगर आणि बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून भरती प्रक्रिया राबवली होती. या मेळाव्यात एकूण ५५७ रिक्त पदे होती. यासाठी बीड जिल्ह्यातील २३२ तरुण मेळाव्यात सहभागी झाले होते. यातून शिक्षण व पात्रतेनुसार काही कंपन्यांनी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्यांसाठी ५१ तरुणांना ऑफर लेटर दिले. हा मेळावा होऊन एक महिना संपला तरी आतापर्यंत फक्त चार तरुणच नोकरीत रुजू झाले आहेत. यामुळे जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु नाराजी व्यक्त करताना तरुणांनी कंपन्यांच्या या नोकऱ्यांकडे का पाठ फिरवली? या मागची कारणे काय? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रोजगार मेळाव्यातून बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याच्या निमित्ताने विविध कंपन्या पुढे येतात खरे मात्र त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या नोकऱ्या या कायमस्वरूपी नसतात. त्या तात्पुरत्या स्वरूपातील असतात. कंपन्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास कंपन्यांमध्ये पर्मनंट, टेम्पररी किंवा कॅज्युअल अशी नावे कामगारांच्या पदांना असतात. पर्मनंट कामगारांना चांगल्या पगारासह सर्व सोयी सुविधा असतात. टेम्पररी किंवा कॅज्युअल कामगारांना पगार नाममात्र आणि इतर कोणत्याही सोयी सुविधा नसतात. कामावर असताना कॅन्टीनच्या जेवणाचे कुपन सुद्धा दिले जात नाही. एवढंच काय अशा कामगारांना कामावर असताना काही दुखापत वगैरे झाली किंवा त्यांच्या जीवावर बेतले तर त्याची हमी किंवा जबाबदारी सुद्धा अशा कंपन्या घेत नाहीत. त्यांनी तशा प्रकारचे लिखित एग्रीमेंट तयार करून कामगारांना कामावर ठेवण्यापूर्वीच त्याच्यावर कामगारांची सही घेतलेली असते. शिवाय पर्मनंट कामगारांच्या तुलनेत टेम्पररी किंवा कॅज्युअल कामगारांना राबराब राबविले जाते. ज्या तरुणांना याबद्दल माहिती आहे असे तरुण मिळत असलेल्या या नोकऱ्या नाकारतात. कंपन्याकडून देण्यात येणारे पगार आणि कंपनी ठिकाणी जाऊन राहायला लागणारा खर्च, ज्यात घर भाडे, जेवणाची खानावळ याचा ताळमेळ म्हणावा तसा लागत नाही. कंपन्यांकडून १५ ते २० हजार पगार देण्यात येत असला तरी कंपन्यांच्या ठिकाणी भरमसाठ घर भाडे असतात. जेवणाच्या खानावळी इतर ठिकाणांपेक्षा जास्तीच्या दराने जेवण देतात. तिथे एक बेरोजगार तरुण अशा कंपन्यांमध्ये १५ ते २० हजार रुपये महिना कमवत असला तरी त्याच्या एकट्यासाठी नोकरीच्या ठिकाणी घर भाडे व दोन वेळेस चे जेवण आणि सकाळ चा नाश्ता यातच १२ ते १५ हजार रुपये खर्चाला लागतात. मग अशा कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांच्या हातात दरमहा उरतंय काय? ते गावी आपल्या आई-वडिलांना देणार काय? असे प्रश्न त्यांच्या समोर आवासून उभे राहतात. सगळीकडे महागाई भरमसाठ वाढली आहे. वाढलेल्या महागाई प्रमाणे बेरोजगार तरुणांना पगार मिळाले पाहिजे. याकडे असे रोजगार मेळावे आयोजित करणाऱ्यांसह कंपन्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
लेखन - एस.एम.युसूफ़
आसेफ़नगर, बीड
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा