बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे निवेदन अन् अशी मागणी
बीड शहरांतर्गत रस्त्यांवर हवाई वाहतूक सेवा सुरू करा
एस.एम.युसूफ़, रमेशराव गंगाधरे यांची ना. अजित पवार यांच्याकडे अफलातून मागणी
बीड (एस.एम.न्युज़) -
शहरांतर्गत रस्त्यांवर हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी. अशी अफलातून मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ना. अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याच्या अनेक वर्षांपूर्वीपासून बीड शहरातील काही रस्ते अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना पादचाऱ्यांसह सायकल स्वार, दुचाकी चालक, तीन चाकी, चार चाकी वाहनांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेकांना पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास उद्भवत आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहे.
म्हणून निवेदनात उल्लेख केलेले सर्व रस्ते व नाल्यांचे काम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या सर्व रस्त्यांवर हवाई वाहतूक सुरू करावी. जेणेकरून खराब रस्त्यांच्या एका टोकावर हवाई वाहतूक यानात (छोटे हेलिकॉप्टर किंवा तत्सम यान) बसून दुसऱ्या टोकावर ये-जा करणे नागरिकांना सोपे जाईल म्हणून शक्य तितक्या लवकर वर उल्लेख केलेल्या सर्व रस्त्यांवर रस्ते व नाल्या चांगल्या होईपर्यंत हवाई वाहतूक सेवा आणि तीही विनामूल्य सुरू करावी अशी मागणी केली आहे.
*हे आहेत बकाल झालेले रस्ते*
त्रासदायक झालेल्या रस्त्यांमध्ये बीड शहरातील १) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस-कारंजा़ टॉवर-बलभीम चौक-जुना बाजार मार्गे चांदणी चौकापर्यंत चा रस्ता. २) राजुरी वेस ते बुंदलपुरा-कबाडगल्ली मार्गे माळी वेस पोलीस चौकी पर्यंत चा रस्ता. ३) कारंजा टॉवर ते जुनी भाजी मंडई मार्गे बुंदलपुरा पर्यंतचा रस्ता. ४) बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस पर्यंतचा रस्ता. ५) अहेमदनगर रोड ते पालवण चौकापर्यंतचा धानोरा रस्ता आणि ६) बलभीम चौक ते बलभीम कॉलेज, मिल्लिया शाळा-कॉलेज, काली मस्जिद-भीम नगर-कागज़ी दरवाज़ा परिसरातील रस्त्यांचा मुख्यत्वे समावेश आहे. वर उल्लेख केलेले सर्व रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बकाल अवस्थेत गेले आहेत.
*गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठविला जातोय*
बकाल झालेल्या सर्व रस्त्यांसाठी आतापर्यंत अनेक समाजसेवकांनी, संघटनांनी, विरोधी राजकीय पक्षांनी सुद्धा वेळोवेळी शासन-प्रशासनाला निवेदने देवून आवाज उठविला आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने ही केलेली आहेत. परंतु याचा काही एक परिणाम लोकप्रतिनिधींसह शासन किंवा प्रशासनावर होत असल्याचे दिसत नाही.
*रस्ते-नाल्या करून कुठे तप तर कुठे दोन तप झाले*
फुटा-फुटावर खड्डेच खड्डे पडलेल्या या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. यापैकी शिवाजी चौक ते बलभीम चौक व बलभीम चौक ते माळीवेस चौक पर्यंत तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मास्टर प्लॅनची अंमलबजावणी केल्यानंतर रस्ते व नाल्यांचे निर्माण केले होते. त्याला आता जवळपास एक तप लोटला आहे. त्यांच्यानंतर एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा बीड नगर परिषदेने किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने या खितपत पडलेल्या रस्त्यांचे पूर्णतः नूतनीकरण करणे तर दूर या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची सुद्धा तसदी घेतली नाही.
*खड्डे बुजविण्याची प्रक्रिया तर करूच नका*
रस्त्यांची खराब अवस्था पाहता कॉंक्रिटीकरणाने किंवा डांबरीकरणाने खड्डे बुजविण्याची प्रक्रिया अजिबात करता कामा नये. कारण येथे आभाळ फाटले आहे म्हणून ठिगळ लावून उपयोग नाही. तर संपूर्ण फाटलेले आभाळच बदलावे लागेल तरच नागरिकांची नरक यातनेतून सुटका होईल, असेही निवेदनात एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी नमूद केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा