सायं. दैनिक बीड किसान ने शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करून आपले नाव सार्थक केले - एस.एम.युसूफ़
सायं. दैनिक बीड किसान ने शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करून आपले नाव सार्थक केले - एस.एम.युसूफ़
दैनंदिन जीवन जगताना "नावात काय आहे" असे विख्यात शेक्सपियरने म्हटल्याचे आपण अनेकदा ऐकतो. परंतु नावात बरेच काही दळलेले असते म्हणूनच चांगली कामे करून कुणी आपले नाव सार्थक करतात तर काही निरर्थक. आज इथे मी आपल्याला सायं. दैनिक बीड किसान ने आपल्या वृत्तपत्राचे नाव सार्थक केल्याचे या वृत्तपत्रात नुकताच शेतकऱ्यांप्रती प्रकाशित करण्यात आलेल्या एका विशेष संवेदनशील संपादकीय लेखामुळे दिसून आले. हाच लेख मी वाचकांसाठी आपल्या एस.एम.न्युज़ वेब पोर्टलवर घेण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.
*साभार - सायं. दैनिक बीड किसान*
दैनिक किसान मधील विशेष संपादकीय अग्रलेख
*राज्यात गौरक्षा म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार...*
*सासूच्या जीवावर जावई सुबेदार...*
राज्यात गौरक्षा हा मुद्दा तापलेला असून यासाठी पण शासन आणि काही तथाकथित गौरक्षक म्हणून घेणारे मुस्लिम आणि दलितांना टार्गेट करीत आहेत. यामुळे आता ही जनावरेच खरेदी न करण्याचा निर्णय कुरेशी समाजाने घेतला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यावर तोडगा काढा म्हणतोय पण गौरक्षक म्हणून घेणारे सरकार आणि वाहने अडवून तुंबडी भरणारे कथित गोरक्षक पुढे येऊन या जनावरांची खरेदी करताना दिसत नाहीत. पण सध्याही शेतकऱ्यांनाच उपदेशाचे डोस पाजण्यात येत आहेत पण या उपदेशाने शेतकऱ्यांच्या पोटाची आग थांबणार का? हा प्रश्नच आहे. यामुळे महाराष्ट्राचे गौरक्षा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार अन् सासूच्या जीवावर जावई सुबेदार' असे दिसून येत आहे. यामुळे सरकारने पुढे येऊन भाकड गायी आणि म्हतारे व बिना कामाचे जनावरे शेतकऱ्यांकडून खरेदी करावीत. या जनावरांची मरेपर्यंत सेवा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याचा ठिकाणी शासकीय गोठा बांधून सर्व गौरक्षकांची ना मानधन, ना जेवण फक्त सेवा तत्वावर नियुक्ती करावी तर तुमच्या गौरक्षणाला महत्व प्राप्त होईल.
महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात आलेला आहे. याच कायद्याचा आधार घेत व गाय पट्ट्याचे अनुकरण करीत महाराष्ट्रात कथित गोरक्षकांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. ते जनू काही शासनाचे जावई आहेत, याप्रमाणे रात्री-बेरात्री कधीही जनावरे घेऊन जाणारी वाहने अडवून मारहाण करणे, पैसे, माल लूटने असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत अन् घडत आहेत. बरं पकडलेले प्रत्येक जनावर कत्तलीलाच घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात येतो. पोलीस प्रशासनही या कथित गोरक्षकांचे हस्तक बनले की, काय असा संशय निर्माण होत आहे. तेही काहीच शहानिशा न करता ही जनावरे ताब्यात घेतात व एखाद्या गोशाळेत पाठवून देतात. नंतर ज्यांची जनावरे आहेत ते कोर्टात जाऊन आम्ही व्यापारी असून जनावरे विक्रीला घेऊन जात असल्याचे पुरावे दाखवून सिद्ध करुन जनावरे सोडण्याची ऑर्डर घेऊन येतात. जनावरे ताब्यात घेण्यासाठी गेले तर तिथे जनावरेच नसतात, मग ही जनावरे कुठे जातात? हा प्रश्नच आहे. गोरक्षकांचे ऐकून जनावरे लगेच ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांनाही गोशाळेतील जनावरे जातात कुठे? हा शोध घेण्याची गरज वाटली नाही. यावरून काय समजायचं...? यामुळे कुरेशी समाजाचे आर्थिक जीवन संकटात आल्याने कुरेशी समाजाने राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे कोणत्याच आठवडी बाजारात जनावरांचे सौदे होत नाहीत. यामुळे शेतकरी पैसा खर्च करुन आठवडी बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन येत आहेत. पण खरेदीसाठी कोणीही नसल्याने परत घेऊन जावे लागत आहे. भाकड गायी, म्हातारे आणि पाय तुटलेले जनावरं सांभाळावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लेकरं जगविणे मुश्किल झाले असताना आता जनावरे जगवायची कशी? हा प्रश्नच असून कोणी दवाखान्यात आहे, कोणाच्या लेकरांची फी भरायची राहिली आहे तर कोणाचे लग्न आहेत. यासाठी पैसा नाही. जनावरे घेण्यास कोणीही तयार नाही. अशा स्थितीतही शासन आणि कथित गोरक्षक म्हणून घेणारे शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाजत असून, म्हातारा होईस्तोवर काम करुन घेतले आता विकतो का? गायीचे दूध पिताना मजा वाटली आता विकतो का? असे शब्द आहेत. पण जर इतका कळवळा आहे तर तुम्ही का खरेदी करीत नाहीत? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. तसेच जर व्यापारी १० हजारांना खरेदी करीत असेल तर आम्ही तुम्हाला ५ हजारालाच देऊ असे शेतकऱ्यांनी आवाहन केले पण हे आवाहन कोणीही स्वीकारलेले दिसले नाही. तसेच शासनाने कायदा केला तसे या गोवंशीय जनावरांची खरेदी करावी आणि तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी मोठं मोठे गोठे बांधून त्यांची चारापाण्याची व्यवस्था करुन, मरेपर्यंत सेवा करावी. यासाठी प्रत्येक ठिकाणी गोरक्षकांना सेवा तत्वावर नियुक्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे. हे गोरक्षक फक्त रस्त्यावरच गोरगरीब मुस्लिम आणि दलितांना टार्गेट करीत आहेत. आजपर्यंत एकही माई का लाल जन्मला नाही. ज्याने विदेशात मीट एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीत जाऊन याबाबत आंदोलन केले किंवा जाब विचारले असे कुठे पाहण्यात आले नाही. मग गौरक्षा की, दुसराच काही उद्देश आहे? असा संशय येणे स्वाभाविक आहे. पण असे म्हटले की, कंपनीत म्हशीचे मटन असते असे सांगतात. मग बाहेर पकडलं की, तो गोवंशीयच आहे का म्हणता? कंपनी बाबतीत वेगळी भूमिका आणि बाहेर वेगळी भूमिका का? हा प्रश्नच आहे. यामुळे आधीच नुकसानीत असलेल्या शेतकऱ्यांना इमोशनल ब्लॅकमेल न करता तुम्ही जनावरे सांभाळा. लहानाचे मोठे करा, दूध देतात तोपर्यंत उपयोगात आणा आणि भाकड झाली की, गाय परत देऊन २५ हजार घेऊन जा तसेच बिन कामाचे बैल ही शासनाला देऊन त्याचेही ३० हजार घेऊन जा. अशी योजना जाहीर करावी तरच गौरक्षणाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेतली तर शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी जास्त आवळला जाईल यात शंका नाही.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा