बीड नगर पालिका, मी कारंजा टॉवर बोलतोय
बीड नगर पालिका, मी कारंजा टॉवर बोलतोय
नगर पालिके मी तुझ्या हद्दीत आहे का गं ? असेन तर माझ्या अवस्थेकडे बघ ना जरा, काय अवस्था झालीय माझी. अंगावर माझ्या आतुन बाहेरुन किती जखमा झाल्या. या जखमा भरण्यासाठी मलमपट्टी करायची गरज आहे. ते करायला फर्मान सोड ना. तू फक्त फर्मान काढायचा अवकाश असेल की तुझ्यासाठी काम करणारे गुत्तेदार बघ कसे धावत पळत येतील. पण यासाठी तुझी आंतरिक इच्छा असणे ही महत्वाचे आहे. जो पर्यंत तुझी इच्छा होत नाही, तो पर्यंत माझ्यासाठी कोणीही काहीही करणार नाही. कारण मी काही कोणाचा वैयक्तीक नाही. तर मी सरकारी आहे आणि जोपर्यंत सरकार दरबारी माझी दखल घेतली जात नाही, तो पर्यंत माझी डागडुजी व रंगरंगोटी कोणीही करणार नाही. शेवटी प्रश्न खर्चाचा येतो ना.
नगर पालिके मला काही वर्षा पूर्वीचे ते दिवस आठवतात. जेव्हा मी मोठ्या मानाने, रुबाबाने दिमाखात उभा होतो. तेव्हा या परिसरातील राहणारे नागरिक माझ्याकडे बघत छाती फुगवुन इतरांना सांगायचे, हा पहा आमचा कारंजा आम्ही याच्या जवळच राहतो. संध्याकाळ नंतर माझ्या सभोवती असलेल्या वट्टयावर घाण न करता आबालवृध्द येवुन खेळायचे, गप्पा मारीत बसायचे, हे वट्टे ही आता जमीन दोस्त झालेत.
रात्र झाल्यावर ही जमलेली मंडळी माझ्या तीन ही बाजुला लावलेल्या घड्याळात वेळ पाहुन घरी जावुन झोपायचे सकाळ झाली की परत वेळ पहायला माझ्या जवळ यायचे. आता मात्र घरोघरी भिंतीवर घडयाळे लागल्याने माझ्या घड्याळांकडे कोणी बघत नाही व ती केव्हा पासून बंद पडली आहे हे आता मला ही नीट आठवत नाही. माझी ही तीन ही घडयाळे पुन्हा चालू केल्यास माझी शोभा पुन्हा वाढेल. माझ्या खिडकीच्या काचा ही निखळुन पडल्या आहेत. त्याही नवीन लावुन घे. एकेकाळी मला तुझे लोक नेहमी साफसुफ ठेवायचे आता मात्र गुटखा शौकीन बंदी असून ही चोरी छुपे गुटखा विकणाऱ्यांकडून गुटखा घेवुन खातात व थुंकीच्या पिचकाऱ्या माझ्या अंगावर मारतात.
तुझ्या परवानगीने राजकारणी लोक सतत माझ्या समोर पुर्वी मोठमोठ्या सभा घ्यायचे. येथे सभा घेणारे व गाजवणारे बरेच लोक सध्या ही आहेत. मी त्यांच्या राजकारणाचा मुक साक्षीदार आहे. येथे सभा गाजवणाऱ्यांपैकी काही लोकांची नावे मला आजही आठवतात. त्यापैकी काहींची नांवे सांगतो, ती अशी राजेंद्र जगताप, मोईन मास्टर, सुशिला मोराळे, खालेक पेंटर, उषा दराडे, नामदेव चव्हाण, जनार्धन तुपे, सिराज देशमुख आदि मंडळी माझ्या समोर अक्षरशः सभा जिंकायचे आता मात्र ही सर्व मंडळी असून ही आपआपल्या प्रपंचात व राजकारणाच्या फडात रंगल्याने यापैकी कोणीही माझ्याकडे बघायला तयार नाही. बहुतेक शहरातील वाढलेल्या जनसंख्येमुळे माझ्या परिसरात सभा होत नसल्याने आता यांना माझी नोंद घ्यावीशी वाटत नसावी असे मला वाटते.
तुझ्यासह जर सर्व लोकांची माझ्या बाबतीत अशीच अनास्था राहिली तर एक दिवस असा येईल जेव्हा फक्त माझे नावंच या परिसराला राहिल. मात्र मी नामशेष होवुन जाईन. मग आज पाळण्यात असलेल्या भावी पिढीला ते तरुण झाल्यावर या भागाला कारंजा नाव का पडले यासाठी माझी कहाणी सांगावी लागेल. हा विचारचं माझ्या अंगावर काटा आणतोय गं.
मागील वर्षी एक कर्तव्य कठोर, कर्तबगार व धडाकेबाज जिल्हाधिकारी बीड ला येवुन गेले. त्यांनी माझ्या सभोवतालचे रस्ते रुंद केले. यामुळे माझा परिसर अजूनही प्रशस्थ दिसू लागल्याने मला फार आनंद झाला. त्यांनी माझी ही डागडूजी व रंगरंगोटी करायला लावली असती गं, पण त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने मला त्यांच्या कार्यकाळात दुरुस्त होण्याची संधी व भाग्य लाभले नाही. माझी अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली असून माझ्या एका बाजुला हात गाडेवाले अतिक्रमण करुन बसले आहेत. तर दोन बाजूस तीन व चारचाकी गाड्या दिवसभर लावलेल्या असतात. तर एका बाजुस रस्ता बारीक असून ही मला धडका देत दुचाकीस्वार दुचाक्या लावतात. माझ्या अंगावर पोष्टर चिकटविले जातात. समोर मोठमोठाले डिजीटल बॅनर लावले जातात. यामुळे माझा परिसर मोठा होवुन ही या सर्वांनी मला घेरल्याने माझा जीव घुसमटतोय गं.
यातुन आता तुच मार्ग काढ अतिक्रमण करणाऱ्यांचा, दुचाकी, तीन व चार चाकी वाहने अस्ताव्यस्त लावणाऱ्यांचा, बंदोबस्त कर. माझ्या सभोवती पुर्वी सारखे वट्टे परत बनवुन घे. माझी झालेली पडझड नीट कर, डागडुजी करुन रंगरंगोटी कर. माझा पुर्वीचा रुबाब, रुप मला परत मिळवुन दे. मला इतिहासात जमा करु नको तर वर्तमान व भविष्यात ही जिवंत ठेव. अशी मी तुला कळकळीची विनंती करतो. किंबहुना वाटल्यास याला वडिलधारी आदेश समजुन कामाला लाग.
आणि हो मला असं कळालंय की, काही वर्षापूर्वी तू तुझी इमारत खुप मोठी टोलेजंग व देखणी करुन घेतलीस. अभिनंदन! यासाठी तुला माझ्याकडून खुप-खुप हार्दिक शुभेच्छा !
*लेखन - एस.एम.युसूफ*
आसेफ नगर, बीड
मो.नं.- *८६००९३१८३२*
*टीप -* वरील भ्रमणध्वनी क्रमांक हा लेख जेव्हा लिहिला होता तेव्हाचा आहे. आता माझा भ्रमणध्वनी क्रमांक *९०२१०२३१२१* हा आहे.
*ताजा कलम -* हा लेख प्रकाशित झाल्यानंतर कारंजा टॉवर ची डागडुजी तर झाली परंतु बनविलेल्या संरक्षक कठळ्याच्या आत तसेच बाहेर आता लागेल तेवढी घाण, कुत्र्यांनी हगलेले, माणसांनी टाकलेला कचरा पडून असतो. बीड नगर परिषदेने फक्त डागडूजी करून सोडून दिले. कारंजा टॉवर च्या बाजूने असलेले चारही रस्ते संपूर्ण बीड शहरावरून ओवाळून फेकल्यागत खड्डे आणि धुळ-फुफाटायुक्त झालेले आहे. मुख्याधिकारी मॅडम यांना वारंवार सांगूनही त्या लक्ष देत नाहीत. जनतेला ही कारंजा टॉवर बद्दल आस्था राहिली नाही म्हणून कारंजा टॉवर ची पुन्हा एकदा घोरशोकांतिका झाली आहे. यामुळे असे वाटते की, *कारंजा टॉवर पुन्हा एकदा बोलेल!*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा