बीड विधान सभेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला!
बीड विधान सभेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला
संदीप क्षीरसागर विजयी, डॉ. योगेश क्षीरसागर पराभूत
पराभूत उमेदवार बीड नगर परिषद चा नगराध्यक्ष होणार?आता फोडा आणि राज्य करा नव्हे, फूट पडलेली दाखवा आणि राज्य करा
घराण्यांचे राजकारण; इंग्रजांविपरीत धोरण!
*बीड (एस.एम.न्युज़) -* बीड जिल्ह्यातील एकूण सहा मतदारसंघांपैकी बीड विधानसभा मतदारसंघाचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला असून येथून विद्यमान आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा पराभव करीत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमुळे अगोदरच ताळेबंद लावण्यात आला होता की, निकाल काहीही लागला तरी येथून क्षीरसागरच आमदार होणार. फक्त एवढेच पाहायचे बाकी होते की, तो क्षीरसागर कोणता असेल. आता याचे उत्तर मिळाले असून संदीप क्षीरसागर निवडून आले आहेत. यामुळे बीड विधानसभेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. आता पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर हे बीड नगर परिषद च्या येत्या निवडणुकीत नगराध्यक्ष होतील. हे पाहता घराण्यांचे राजकारण म्हणजे इंग्रजांविपरीत धोरणाचे आहे. हे या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झालेच आहे. तसेच बीड नगर परिषद च्या आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा यावर शिक्का मोर्तब होणार आहे.
भारतावर पाश्चात्य इंग्रजांनी जवळपास दीडशे वर्ष राज्य केले होते. त्यावेळी त्यांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली होती. आता कालमानाप्रमाणे ही नीती बोथट झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून मुरलेल्या क्षीरसागर यांनी फोडा आणि राज्य करा या निती विरुद्ध जाऊन नवीन निती सुरू केली आहे. ती म्हणजे फूट पडलेली दाखवा आणि राज्य करा.
इंग्रज येण्याच्या अगोदर आपल्या भारत देशात राजेशाही होती. त्यावेळी राजे महाराजे च्या घराण्यात राजसत्ता असायची. वंशपरंपरेनुसार एका राजाचा मृत्यू झाला की, त्याच्याच कुळातील दुसरा व्यक्ती राजा व्हायचा. इंग्रजांनी भारतात येऊन राजेशाही संपुष्टात आणली आणि संपूर्ण भारत देशावर राज्य केले. यामुळे आपल्या भारत देशात राजे महाराजेंची राजेशाही संपुष्टात आली. थोर आणि ज्येष्ठ क्रांतिकारकांनी इंग्रजांसोबत अनेक वर्षे लढा देत १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला स्वतंत्र केले.
यासाठी अनेक वर्षे आपल्या पूर्वजांना इंग्रजांशी संघर्ष करावा लागला. देश स्वतंत्र झाल्यानंतर कालांतराने आपल्या देशात लोकशाही सुरू झाली. लोकशाही प्रमाणे देशाचा कारभार चालविण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आदर्श संविधान लिहिले गेले. याच संविधानानुसार आपल्या देशात लोकशाही चालविण्यात येऊ लागली. लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात गेल्या काही वर्षापासून राजेशाही सारखीच प्रथा सुरू झाली आहे. आता संपूर्ण देशभरात आणि त्यातही महाराष्ट्रात त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यात तर वंशपरंपरेची घराणेशाही सुरू झाली आहे.
याला बीडसह जिल्ह्यातील एकही तालुका अपवाद नाही. ज्या घराण्यात खासदार, आमदार, नगराध्यक्ष झाले त्याच घराण्यातील वारसदार पुढे चालून खासदार, आमदार, नगराध्यक्ष होऊ लागले आहे. यासाठी ते साम-दाम-दंड-भेद करत येनकेन प्रकारे सतत लोकशाहीतील पदे आपल्या घराण्यातच ठेवू लागले. मग त्यांच्यात त्या पदावर बसण्याची गुणवत्ता व धमक असो की नसो. फक्त ठराविक घराण्याची व्यक्ती आहे म्हणून त्याला लोकशाहीतील पदे आंदन दिल्यासारखी देण्यात येऊ लागली आहेत. यात बीड जिल्ह्यातील क्षीरसागर घराणे हे अव्वल क्रमांकावर येतात. क्षीरसागर घराण्यातील राजकारण हे दिवंगत केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून सुरू झाले. त्यांनी पंचायत समिती पासून सुरू केलेले राजकारण आमदार, खासदार होत कित्येक वर्ष राजकारण केले. त्यांच्याच काळात त्यांचे थोरले चिरंजीव जयदत्त क्षीरसागर यांनीही चौसाळा आणि बीड मतदार संघातून अनेक वेळा आमदारकी उपभोगली. आता त्यांच्याच समोर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी सलग दोनदा आमदारकी मिळविण्यात यश मिळविले. तर केशर काकूंचे दुसरे पुत्र डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेत २५ ते ३० वर्ष सातत्याने नगराध्यक्ष पद उपभोगले आहे. यावेळी झालेल्या बीड विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर याच भारत भूषण क्षीरसागर यांचे पुत्र डॉक्टर योगेश क्षीरसागर हे प्रति स्पर्धी म्हणून उभे होते. या दोघांव्यतिरिक्त तिसरा उमेदवार तेवढ्या तोला मोलाचा समोर येणार नाही याची दक्षता मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच घेण्यात आली होती.
गेल्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत सुद्धा काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर प्रति स्पर्धी म्हणून पुतणे संदीप क्षीरसागर यांना उतरविण्यात आले होते. तेव्हा सुद्धा या दोन्ही क्षीरसागरांमध्येच मुख्य लढत झाली होती आणि निकाल सुद्धा अपेक्षेप्रमाणे एका क्षीरसागराच्या म्हणजेच संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने लागला होता. यावेळी काका जयदत्त क्षीरसागर यांनी भरलेला अपक्ष फॉर्म मागे घेऊन दुसरे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना समर्थन दिले म्हणून काका पुतण्याऐवजी या निवडणुकीत भावाभावात थेट सामना झाला. की लावण्यात आला? असा प्रश्नही पुन्हा एकदा जनतेमधून उपस्थित केला जात आहे. किंबहुना जनता जे काही समजायचे ते समजून गेली आहे.
बीड च्या क्षीरसागर घराण्यासारखेच माजलगाव, गेवराई, केज, आष्टी आणि परळी या विधानसभा मतदारसंघात सुद्धा अशीच घराणेशाही सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी राबवलेली फोडा आणि राज्य करा ही नीती आता बासनात गुंडाळून ठेवली गेली असून आता आपसात फुट पडलेली दाखवा आणि राज्य करा अशी नीती अवलंबली जात असल्याचे तसेच त्यात कमालीचे यश मिळत असल्याचे ही प्रत्येक निवडणूक निकालानंतर दिसून येत आहे.
=================================
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा