वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसात दिली नीट परीक्षा; शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बीडची विद्यार्थिनी शाखेत पहिली कु. ज़राक़जान ला ६१३ गुण; मान्यवरांच्या हस्ते सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील बार्शी रोडवर असलेल्या हिना पेट्रोल पंप समोर कर्नाटक राज्याच्या बिदर संचालित शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बीड मध्ये गेल्या वर्षी नीट परीक्षेसाठी शिक्षण घेणाऱ्या १३ विद्यार्थ्यांमधून ०५ विद्यार्थी ५६० पेक्षा जास्त गुण घेऊन नुकतेच दिनांक ०४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झाले आहे. यात ज़राक़जान सुलतान खान ही विद्यार्थिनी ७२० पैकी ६१३ गुण मिळवून इन्स्टिट्यूशन मध्ये पहिली आली. विशेष म्हणजे तिचे वडील सुलतान खान यांचे दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी अकस्मात निधन झाले होते. येथून १६ दिवसानंतर दिनांक ०५ मे २०२४ रोजी नीट ची परीक्षा होती. तरीही ज़राक़जानने आई आणि शाहीन इन्स्टिट्यूशनच्या शिक्षक वृंदांनी दिलेल्या धीराने ही परीक्षा दिली. आणि ७२० पैकी ६१३ गुण मिळवून इन्स्टिट्यूशन मधून पहिली आली. तसेच तिच्या सोबत नीट परीक्षा दिलेल्या शेख अमानिया ५९४, उम्मे अम्मारा ५८२, पठाण अक्सा ५७७, शेख लायबा ५६० या विद्यार्थिनींनीही उल्लेखनीय गुण मिळविले. यामुळे बीड येथील शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट शेख समीर यांच्या हस्ते ज़राक़जानसह विशेष गुण मिळविलेल्या सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शेख निजाम, सर सय्यद विद्यालयाचे सचिव शेख वकील, शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे बीड शाखाप्रमुख प्रा. डॉ. इमरान खान, फिजिक्सचे प्रा. अजित कुमार, मॅथ्सचे प्रा. मुहम्मद असजद, बायोलॉजीचे प्रा.डॉ. ज़ुबेर मिर्झा, ज्येष्ठ मार्गदर्शक मुज़्तबा खान सर आणि जुनैद सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आपले मनोगत व्यक्त करताना ज़राक़जान म्हणाली की, आज या क्षणी मान्यवरांच्या उपस्थितीत माझा सत्कार होत असला यामुळे मी प्रसन्न असले तरी मला नुकतेच निधन पावलेल्या माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे. त्यांची खूप इच्छा होती की, मी नीट परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण व्हावे आणि पुढे चालून एमबीबीएस करून डॉक्टर व्हावे. त्यांची ही इच्छा आई आणि येथील माझ्या वडीलधारी शिक्षकांच्या आशीर्वादाने व सहकार्याने करण्याचे बळ अल्लाहने मला द्यावे. येथून यापूर्वी नीट परीक्षेत उत्तम यश मिळवून गेलेले अमान अहेमद, नादिया फातिमा, रीमशा समीन यांच्यासारखेच मलाही एमबीबीएस करायचे आहे आणि एक डॉक्टर होऊन सर्वसामान्य गोरगरिबांवर उपचार करून रुग्णसेवा करायची आहे. याकरिता येथून पुढेही मला येथील शिक्षक वृंदाचे सहकार्य व साथ आवश्यक आहे असे म्हटले. मनोगत व्यक्त करताना तिचा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यांतून अश्रू येत होते.
ज़राक़जान चे वडील एक फोटोग्राफर होते. त्यांचा व्यवसाय प्रपंच चालविण्यासाठी सुद्धा अपुरा होता परंतु तिच्यात शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती दृढ होती. तिने इथपर्यंतचे शिक्षण शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आणि बीड येथील शिक्षकांच्या सहकार्याने घेतले.
शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ही कर्नाटक राज्याच्या बिदर येथील एक नामांकित शिक्षण संस्था आहे. याचीच एक शाखा बीड शहरात सन २०२० पासून सुरू आहे. या शाखेतून आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिकून पुढे गेले आहेत. येथील विद्यार्थी आजमीतिला आरोग्य क्षेत्रातील एमबीबीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस मध्ये शिक्षण घेत आहेत. या इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष बिदरचे डॉ. अब्दुल क़दीर यांनी संपूर्ण भारतात शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या ८० शाखा चालविल्या आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातील या शाखांमध्ये गुणवंत विद्यार्थी गोरगरीब असतील तर अशांना संपूर्ण सहकार्य केले जाते. याशिवाय अनाथ, दिव्यांग व हाफ़ीज़ ए क़ुरआन (तोंडपाठ क़ुरआन पठण केलेले) विद्यार्थी व विद्यार्थिनींना वार्षिक फी मध्ये ५०% सूट सुद्धा देण्यात येते. एकाच छताखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत असले तरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे वर्ग पूर्णतः वेगवेगळे आहेत. येण्या-जाण्याचा मार्ग सुद्धा वेगळा आहे. शिक्षण सुरू असताना नमाज़ ची वेळ झाल्यावर तोंड हात पाय धुण्यासाठी व नमाज़ पठण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशस्त वर्ग, कार्यालय आणि अनुशासन प्रिय शिक्षकांमुळे शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इतर विद्यार्थ्यांसोबतच गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुढे चालून जीवनात काहीतरी चांगले करण्यासाठी एक मोठे आशेचे किरण आहे. याचे उदाहरण म्हणजे यावेळी नीट मध्ये प्रथम आलेली ज़राक़जान ही विद्यार्थिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
===================
"आमच्या सेवा -"
१) कार्यालयीन निवेदन व बातमी योग्य दरात लिहून मिळेल
२) विविध वृत्तपत्रात व एस.एम. न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
मुख्य संपादक - एस.एम.न्युज, वेब पोर्टल तथा यूट्यूब चैनल
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा