Breaking News

वृत्तपत्र विक्रेत्यांविषयीची अनास्था चिंतेचा विषय - एस.एम.युसूफ़



बीड (एस.एम.न्युज) - अत्यंत अल्प मोबदल्यात दररोज पहाटेपासून रस्त्यावर बसून वृत्तपत्रे विकणाऱ्या विक्रेत्यांविषयीची अनास्था चिंतेचा विषय असल्याचे मत मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे.
      याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, २० जानेवारी रोजी लग्न निमित्ताने बीडहुन अहेमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जात असताना वाटेत तीसगावात चहा पाणी साठी बस थांबली असता सकाळी ०८:४५  वाजता तेथे एक वयोवृद्ध आजीबाई कडकडत्या थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसून वृत्तपत्रे विकत असतानाचे दृश्य पाहिले. यावरून वृत्तपत्रे विक्रेत्यांचे हाल लक्षात आले. म्हणून त्या आजीबाईंचा फोटो घेऊन  वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यासाठी दिला. तो काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केला. नंतर विचार केला की, हा प्रश्न फक्त एकट्या वयोवृद्ध आजीबाईंचा नसून पहाटे ०४:०० वा. साखर झोपेतून उठून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणताही ऋतू असो वृत्तपत्रे विकणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांनाच अशा परिस्थितीचा सामना गेल्या अनेक वर्षांपासून करावा लागतोय. मात्र आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, याबाबत वृत्तपत्रे विकण्याचा व्यवसाय करणाऱ्यांपासून ते वृत्तपत्र चालविणाऱ्या संपादकांपर्यंत (शासन-प्रशासनाने सुद्धा) कोणीही या बाबीची आजपर्यंत म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. यामुळे वृत्तपत्रे अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत ती विकण्याकरिता दुकाने टाकण्याचे धाडस अत्यल्प लोकांनी केले. मात्र बाकीचे आजही रस्त्यावर बसूनच वृत्तपत्रे विकताना दिसतात. यामागे अल्प मोबदला मिळत असल्याने आर्थिक चणचण हे प्रमुख कारण आहे. म्हणून प्रत्येक वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्रे विकण्यासाठी अनामत रक्कम देऊन दरमहा गाळ्याचे भाडे भरू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन दि. २५ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी साहेबांमार्फत महाराष्ट्र राज्यात रस्त्यावर बसून वृत्तपत्रे विकणाऱ्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना शासकीय जागेत विनामूल्य गाळे उपलब्ध करून द्यावेत. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली. याची बातमी काढून स्थानिक तसेच विभागीय वृत्तपत्रांना सुद्धा पाठवली. मात्र मोठ्या दुःखाने नमूद करावेसे वाटते की, नाम मात्र दैनिकांनी याची दखल घेऊन बातमी प्रकाशित केली. मात्र प्रकाशित न करणाऱ्या वृत्तपत्रांची संख्या फार मोठी होती. हे मोठ्या खेदाने नमूद करावेसे वाटते. ही परिस्थिती पाहता वृत्तपत्र क्षेत्रातच वृत्तपत्र विक्रेत्यांविषयी मोठ्या प्रमाणावर अनास्था असल्याचे दिसून आले. अशी अवस्था असेल तर वृत्तपत्र क्षेत्राचा कणा असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून न्याय कसा मिळेल ? विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला जेव्हा शासन-प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तेव्हा त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचा प्रयत्न ही वृत्तपत्रे व त्यांचे संपादकच करतात. यात दुमत नाही. मात्र त्यांनी वाचा फोडल्यानंतर समाजासमोर आणण्याचे कार्य वृत्तपत्रे विकुन जे विक्रेते करतात त्यांना सुद्धा न्याय मिळायला हवा. यासाठी शासन दरबारी वृत्तपत्रे विकणार्‍यांचा प्रश्न  मांडण्यासाठी वृत्तपत्रे व संपादक काही करू शकत नाही का ? असा भावनिक प्रश्नही दिलेल्या पत्रकातून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.

  
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत