शाळा सुरू झाल्याचा गवगवा;प्रत्यक्षात मात्र एक दिवसाआड तीन तासावरच बोळवण ! शासनाचे धोरण व नियमावली विद्यार्थी आणि शिक्षणाच्या मुळावर एस.एम.
बीड (एस.एम.न्युज़) - राज्य शासनाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला अनुसरून शिक्षण क्षेत्रासाठी जे धोरण अवलंबिले त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने केलेले नियोजन पाहता शाळा सुरू झाल्याचा गवगवा ज्याप्रमाणात केला गेला त्या प्रमाणात शाळा न पूर्णवेळ चालविल्या जात आहे, ना प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज शाळेत येण्याची परवानगी देण्यात येत आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्षात फक्त एक दिवसाआड तीन तासासाठी वर्गात बसवून बोळवण करण्यात येत आहे. यामुळे शासनाचे धोरण व नियमावली विद्यार्थी व शिक्षणाच्या मुळावर उठली असून यामुळे कित्येक भावी पिढ्या शैक्षणिक दृष्ट्या बरबाद होणार आहे.
दिवाळी च्या सुट्टी पूर्वी ज्याप्रमाणे शाळा चालविल्या जात होत्या त्याच पद्धतीने दिवाळीच्या सुट्टीनंतर सुद्धा शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षणाचे काहीही गांभीर्य राहिलेले नसलेल्या शासन-प्रशासनासह शिक्षकगण सुद्धा शिक्षणाच्या नावाने फक्त पाट्या टाकण्याचे कार्य करीत आहे. आज शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे कोणालाही काही देणे-घेणे राहिले नाही. पूर्ण क्षमतेने शाळेत विद्यार्थी न बोलविता विद्यार्थ्यांना आळीपाळीने फक्त तीन तास शाळेत बसवून ठेवणारे शिक्षक पाहिल्यावर विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचे काय होईल ? या प्रश्नाने पालकांचे मन सैरभैर झाले आहेत. या अवस्थेमध्ये शिक्षण व विद्यार्थ्यांच्या हितासाठी करावे तरी काय ? हे शासन-प्रशासनासह शिक्षण क्षेत्रातील जबाबदार अधिकारी व शिक्षकगणाची मती मंद झाल्याने पालकांची चिंता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची वाताहत फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु पालकवर्ग वगळता याचे सोयरसुतक वरीलपैकी कुणालाही असल्याचे दिसत नाही. शासन शिक्षकांना दरमहा वेतन देण्याचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत आहे. शिक्षकगण ही विद्यार्थ्यांना न शिकविता ते घेत आहेत. यामुळे वेतन देणारे आणि घेणारे दोघंही कसलीही चिंता न करता आला दिवस काढत आहेत. परंतु विद्यार्थी व शिक्षणाचे काय ? ऑनलाइन शिक्षणाची काढलेली टीमकी केव्हाच निष्प्रभ ठरली आहे. १ डिसेंबर २०२१ पासून मोठा गवगवा करत एकदाच्या शाळा सुरू करण्यात आल्या खऱ्या परंतु त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक दिवशी नसून आळीपाळीने एक दिवसाआड आणि तेही फक्त तीन तास भरविल्या जात आहे. एक दिवसाआड तीन तासात विद्यार्थी शिक्षण ते काय घेणार ? आणि किती घेणार ? परंतू याचा विचारही शिक्षण क्षेत्रातील कुणालाही शिवत नाही ही मोठी चीड आणणारी बाब आहे. ही सर्व अवस्था पाहता शासनाचे धोरण व नियमावली विद्यार्थी आणि शिक्षणाच्या मुळावर आल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु याबाबत लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या लोकशाहीत कुणालाही रस नसल्याने शिक्षण क्षेत्रात एक मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे.
शहर व तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांची व्यथा !
इतर क्षेत्रासारखे शिक्षण क्षेत्रात सुद्धा दोन भाग पडलेले आहे. शहरी आणि ग्रामीण. लॉक डाउन काळात ऑनलाइन शिक्षणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. तर आता ऑफलाइन शिक्षण सुरू झाल्यावर शासन आणि शिक्षण विभागाच्या धोरणामुळे शहर व तालुका पातळीवर एक दिवस शाळा दुसऱ्या दिवशी सुट्टी अशा तर्हेने वर्ग भरविण्यात येत असल्याने जो विद्यार्थी आज शाळेत गेला त्याला तीन तासांची शाळा सुटण्याअगोदर शिक्षकगण म्हणतात आता तुम्ही उद्या शाळेत यायचे नाही. उद्या दुसरे विद्यार्थी येतील. तुम्ही परवा दिवशी शाळेत यायचे. अशाप्रकारे शहरी व तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यथा सुरू झालेली आहे.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़, बीड.
मो. - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा