स्वच्छता दुतांचा सन्मान करत बीड नगर परिषद समोर आगळेवेगळे आंदोलन
बीड (एस.एम.न्युज़) - नगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ स्पर्धेत बोगस माहीती देत दिल्ली येथील सर्व्हेक्षण टीम सोबत संगनमताने कागदोपत्री स्वच्छता दाखवुन देशात ६७ वा क्रमांक मिळवल्याच्या नादात स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या बीड नगरपालिकेच्या निषेधार्थ संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. यासाठी पोलखोल आंदोलन करण्यात येऊन वर्षभरापासुन बीड शहरातील स्वच्छता करणाऱ्या सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ, फूलहार, शाल, श्रीफळ देऊन सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि बीड तालुकाध्यक्ष शेख युनूस चर्हाटकर यांच्या हस्ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़, बाबासाहेब मोरे, संदीप जाधव, रमेशराव गंगाधरे, सय्यद ईलयास, मुहम्मद मोईज़ोद्दीन, शेख मुबीन, सय्यद आबेद, सय्यद रौनख अली, अतहर फारोखी, हारेस ठाकुर, आदी स्वच्छता दुतांचा सन्मान करण्यात आला.
वर्षभरापासुन स्वच्छता अभियान राबवुन सुद्धा नगरपरिषदेचा मुजोरपणा जात नाही; नागरीकांनी बदल घडवावा - अशोक येडे (आप जिल्हाध्यक्ष)
२७ नोव्हेंबर २०२० ला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून स्वच्छता अभियानाला सुरुवात करून एक वर्ष पुर्ण झाले. दर रविवारी स्वच्छता अभियान राबवुन रस्त्यावरील घनकचरा, बिंदुसरा नदीपात्रातील कचरा, अस्वच्छ नाल्या, तसेच केवळ ठेकेदारांसाठी बांधलेल्या भाजीमंडई सारख्या वापरात नसलेल्या ईमारती, निकृष्ट रस्ते प्रकरण आदि विषय सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडताना नगर परिषदेचा दहावा, तेरावा आणि वर्षश्राद्ध करून सुद्धा नगरपालिकेचा मुजोरपणा जात नसुन नागरीकांनी सजग होऊन मतदानातून बदल घडवायला हवा, चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे नमुद केले. यावेळी प्रा. ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमाले, सादेक सय्यद आदि उपस्थित होते.
नगराध्यक्ष म्हणतात जीवन प्राधिकरण मुळे शहराचे वाटोळे तर मग देशात ६७ वा क्रमांक कसा ? - डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
नगराध्यक्ष डाॅ. भारतभुषण क्षीरसागर यांनी २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करताना अमृत अटल योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प १६५ कोटी व पाणीपुरवठा योजना ११४ कोटी रूपयांची योजना २ वर्षभरापासुन रखडलेली असतानाच स्वच्छ सर्व्हेक्षण साठी आवश्यक मलनिस्सारण प्रकल्प व पाणीपुरवठा या योजना रखडल्याचे सिद्ध होऊन जीवन प्राधिकरणने वाटोळे केले असल्याचे जाहीर केलेले असताना देशात ६७ वा क्रमांक येतोच कसा ? हा मुळ संशोधनाचा विषय आहे या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पाठ थोपटून घेण्याऐवजी ढोपर बडवून घेण्यासारखी अवस्था - एस.एम.युसूफ़
या सत्कार समारंभात सत्कार मूर्ती असलेले एस. एम.युसूफ़ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, यापूर्वीही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अशाच प्रकारे बीड शहराला स्वच्छतेबाबत २० वा क्रमांक मिळविला होता. तेव्हापासून आतापर्यंत शहरातील रस्ते, नाल्या, उकिरडे घाण व कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. यामुळे त्यांनी यंदा लाजत-लाजत २० ऐवजी ६७ वा क्रमांक मिळविला. परंतु बीड शहराची अवस्था पाहता २० किंवा ६७ चं काय बीड शहर पहिल्या १०० मध्ये सुद्धा येऊ शकत नाही. ही सत्य वस्तुस्थिती आहे. ही बाब बीड शहरवासीयांना चांगली माहित असूनही काही महिन्यात येऊ घातलेल्या आगामी बीड नगर परिषद च्या निवडणुकीमध्ये स्वतःचा उदो-उदो करून घेण्यासाठी स्वच्छतेच्या या क्रमांकाचा उदो-उदो करत स्वतःची पाठ थोपटून घेतली जात आहे. वास्तविक पाहता पाठ थोपटून घेण्याऐवजी ढोपर बडवून घेण्यासारखी अवस्था आहे असे म्हटले.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़, बीड.
मो.- 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा