महेदवीया समाजसाठी पवित्र व श्रद्धेचे स्थान असलेली ऐतिहासिक विहिर स्वच्छतेसह संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी अल्पसंख्यांकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारींना निवेदन
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुस्लीम महेदवीया समाजचे संस्थापक महेदी अलैहीस्सलातूस्सलाम जेव्हा ज़ियारत निमित्त दौलताबाद येथील हज़रत मोमीन आरेफ़ साहब सुहारवर्दी यांच्या दर्ग्यात शेकडो वर्षांपूर्वी आले होते तेव्हा ते दर्ग्यात जाण्यापूर्वी जमिनीपासून पाण्यापर्यंत असलेल्या पायऱ्यांनी येथील ऐतिहासिक विहिरीत वुज़ूसाठी (तोंड,हात,पाय धुणे) उतरले व तोंडात पाणी घेतले असता ते प्रचंड प्रमाणात खारट होते. अर्थातच पिण्यायोग्य नव्हते. हे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी कुराणातील काही आयत पठण करून विहिरीत गुळनी केली आणि विहिरीतले पाणी आश्चर्यकारकरित्या खाऱ्या ऐवजी गोड होवून पिण्यायोग्य झाले. तेव्हापासून या ऐतिहासिक विहिरीचे पाणी संपूर्ण भारत देशासह विदेशातून येणारे महेदवीया समाजचे अनुयायी ज़ायरीनसाठी (दर्शनासाठी येणारे) पवित्र व श्रद्धेचे स्थान आहे. महेदवीया समाजचे लोक या ऐतिहासिक विहिरीचे पाणी प्रसाद म्हणून पीत होते तसेच मोठ्या प्रमाणात सोबतही घेऊन जात असत. शिवाय दर्ग्यात राहणारे मुतवल्ली सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या पाण्याची गरज भागवत होते. तसेच जवळपास राहणाऱ्यांना सुद्धा या पाण्याचा उपयोग होत होता. परंतु काही वर्षांपूर्वी दर्ग्याच्या मुतवल्लींनी दर्गाच्या पायऱ्यांजवळ बोअर घेतल्याने त्यांनी या विहिरीकडे पाठ फिरविली. यामुळे आज या विहिरीची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे. येथील मुतवल्लींचे कुटुंबीय विहिरीचे पाणी उपयोगात घेत नसल्याने व मुतवल्लींच्या कुटुंबीयांसह येणार्या-जाणार्या लोकांनी विहिरीमध्ये नको ती घाण व कचरा टाकून विहिरीचे पाणी पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य ठेवले नसून दुषित करून टाकले आहे. पाणी व विहिरीच्या स्वच्छतेसह दर्ग्यात येणारे ज़ायरीन त्यांची मुले व चरण्यासाठी फिरणारी जनावरे विहिरीत पडू नये म्हणून या ऐतिहासिक विहिरीच्या चारही बाजूने संरक्षक भिंती किंवा लोखंडी ग्रील लावण्यात यावे. अशी मागणी एल.एम.एम.ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दीलावर उर्फ फ़ार्रुख भाई यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा