ध्यानीमनी नसताना पत्रकारितेशी जुळला संग आणि एस.एम.युसूफ़ बनले मुक्त पत्रकार
बीड एस.एम.न्युज़ चे संपादक एस.एम.युसूफ़ यांचा ध्यानीमनी नसताना पत्रकारितेशी संग जुळला आणि ते मुक्त पत्रकार बनले. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न वाचकांना नक्कीच आवडेल.

एस.एम.युसूफ यांचे पूर्ण नाव आहे शेख मुहम्मद युसूफ़ मुहम्मद अब्दुल रऊफ़ त्यांचा जन्म ४ मार्च १९७१ साली शुक्रवारी झाला. तेव्हा त्यांचे वडील मुहम्मद अब्दुल रऊफ़ हे शहरातील नामांकित सिटी हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे. वडील फक्त पहिली शिकलेले तर आई सलमा बेगम या अशिक्षित. अशा आई-वडिलांच्या पोटी प्रथम पुत्र म्हणून युसूफ़ यांचा जन्म झाला. यानंतर चार वर्षांनी त्यांची लहान बहीण सुलताना हिचा जन्म झाला. लग्नानंतर पाच वर्षात दोन मुलं झाल्यावर हॉटेल मध्ये मिळणाऱ्या रोजंदारीवर प्रपंच चालविणे अवघड झाल्याने रऊफ़ यांनी वेटर चे काम सोडून बशीरगंज भागात पान टपरी चा व्यवसाय सुरू केला. तिथे जम बसल्यावर सध्या जैन भवन म्हणून ज्या इमारतीला ओळखले जाते, तिथे पुर्वी विजय टॉकीज होती. त्या टॉकीज च्या कोपऱ्याला पान टपरीचे स्थलांतर केले. तिथून धोंडीपुरा येथे त्याकाळी असलेल्या हॉटेल चंपावती समोर पान टपरी सुरू केली. तेथून बस स्टँड समोर भिक्कमलाल, छोटूलाल, गणेशलाल आणि हनुमानलाल या सर्व गुरखुदे बंधूंच्या जागेवर थोडा-थोडा काळ पान टपरी चालविली. यानंतर शहरातील जालना रोडवर हिना टुरिंग टॉकीज सुरू झाली असता हिना टॉकीज चे मालक मुहम्मद गुलाम सौदागर यांच्याशी बोलणी करून टॉकीज मध्ये पान टपरी सुरू केली. वडिलांचे व्यवसायामध्ये अशाप्रकारे मार्गक्रमण सुरू असताना युसूफ़ हे मोठे होत होते.
सहा वर्षे वय झाले असता त्यांना केंद्रीय प्राथमिक शाळा अज़ीज़पूरा येथे मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित करण्यात आले. तिथे त्यांनी इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद बहुविध प्रशाला (मल्टीपर्पज हायस्कूल) येथे इयत्ता आठवीत प्रवेश घेतला. तिथे दहावीपर्यंत शिकले. आठवीत असताना शिक्षणासह हिना टॉकीज मध्ये टपरीच्या व्यवसायात वडिलांना मदत असे त्यांचे दुहेरी मार्गक्रमण सुरू होते. १९८५ ते १९९२ या सात वर्षांच्या काळात युसूफ़ यांनी वडिलांना टपरी व्यवसायात साथ दिली. मात्र टपरीवर घर चालविणे कालांतराने अवघड झाल्याने आपण या व्यतिरिक्त काहीतरी करायला हवे. हा विचार करून मामाकडे औरंगाबादला जाऊन तेथील औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी काही संधी मिळते का ? याची चाचपणी करण्याचा विचार करत औरंगाबाद गाठले.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात सर्वप्रथम वोक्हार्ट या औषधी, गोळ्या निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये कॅज्युअल वर्कर म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर जॉन्सन अंँड जॉन्सन या नामवंत कंपनीच्या इथिकाँन शाखेत नंतर जे.के. केमिकल्स या कामसूत्र हे सुप्रसिद्ध काँन्डोम बनविणाऱ्या कंपनीत पाच महिने काम केले. तेही एकही आठवडी सुट्टी न घेता. दर दिवशी संध्याकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत. असा एक तासाचा ओव्हरटाईम धरून दररोज ९ तासांची ड्युटी केली. तीही डोळ्यात तेल घातल्यासारखी पापणी न लवता. म्हणून सतत च्या जागरणामुळे या पाच महिन्यांच्या खडतर काळात त्यांचे पाच किलो वजन कमी झाले होते. परंतु एवढे करून ही जेव्हा औद्योगिक क्षेत्राची माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली की, कोणत्याही कंपनीत वर्कर म्हणून जर परमनंट जॉब पाहिजे असेल तर निदान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाल्याने त्यांना कळून चुकले की, आपण वर्कर म्हणून कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये परमनंट होऊ शकत नाही. यामुळे मग त्यांनी कॅज्युअल वर्कर मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
तेव्हा सर्वप्रथम चितेगाव औद्योगिक क्षेत्रात करण अलॉइज या कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड पदावर काम केले. येथून मग एफ.डी.सी., ग्रीव्हज मॉर्गनाईट, एन.आर. बी. बेअरिंग, एन.आर.बी. टोरिंगटन, इस्कॉर्ट शॉकऑब्झर्व, बी.सी.एल. स्प्रिंग्ज, सिमन्स अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडे सिक्युरिटी गार्ड पदावर काम केले. यासाठी औरंगाबाद ते चिकलठाणा, औरंगाबाद ते वाळुज, औरंगाबाद ते चितेगाव येथे लागोपाठ पाच वर्षे सायकल ने ये-जा केली. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणतीही शिफ्ट असो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो. एकदा घरून निघाले किंवा कंपनीतून काम करून परत निघाले की, पोहोचेपर्यंत कुठे थांबायचे नाही. औरंगाबादच्या मिल कॉर्नर व आरेफ कॉलनीहून दररोज १५ ते १६.५ किलोमीटर जाणे व तेवढेच अंतर परत येणे, म्हणजेच दररोज ३० ते ३३ किलोमीटर अंतर कापताना पोटाच्या आतळ्या तोंडाला येईपर्यंत दररोज सायकल हाणावी लागायची. कारण बसने ये-जा करण्याएवढे वेतन मिळत नसे. कामाच्या, मेहनतीच्या व वेळेच्या मानाने अत्यल्प मोबदला मिळत असल्याने यादरम्यान युसूफ़ यांनी ऑटो रिक्षा चालविणे शिकले व लायसन, बँज, परमिट काढले. पाच वर्षानंतर औद्योगिक क्षेत्र सोडून दिले.
या पाच वर्षांच्या काळात औरंगाबादला स्वतःचा खर्च सांभाळून व बीडला घरी काही रक्कम पाठवून थोडी रक्कम साठवून ठेवली होती. याबद्दल मामा, काका आणि मेहुण्यांना सांगत तिघांकडूनही काही रक्कम उसनी घेत बजाज कंपनीचा रियर ऑटो रिक्षा ऑटो कार्स या शोरूम मधून विकत घेतला आणि १९९७ ते २००२ पर्यंत औरंगाबाद येथे रिक्षा चालविला.
यादरम्यान २००० साली लग्न झाल्यावर ते औरंगाबादला आणि बायको बीडला यामुळे पुन्हा आर्थिक गळचेपी सुरू झाल्याने २००२ च्या जून महिन्यात औरंगाबाद सोडून रिक्षासह बीडला आले. आणि येथे रिक्षाने प्रवासी वाहतूक करू लागले. आतापर्यंतच्या आयुष्यातील त्यांचा प्रवास यथातथाच होता. मात्र दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली नाही.
परंतु डिसेंबर २००६ साली त्यांना प्रथम हृदयविकाराचा झटका आला. आणि डिसेंबर २००९ साली पुन्हा दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्रास जास्तच वाढल्याने पॅराडाईज हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुहम्मद सिद्दिक अहेमद यांनी मुंबईला जाऊन वॉल चे ऑपरेशन करावे लागेल असे म्हटले. यासाठी ७० ते ७५ हजार रुपयांच्या जवळपास खर्च येईल असे सांगितले. परंतु जवळ एवढी रक्कम नसल्याने त्यांनी आपली आर्थिक चणचण डॉक्टरांना बोलून दाखविली. यावर डॉ. सिद्दिक साहेबांनी त्यांना म्हटले की, तुम्हाला संकोच वाटत नसेल तर एक मार्ग सांगतो ते तुम्हाला जमतं का पहा ! असे म्हणत वृत्तपत्रांमध्ये या विषयी बातमी देण्याचे सुचविले. दुसरा पर्याय नसल्याने डॉक्टर साहेबांनी सांगितलेला मार्ग स्वीकारत बीडच्या स्थानिक वृत्तपत्रांतून वॉलच्या ऑपरेशन साठी आर्थिक मदतीची गरज असल्याची बातमी दिली. ही बातमी वाचून अनेक दानशूरांनी आर्थिक मदत देऊ केल्याने ८ फेब्रुवारी २०१० रोजी वॉल चे ऑपरेशन झाले.
तेव्हापासून त्यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता की, मला याप्रसंगी आर्थिक मदत देणाऱ्यांचा मी कोण ? किंवा ते माझे कोण ? ना कुणाशी रक्ताचे नाते, ना मित्र, ना नातलग. तरीसुद्धा लोकांनी मदत केली. आता यातून उतराई होण्यासाठी मी त्यांच्यासाठी किंवा समाजासाठी काय करू शकतो ? माझ्याकडे तर पैसाअडका काही नाही. की मी त्यांच्या कामी येऊ शकेल. हा विचार सातत्याने मनात घोळत असल्याने एकदा डोक्यात विचार आला की, जसे मला मदत हवी होती म्हणून वृत्तपत्रात बातमी दिली. तसे समाजात जगत असताना अनेकांना अनेक समस्या असतात. त्या समस्या आपल्या निदर्शनास आल्या किंवा कोणी सांगितल्या तर त्या आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून का मांडू नये ? आपल्या लिखाणामुळे जर मांडलेल्या समस्या सोडविण्यात आल्या, त्यावर काम झाले तर याद्वारे का होईना आपण समाजाच्या कामी येऊ शकतो. हा विचार करून त्यांनी लेखणी उचलली.
शहरातील विविध वृत्तपत्रातून वेगवेगळ्या समस्यांच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यावर कामे होऊ लागली. तसा त्यांचा हुरूप वाढत गेला. मग बातम्यांसह मोठ-मोठे लेख लिहिण्यास प्रारंभ केला. यात सर्वप्रथम लिहिलेला लेख म्हणजे "नाताळ निमित्त नाठाळांचा निर्णय" हा होता. यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या दुर्दशेवर प्रकाश टाकणारा "बीड नगरपालिके मी कारंजा टॉवर बोलतोय" हा लेख लिहिला. याची दखल तत्कालीन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी घेऊन कारंजा टॉवर चे नूतनीकरण करून दिले. येथून युसूफ़ यांच्या लेखणीची नोंद घेतली जाऊ लागली. २०१४ सालापासून ध्यानीमनी नसताना वयाच्या चक्क ४२ व्या वर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात मुक्त पत्रकार म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
२०१४ सालापासून ते आतापर्यंत युसूफ़ यांनी वेगवेगळ्या विषयांवर ५० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. बातम्यांची तर मोजदादच नाही. शिवाय मुक्त पत्रकार म्हणून लेख आणि बातम्यांतून मुद्दे मांडूनही जर त्याची शासन-प्रशासनाकडून नोंद घेतली गेली नाही तर मग उचललेल्या मुद्द्यांवर काम होण्याकरिता ते रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलने ही करतात.
आतापर्यंत त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. त्यात जिल्हा रुग्णालय रस्त्याकरिता एका वर्षात केलेली व्यंगात्मक निषेध आंदोलन, भीक मांगो आंदोलन, बेशरम आंघोळ आंदोलन बीडकर अजूनही विसरले नाहीत. या आंदोलनामुळे जवळपास तीस वर्षापासून खितपत पडलेला जिल्हा रुग्णालयाचा रस्ता व या प्रभागातील इतर रस्ते आजमितीला शहरातील इतर रस्त्यांच्या मानाने दृष्ट लागण्याजोगे तयार करण्यात आले आहेत.
त्यांच्या मुक्त पत्रकारितेसह शासन-प्रशासन दरबारी दिलेली निवेदने, वेगवेगळी आंदोलने आणि कार्याची नोंद घेत त्यांना आतापर्यंत चंपावती रत्न पुरस्कार, पद्मपाणी पुरस्कार, जिजाऊ रत्न पुरस्कार, मातृभूमी प्रतिष्ठान चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय युसूफ़ यांनी जिल्हा रुग्णालयाच्या ज्या रस्त्यासाठी वेगवेगळी आंदोलने करून हा रस्ता तयार करण्यास शासन-प्रशासनास भाग पाडले त्याच रस्त्यावर बीड जिल्ह्यातील जीवन स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था रुद्रापूर द्वारा संचलित नाथसावली समाजसेवा प्रकल्पाचे संचालक सोमनाथ गीते यांनी मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केला होता.
त्यांची तळमळ, मनमिळावू व स्पष्ट स्वभाव पाहून प्रत्येक स्थानिक वृत्तपत्रांचे मालक, संपादक, कार्यकारी संपादक त्यांना मोठ्या आस्थेची, प्रेमाची व आदराची वागणूक देतात, मार्गदर्शन करतात. यामध्ये गम्मत भाऊ, चिंचोलीकर मामा, अभिमन्यू घरत, अशोक होळकर, किशोर कागदे, सय्यद जबीऊद्दीन, सुनील नामदेवराव क्षीरसागर, सुभाष चौरे, दिलीप खिस्ती, विजयराजबंब, भागवत तावरे, अजित वरपे, बालाजी मारगुडे, शेख तय्यब, शेख मजीद, बुद्धघोष जावळे, शेख मुजीब, चंदन पठाण, इसाक अहेमद, गुलाब भावसार, रवी उबाळे, बळीराम म्हात्रे, एजाज भाई, बालकिशन सोनी, आजमतुल्ला खान, जालिंदर धांडे या सर्वांचे सहकार्य लाभते. यामुळे समाजातील अडल्या-नडलेल्यांचे प्रश्न सुटतात किंवा मार्गी लागतात याकरिता ते आभार व्यक्त करतात.
नुकताच त्यांचा मोठा मुलगा शेख वासेख़ याने इयत्ता दहावी मध्ये ९४.८० टक्के गुण घेत विशेष प्रावीण्याने यश मिळविले. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने युसूफ़ यांनी त्याला ना कुठे शिकवणी लावली होती, ना कोणत्या कोचिंग क्लास मध्ये भरती केले होते. शिवाय कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने फक्त घरी केलेला पुस्तकांचा अभ्यास आणि अडल्यास भ्रमणध्वनीवरून विषय शिक्षकांचे घेतलेले मार्गदर्शन या बळावर त्याने हे यश प्राप्त केले. तर लहान मुलगा शेख लईक़ इयत्ता आठवीत आहे. ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा प्रपंच चालविताना समाजासाठी एस.एम.युसूफ़ मुक्त पत्रकारितेच्या माध्यमातून करत असलेले कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा