लाकडी फळ्यांच्या वापरामुळे कबरी खचू लागल्या ! मुस्लीम धर्मगुरूंनी प्रबोधन करावे - एस.एम.युसूफ़
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शहरात असलेल्या कब्रस्तानांपैकी मुख्य व मोठे कब्रस्तान असलेल्या शहेनशहावली दर्गा, हज़रत बालेपीर दर्गा, मन्सूरशहावली दर्गा, तकिया, जमाअत ए महेदवीया दायरा इत्यादी कब्रस्तानात गेल्या काही वर्षांपासून मयत दफन करताना लाकडी फळ्यांचा उपयोग करण्यात येत आहे. या लाकडी फळ्या कालांतराने कुजून त्याची माती होऊन जाते. यामुळे कबरी खचण्याचे प्रमाण सर्वच कब्रस्तानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता तर खचलेल्या कबरींवर त्यांच्याशी संबंधित असलेल्या वारसदारांनी माती किंवा मुरूम आणून टाकावे, असे आवाहन कब्रस्तान कमिट्यांना प्रसिद्धी माध्यमातून करावे लागत आहे. ही परिस्थिती फक्त आणि फक्त कबरींमध्ये लाकडी फळ्यांच्या वापरामुळे निर्माण झाली आहे. या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इस्लाम धर्मानुसार मानव मृत झाल्यावर त्याच्या पार्थिव शरीराला कबर मध्ये दफन करून सुपूर्द-गे-खाक अर्थातच मातीत मिसळविणे अपेक्षित आहे. परंतु लाकडी फळ्यांच्या वापरामुळे मय्यतचे पार्थिव शरीर जोपर्यंत लाकडी फळ्या कबरीत चांगल्या स्थितीत असतात तोपर्यंत मातीत मिसळत नाहीत. अर्थातच सुपूर्द-गे-खाक होत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. उलट काही वर्षांनंतर कबरीतल्या लाकडी फळ्या कुजून जेव्हा त्याची माती होते तेव्हा कबरी जवळपास तीन फुटांपेक्षा जास्त खचून जातात. अशा अवस्थेमध्ये एक तर संबंधित मयतांच्या वारसदारांनी नाही तर मग कब्रस्तान कमिटीने खचून गेलेल्या कबरींवर माती किंवा मुरूम टाकने आवश्यक होते. परंतु सध्याच्या काळात भरमसाठ नागरी वस्ती झालेल्या शहरात माती आणि मुरूम आणावे तरी कुठून ? हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून वृक्षतोडीवर मोठ्या प्रमाणात बंधने लावण्यात आलेली आहे. जेवण बनविण्यासाठी सुद्धा इंधन म्हणून आता चूल आणि लाकडाचा वापर जवळपास बंद झाल्यात जमा आहे. मात्र कबरी मध्ये लाकडी फळ्यांचा वापर होत आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच मयत आणि माती यांच्यामध्ये लाकडी फळ्या टाकल्याने एक प्रकारची तात्पुरती भिंत निर्माण होऊन मय्यत दफन करताना सुपूर्द-गे-खाक होत नाही. याचाही विचार करायला हवा. धर्मानुसार अशाप्रकारे मय्यत दफन करण्यास परवानगी असली तरी वस्तुस्थिती पाहून कार्य करणे सुद्धा आवश्यक असते. याचाही विचार व्हावा. लाकडी फळ्यांच्या वापरामुळे कालांतराने खचून गेलेल्या कबरींवर मय्यतांचे वारसदार किंवा कब्रस्तान कमिटी समोर खचलेल्या कबरींवर माती किंवा मुरूम आणून टाकण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहत असेल तर मग कबरीत लाकडी फळ्यांच्या वापराचा पुनर्विचार व्हायला हवा. आणि याकरिता मुस्लीम धर्मगुरुंनी समाजाचे प्रबोधन करावे. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा