शुर पराक्रमी राजे महाराणा प्रताप
इतिहासातील महान राजांपैकी एक मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी उदयपूरचे संस्थापक उदयसिंह द्वितीय आणि महाराणी जयवंता बाई यांच्या घरी झाला.
महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. त्यांची संघर्षमय जीवनगाथा ही इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली.
महाराणा प्रताप हे ८० किलो वजनाचा भाला आणि १२ किलो वजनाचे छाती कवच बाळगून वावरायचे. त्यांच्याजवळ असणाऱ्या भाला, कवच, ढाल आणि दोन तलवारींचे वजन मिळून २०८ किलो एवढे भरायचे. आजही या सर्व वस्तू मेवाड राजघराण्याच्या म्युजियम मध्ये सुरक्षित आहेत.
एका प्रदेशाचा राजा असून देखील संघर्षाच्या काळात त्यांनी मायारा गुहेमध्ये केवळ रोटी खाऊन दिवस काढले. हल्दी घाटाच्या युद्धावेळी त्यांनी याच गुहेमध्ये आपली शस्त्रे लपवली होती. स्वत:जवळ नेहमी दोन तलवारी बाळगण्याचा सल्ला महाराणा प्रताप यांना त्यांच्या मातोश्री राणी जयवंता बाई यांनी दिला होता.
महाराणा प्रताप आणि चेतक घोडा
महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक म्हणजे अजब रसायन होता. तो इतक्या प्रचंड वेगात दौडत असे की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसतं. त्यामुळेच हवेत उडणारा घोडा अशी देखील त्याची ख्याती झाली होती. त्याचे आपल्या सम्राटावर इतके प्रेम होते की त्यांच्या रक्षणासाठी तो स्वत: सरसावत असे. हल्दी घाटाच्या युद्धावेळी चेतकने मानसिंगच्या हत्तीवर उडी घेऊन त्याला पायदळी तुडवले होते. जेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले तेव्हा याच चेतकने २६ फुट लांब नाला पार करत महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले. मुक्या जनावराला असणारी एवढी समज इतिहासात दुसरीकडे कोठेही आढळत नाही.
महाराणा प्रतापांचा शुर योध्दा हकीम खान
हल्दी घाटातील महत्त्वपूर्ण युद्धामध्ये महाराणा प्रताप यांची सेना सांभाळली होती हकीम खान याने. तो एक अफगाणी मुसलमान पठाण होता. परंतु तरीही महाराणा प्रताप यांच्यासाठी त्याने अकबराला कडवी झुंज दिली. असं म्हणतात की, त्याचं शत्रूपक्षाने डोके उडवले तरी त्याच्या शरीरात काही जीव बाकी होता आणि त्याच अवस्थेत तो लढत राहिला. आजही राजस्थान मध्ये योद्धा हकीम खान यांची कबर पाहायला मिळते.
महाराणा प्रताप आणि अकबर बादशाह
अकबर बादशाहने महाराणा प्रताप यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की जर त्यांनी मुघल सत्तेसमोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्तान त्यांच्या अधिपत्याखाली देण्यात येईल. जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमान विकणार नाही. या बाण्याच्या महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला आणि आपल्या संस्कृतीचा मान राखला. महाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल ३० वर्षे झुंझवत ठेवले. अकबराने जंग जंग पछाडले परंतु ३० वर्षे महाराणा प्रताप काही मुघलांच्या हाती आले नाहीत. अकबर बादशाह देखील महाराणा प्रताप यांच्या शौर्यामुळे प्रभावित झाला होता. जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा खुद्द अकबराला ही अश्रू अनावर झाले होते.“शत्रु असावा तर असा” असे उद्गार अकबराने काढले होते.
असे म्हटले जाते की, महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की जोवर चित्तोड परत मिळवत नाही तोवर जमिनीवर झोपेन आणि घासफूस सह गवताची भाकर खाऊन दिवस काढेन. पण याच संघर्षात त्यांचा १९ जानेवारी १५९७ रोजी मृत्यू झाला आणि त्यांची ही शपथ काही पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या याच शपथेचा मान राखीत आजही अनेक राजपूत आपल्या जेवणाच्या ताटाखाली झाडाचे पान ठेवतात आणि उशीखाली थोडेसे सुकलेले गवत ठेवतात. अश्या या महान योद्ध्याला मानाचा मुजरा आणि कोटी-कोटी प्रणाम !
लेखक -
धनवंतराव मस्के
मुख्याध्यापक तथा प्राचार्य
पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
पाटोदा बेलखंडी, ता.जि. बीड.
संपर्क -9011782893
-------------------------
महत्त्वाचे:-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा