Breaking News

पुन्हा एकदा ताटी उघडा ज्ञानेश्वरा...

  

     वर्ष २०१९ सरता सरता अनपेक्षित पणे लोकांना माहित झाले कोरोना व्हायरस. सुरुवातीचे दिवस या व्हायरसला समजून घेण्यात व काहींना कुतूहल करण्यात निघून गेले. काहींनी चीन सारख्या कोरोना व्हायरस च्या उद्गात्या देशाला शिव्या शाप देण्यात बरेच दिवस घालवले. काहींनी चायना मालावर बहिष्कार टाकला. कोणत्याही रोगावर औषधापेक्षा वेळ(समय)हा एक खूप मोठा औषधोपचार असतो. काळवेळ परत्वे बरेचशे आजार दु:ख बरे होत असतात. तसे चायना दु:खही आम्ही विसरत गेलो. आणि उशिरा का होईना कोरोना व्हायरस वर औषध शोधायला पाहिजे हि गरज निर्माण झाली.
       सन २०१९ ते २०२० या सुरुवातीच्या काळात व्हायरस नाहीतरी प्राथमिक स्वरूपात होता. तरीही त्याचे भय तितकेच जास्त वाटत होते. या भयामुळे बरीचशी हावळी जनता आपला जीवनाचा प्रवास संपून पूर्णत्वाकडे गेली. परंतु काही केल्या कुणाला औषध सापडेना. अनेक कल्पना, संकल्पना पुढे येऊ लागल्या. जो तो देश आम्ही लस शोधली याचा डांगोरा पिटण्यासाठी झटू लागला. शास्त्रज्ञांची पराकाष्टा सुरु झाली. परंतु दरम्यानच्या कालावधीत समाज मन अनेक स्थित्यंतरातून होरपळून निघत होते. समज-गैरसमज समाजात घडत होते. अशा मानसिकतेतून जग जात असताना मृत्यू आपला फास मानवतेच्या मानगूटावर आवळत चालला होता. दररोज अनेक दूरदर्शन वाहिन्या बातम्यातून व्हायरस व गेलेल्या बळींचा भयावह आकडा समोर ठेऊन ह्रदयात धडकी भरवत होत्या. दिवसा मागून दिवस गेल्यावर मास्क ची संकल्पना समोर आली. ती आता रूढ होत जाऊन कोरोना संपेपर्यत मानवी जीवनाची एक नितांत गरजेतील गरज होऊन बसली आहे. निरोध सारखे आता सॅनीटायझरने मानवी जीवनातील आपले घर पक्के केले.
        इथपर्यंत ठीक आहे. परंतु आज समाज मन माणुसकीला माणुसकी काय आहे ? आपण समाजाचे काय देणे-घेणे लागतो ? माणूस एक समाज प्रिय प्राणी आहे. आणि आज आम्हा सर्वांना एकमेकांची गरज आहे. हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.
        वर्ष २०१९ पासून आम्ही कलम १४४ अनुभवतो आहे. हे कलम आपत्कालीन परिस्थितीत बाहेर मुक्तपणे संचार करण्यास परवानगी देत नाही. या कालावधीत सदरील कलमाचा उद्देश असा होता कि, कोणालाही कोणापासून व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून घरी बसून रहावे. म्हणून ग्रामीण जनता आपल्या शेतात काम करत होती. परंतु मजूर वर्ग विशेषत: शहरी भागातला असहाय्य जीवन जगणारा मजूर आणखी असहाय्य झाला. मुंबई, पुणे, दिल्ली सारखे शहर लोक भराभरा सोडून आपापल्या गावी परत जायला निघाली. मिळेल त्या साधनाने वाटेल त्या वेळेला अखेरचा उपाय म्हणून शेवटी पायी प्रवास करून आपले घर गाठण्याचा प्रवास सुरु झाला. दरम्यान अनेकांनी रेल्वे खाली तर काहींनी  वाहनाखाली येऊन आपला जीव गमावला. विविध शासकीय योजना आल्या गरिबांना मदतीसाठी गोदामेच्या गोदामे रिकामी झाली. अनेक सेवाभावी संस्था, वैयक्तिक नागरिक पुढे सरसावले. शंभर पासून ते पाचशे रुपया पर्यंत किराणा सामान वाटले गेले. यातही काही अज्ञात पिडीत आपल्या नशिबाला दोष देत समाजाच्या अडगडीला पडून वंचित राहिले.
            आपण आपले आयुष्य जगताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेऊन वावरावे तर आयुष्य चांगले जाते. असे म्हणतात. परंतु लोकशाही राज्य पद्धती मध्ये जर विरोधी पक्ष भक्कम नसेल तर ती हुकुमशाही बनते. म्हणजेच कुठेतरी कायदा सुव्यव्यस्थेसाठी कडू व्हावेच लागते. वैगुण्यावर बोट ठेवले तर चुका सुधारतात व आयुष्य सुकर होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे कि, “निंदकाचे घर असावे शेजारी”. म्हणून समाजातील चांगल्या गुणांचे गुणगान करत बसलो तर चांगुलपणाचा फायदा घेऊन समाजात पुन्हा कर्मठपणा निर्माण होऊ नये.म्हणून आता थोडा नाण्याच्या दुसऱ्या  बाजूचा उहापोह करूया.
         मानवता हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. असे अनेक धर्माच्या साधू-संतांनी सांगितले आहे. जसा कोरोना पाहुणा म्हणून आला तसा त्याचा निसर्गाने आदर सत्कार केला. “बिनबुलाये मेहेमान" सारखा कित्येक घरात शिरला अन् अनेकांच्या कुटुंबाची वाताहत केल्याशिवाय त्याने विश्रांती घेतली नाही. एक मात्र विशेष या पाहुण्याने गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. मात्र त्या रोगाचा पाहुणचार करताना आम्ही समाजातील लोकांनी भेदभाव केला. काहींनी ठरावीक औषध हे उपचार म्हणून त्याचा काळा बाजार करायला सुरुवात केली. काहींनी मेडिकल चे उंबरठे झिजवले. काहींनी लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजवले तर काही आपल्या आप्तेष्टांना वाचवताना कर्जबाजारी व कंगाल होऊनही त्यांना वाचवू शकले नाहीत. गेली अनेक महिने रोगाला पळवून लावण्यासाठी आम्ही लसीच्या शोधात होतो. चकोर पक्ष्याप्रमाणे आकाशाकडे टक लावून सारखी लस येण्याची वाट पाहत होतो. केव्हा एकदा लस येईल असे झाले होते. आणि तो दिवसही आला. अनेक देशांनी त्यावर लस शोधून काढली. शासनाने आपल्या स्तरावर सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देऊन सुरक्षित केले. असे असून देखील आज मोठ्या आतुरतेने ज्या लसीची वाट पाहात होतो तेच आम्ही नागरिक लस न घेता रोग झाल्यावर रेमडीसीवर च्या काळ्या बाजाराने का होईना मिळविण्याच्या मागे लागलो.  यामुळे सर्व नितीमुल्य तुडवली गेली.
          भारताने देखील लस शोधून काढली. ती घेण्यास सुरुवातीला वयोमर्यादेची अट घातली गेली. नंतर दुसरा टप्पा सुरु झाला. मात्र लस पुरेनाशी झाली. म्हणून तो टप्पा रद्द झाला. ज्या ठिकाणी सदरील लसीचे उत्पादन होऊ शकते त्या राज्यातच त्या लसीचा तुटवडा झाला. एकसारखी सर्वांना जर लस टोचली गेली तर अनेकांचे प्राण वाचतील त्यांच्यात प्रतिकार शक्ती वाढेल. म्हणजे महाराष्ट्राच्या पुण्यात जर लस निर्मिती होऊ शकते तर महाराष्ट्र १००% लसीकरण युक्त का होऊ शकत नाही ? आपल्या देशात लस निर्मिती होत असेल तर १३० कोटी जनतेच्या देशात केवळ १६ ते १७ कोटी जनताच लस घेऊ शकते ? किती ही विसंगती ? लस देऊन जनता वाचवायची आहे. लसीचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. याच बरोबर लसीबद्दल जनजागृती करून विश्वासार्हता वाढविणे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. आज अनेक देशातून मदतीचा ओघ सुरु आहे. देशातही ऑंक्सिजन च्या उत्पादनाला प्राधान्य देण्यात येत आहे. हे ही महत्वाचे असले तरी लस उत्पादन वाढवणे त्याहून हि जास्त महत्वाचे आहे. कोरोनाला पळवायचे असेल तर १००% लसीकरण महत्वाचे आहे. असे माझे मत असले तरी शासनाचा त्या लसीवर  विश्वास नाही काय ? यामुळेच की काय शासन लस उत्पादनापेक्षा ऑक्सिजन उत्पादनाला प्राधान्य देत आहे.
             समाजात लसीकरणाबाबत संभ्रम का आहे ? कोरोना काहीही होत नाही, मी मास्क लावत नाही, सॅनिटायझर एक फॅड आहे. कंपनी आपले उत्पादन विकण्यासाठी त्याची मुद्दाम जाहिरात करत आहे. असे बरेच गैरसमज समाजात पसरत आहेत. कोरोनाच्या भीतीतून किराणा दुकानदार एक फळी, एक दरवाजा, एक खिडकीतून सामान लपून-छपून विकताना दिसत आहे. १०० रु. किलो दराचे गोडतेल आज १७० ते १९० ₹ प्रती किलोने विकले जात आहे. लॉकडाऊन च्या काळात बरीच रहदारी कमी असताना सुध्दा पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. “जय किसान" म्हणून आपण किसान ला अन्नदाता म्हणतो. त्याच्या शेतात तर कोरोना पिकत नाही ना ! तरी मात्र त्याला आपलं माळवं लपून-छपून विकावं लागत आहे. ५ रुपये किलो दराने शेतकर्‍यांकडून विकत घेतलेले टमाटे व्यापारी २५ ते ३० रु किलोने विकतो. तेव्हा लोकांना ती गरज वाटू लागते. व कोरोनाची भीतीही वाटत नाही. मग काय शेतकऱ्यांच्या माळव्यातच कोरोना पिकतो काय ? व्यापाऱ्याने घेतल्यावर माळवं कोरोना मुक्त होतो काय ?
            अनेकदा लोक ऋतू बदलाच्या आजाराने आजारी पडतात. तेव्हा ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातात. हल्ली कोरोना लाट जरी चालू असली तरीही प्रत्येक दुखणे हे कोरोनाच असेल किंवा नसेल.यात नक्की निदान आम्ही करू शकत नसलो तरीही आजच्या कठीण कालावधीत आपल्या डॉक्टरांनी आपल्या नेहमीच्या रुग्णाला भेदरवून न सोडता व जास्त नफेखोरीच्या पाठीमागे न लागता एक सामाजिक बांधिलकीने काम करून रुग्णांमध्ये रोगा विरुद्ध लढून जगण्याची उमेद व आत्मविश्वास निर्माण करायला हवा. रुग्णसेवा करणारे अनेक डॉक्टर्स चांगले काम करीत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून रोगाशी लढत आहेत.  परंतु काही अपवाद या पवित्र मानसिकतेला काळीमा फासत आहे.
           औषध दुकानदारांनी देखील एक आपलाच नातेवाईक जगवायचा आहे. तो जगला तर पुढच्या साथीच्या वेळी आपलाच ग्राहक बनून पुन्हा दुकानावर येणार आहे. याचा विचार करून रोग्याला योग्य तेच अस्सल औषध देऊन तो बरे होण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवायला हवा.
            आपले देशातील सरकार हे लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची अपेक्षा असते. यामुळे ते प्रत्येकाला खुश पाहण्यात आपली धन्यता मानतात. परंतु एक व्यक्ती एक सरकार प्रत्येक वेळी सर्वांनाच खुश ठेऊ शकत नाही. कुणाच्याही विरोधात जाणे म्हणजे पुढील पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत होणे असे आहे. हे सांगण्याचा मुद्दा लक्षात आलाच असेल. मुद्द्याची गोष्ट अशी कि वर्ष २०१९ मध्ये कोरोना आला. देशात लॉक डाऊन लागू झाले. अनेक शासकीय-प्रशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, बंद झाली. अनेक कार्यालयात ५० % कर्मचारीच काम करत आहेत. मात्र गेली दोन वर्षांपासून येधे काम करणारे कर्मचारी पूर्ण वेतन घेत आहेत. यातील १०% लोकांच्या मनामध्ये देशासाठी त्यागाची भावना उत्पन्न होत नाही काय ?  एक कर्मचारी सेवा निवृत्त झाला तर शासन त्याला सेवेतील पगाराचा अर्धा भाग निवृत्ती वेतन देते. मग आम्ही स्वत:च जर देश वाचवण्यासाठी त्याग भावना दाखवली व पूर्ण वेतन य घेता ५०% वेतन घेऊन ५०% वेतन शासनाच्या आपत्कालीन निधीसाठी जमा केले तर रोगाने त्रस्त जनतेला रिकाम्या हाताने बसलेल्या गरीब कुटुंबाच्या मुलाबाळांना अर्थसहाय्य देण्यास शासन पुढे होऊन मदत करेल. असे मला  वाटते.
             विविध कोवीड सेंटर मधून अनेक सेवाभावी संस्था, लोक, लोकांची मदत करत आहेत. अशा संस्था दिन दुबळ्यांच्या मद्तीला सरसावली तर अधिकच पुण्य मिळणार आहे. हि एक सुवर्ण संधी आहे.
            या लेखाच्या शिर्षकाला न्याय देताना मी असे म्हणेल कि, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला गेले व त्यांना समाजाच्या तिरस्काराला सामोरे जाताना राग आला तेव्हा त्यांनी स्वत:ला झोपडीत कोंडून घेतले होते. तेव्हा बहिण मुक्ताबाईंनी त्यांची विनवणी करून त्यांच्यातील माणुसकीचा भाव व खरे ज्ञान जागृत करून समाजातील वैगुण्याविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरांच्या मनात निर्माण केले होते. ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा या ओव्यांमधून. त्याप्रमाणे आज माणुसकी रुपी ज्ञानेश्वर आपल्या समाजात आहे. फक्त ताटी उघडा म्हणून सांगण्यासाठी बहिण मुक्ताबाईची गरज आहे.
            माणुसकी रुपी ज्ञानेश्वरांची विनवणी करा. माणुसकीला जगवा व प्रत्येक माणसाला माणूस जोडा. सर्वांना सहकार्य करा, मदत करा. रुग्णांचा तिरस्कार करू नका. या कोरोना काळात तुमच्या हातून जगणारा एक रुग्ण आपल्या आयुष्यात कुठे कामी यईल हे सागता येणार नाही. असो ! तुर्तास तरी मास्कचा वापर करा. सामाजिक अंतराच्या माध्यामातून प्रत्येकाच्या आयुष्याला जपा.

लेखक -
शेख मन्नान ख़ुर्शीद
कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी
मु.पो.चिचोंडी (शिराळ),
ता.पाथर्डी, जि. अहेमदनगर.
संपर्क - 7972940761
=================
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -

एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
आसेफ़ नगर, बीड.
संपर्क- 9021 02 3121
E-mail- smyusuf4371@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत