रुग्णांना ऑक्सिजन व औषधोपचारासह फळांची ही नितांत गरज;लॉक डाऊन मधून फळ विक्रेत्यांना वगळून उपकार करा - एस.एम.युसूफ़
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबरहुकुम जिल्हाभरात औषधी दुकाने वगळता इतर सर्व दैनंदिन व्यवहार कडक लॉकडाऊन लावून बंद करण्यात आलेले आहेत. यामधून कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना सुद्धा आवश्यक असणाऱ्या फळ विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याला इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी औषधोपचारासह फळांची सुद्धा गरज असते. डॉक्टर्स सुद्धा आजारी रुग्णांना औषधोपचारासह विविध फळे खाण्याचा किंवा त्यांचे ज्युस पिण्याचा सल्ला देतात. यात सफरचंद,संत्री, मोसंबी,पपई,किवी,डाळींब,चिकू इ.फळांचा समावेश आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे गेल्या महिन्याभरापासून धडधाकट माणसांना तर सोडा रुग्णांना सुद्धा ही फळे मिळेनाशी झाली आहेत. ज्युस चा तर प्रश्नच नाही. जर कुणी लपून-छपून फळे विकताना आढळला तर पोलीस किंवा नगरपरिषद त्या विक्रेत्याची फळे,वजन काटा एकतर जप्त करून उचलून नेत आहेत किंवा रस्त्यावर फेकून देत आहेत. शिवाय दंडित ही करीत आहे. दोन्ही प्रशासनाच्या अशा कारवाईमुळे प्रश्न पडतो की, एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे कारण देऊन चिंता व्यक्त करायची, तर दुसरीकडे रुग्णांना औषधोपचार व ऑक्सिजन सह आवश्यक असलेल्या फळांची विक्री करण्यास बंदी घालायची. थोडक्यात शासन-प्रशासनाच्या कथनी आणि करणी मध्ये मोठी तफावत असल्याचे यावरून दिसून येते. इतर रुग्णांसह कोरोना रुग्णांना इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी फळ सेवन करण्याची नितांत गरज असताना त्यांना विनासायास फळे उपलब्ध करून देण्याचे कार्य शासन-प्रशासनाकडूनच व्हायला हवे. परंतु कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी का होईना,फळविक्री करणाऱ्यांकडून रुग्णांना फळ मिळते तर तिथेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा बडगा उगारत फळविक्री करण्यास मज्जाव केला जात आहे. एकीकडे रुग्ण रोगांमुळे त्रासलेले आहे तर दुसरीकडे फळविक्रेते शासन-प्रशासनाच्या वक्रदृष्टी मुळे त्रासून गेले आहेत. हे कसले नियोजन आहे ? याचा विचार करा ! आणि रुग्णांना विनासायास फळे मिळतील तसेच विक्री करणाऱ्यांना कोणताही त्रास न देता फळे विकण्यास मुभा देण्याची कृपा करून रुग्ण व फळ विक्रेत्यांवर उपकार करा! अशी विनंती वजा मागणी आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
काही फळांचे गुणविशेष -
१)सफरचंद - बारमाही बाजारात मिळणारे सफरचंद कॅन्सर, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह या रोगांवर गुणकारी असून त्यात मॅग्नीज, पोटॅशियम, कॉपर हे खनिजे असतात. शिवाय व्हिटॅमिन सी, बी६ आणि पचन क्रियेत उपयोगी, कार्बोहायड्रेट सुद्धा असते.
२) संत्री - यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन, मानवी पेशींना संरक्षण देते तसेच पचन क्रियेसाठी उपयुक्त असणारे कार्बोहायड्रेट सुद्धा असते.
३)मोसंबी - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी उपयोगी, यात व्हिटॅमिन सी सोबत मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस, कॅल्शियम आदी मुबलक प्रमाणात असतात.
४)पपई - यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असून व्हिटॅमिन ए सुद्धा असते.
५)किवी - यात व्हिटॅमिन सी, के, ई सोबतच फोलेट, पोटॅशियम आणि फायबर ही असते.
६)डाळिंब - यात व्हिटॅमिन ए, सी आणि फॉलिक ऍसिड असते.
७)चिकू - यात व्हिटॅमिन ए, सी सोबतच नाईसीन, फोलेट, पेंटोथेनिक ॲसिड सह आयरन, पोटॅशियम, कॉपर ही खनिजे ही असतात. यामुळे ही सर्व फळे फक्त कोरोनाच नाही तर इतर रोगांच्या रुग्णांसाठी तसेच निरोगी व्यक्तींसाठी सुद्धा गुणकारी व उपयोगी असतात.
फळ उत्पादक शेतकऱ्यांचा ही प्रश्न
फळ उत्पादक शेतकरी शेतात फळबाग लावल्यानंतर सहसा इतर पिके घेत नाहीत. त्यांचे संपूर्ण नियोजन व अर्थकारण फळबागांवरच अवलंबून असतात. मात्र शासन-प्रशासनाने लावलेल्या लॉक डाऊन मुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे.
फळविक्रेते कि सप्लायर्स ?
फळ विक्री करणाऱ्यांना लॉक डाऊन चे कारण पुढे करून पोलीस आणि नगरपालिकेकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र फळ विक्रेत्यांचे कार्य व सेवा पाहून त्यांना व्यापारी म्हणता येणार नाही. त्यांची मोठी दुकाने नसतात, ना गोदामे असतात. हात गाडे किंवा रस्त्याच्या कडेला कुठेही बसून ते आपली सेवा देतात. म्हणून त्यांना व्यापारी म्हणण्याऐवजी सप्लायर्स म्हणणे आणि त्याच दृष्टिकोनातून पाहणे उचित होईल!
वेळ चुकली की उकिरड्यात...
फळ हे नाशवंत जिन्नस आहेत. फळ बागेतून वेळेवर काढणे आणि ठराविक वेळेत विकले जाणे आवश्यक असते. या दोन्ही प्रक्रियेत जर वेळ चुकली की रुग्णांसह सर्व मानवाला आवश्यक असलेली फळे नासतात आणि मग त्यांना नाविलाजास्तव उकिरड्यावर फेकावे लागते. यामध्ये फळ उत्पादक शेतकरी, फळ विक्रेता यांचेच नुकसान होते असे नाही तर फळांचे सेवन करणाऱ्या माणसांचे सुद्धा नुकसान होते. या बाबीकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे.
फेकाफेकी चा कायदा आहे का ?
या सर्व बाबी पाहता प्रश्न पडतो की, रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे फळांचे हे सप्लायर शासन-प्रशासनाकडून कुठलीही अपेक्षा न बाळगता फक्त स्वतःच्या भरण-पोषणासाठी दिवस-रात्र एक करून आपली सेवा देतात. जी सेवा शासन-प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कधीही मिळाली नाही व पुढेही मिळेल अशी आशा नाही. तरीसुद्धा अशा सेवकांवर ते लॉक डाऊन च्या काळात फळ विक्री करत आहे म्हणून त्यांना आर्थिक दंडित केले जात आहे. त्यांची फळे क्रूरपणे अक्षरशः रस्त्यावर फेकली जात आहे. अशाप्रकारे फेकाफेकी करण्यास नगर परिषद असो की पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यांना कायद्याने मान्यता दिलेली आहे का ? किंवा कायदा असे करण्यास सांगतो का ? असे प्रश्नही यानुषंगाने उपस्थित होत आहे.
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा