रमज़ानच्या निमित्ताने होणारी पत्रकबाजी रोजेदारांसाठी त्रासदायक व मनःस्ताप देणारी - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - रमज़ान महिना आला की, काहीजण वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकबाजी करतात. ज्याचा त्रास रोजेदारांना भोगावा लागतो आहे.
याविषयी सविस्तर असे की, दरवर्षी रमज़ान महिना येतो आणि दरवर्षी नागरिकांच्या समस्या जशाच्या तशाच असतात. त्यात वाढ होते परंतु कमतरता येत नाही. रमज़ान महिना आला म्हणून तर नक्कीच नाही. ही वस्तुस्थिती आहे. लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्या-त्या प्रभागातील तळमळ असणाऱ्यांनी त्या दूर करण्याकरिता पुढे येऊन स्वतः पाठपुरावा करून त्या दूर केल्या आणि नंतर त्या कार्याची पत्रकबाजी केली तर ते सार्थकी लागू शकते. परंतु असे न करता अनेक जण रमज़ान महिन्याला पुढे करून नळांना वेळेवर पाणी सोडा, एवढ्या दिवसाआड सोडा, तेवढ्या दिवसाआड सोडा, लोडशेडिंग करू नका, केली तर या वेळेस करा, रमज़ान च्या निमित्ताने नाल्या काढा आदी मागण्यांचा धडाका लावणारी पत्रकं काढतात. अशी पत्रके छापून आल्यानंतर संबंधित विभागाकडून नेमके याउलट कार्य केले जाते की काय ? अशी शंका येते. कारण अशी पत्रकं नेमकी कोणत्या प्रभागात ? कोणता त्रास आहे ? याचा उल्लेख न करता गोल-गोल लिहिलेली असतात. ज्याचा नकारात्मक प्रभाव संबंधित विभागावर पडून चांगली व सुरळीत असलेली सेवा सुद्धा विस्कळीत होते. ही वस्तुस्थिती आज रमज़ान च्या दुसऱ्याच दिवशी दिसून आली. शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये आज येणारे नळाचे पाणी सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे याची कुठलीही पूर्वसूचना संबंधित विभागाने प्रसिद्धी माध्यमातून दिली नाही किंवा ते देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. साध्या दिवसात तरी नळांना उशिराने येणाऱ्या पाण्याची सुचना प्रसिद्धी माध्यमातून दिली जाते. मात्र नेमके रमज़ानमध्ये ती दिली गेली नसल्याने शहरातील या भागात आज नळाच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या रोजेदारांची तारांबळ झाली. हे पाहता रमज़ान चे निमित्त करून पत्रकबाजी करण्यात काय अर्थ उरतो ? असा प्रश्न उपस्थित करून रमज़ान महिन्याच्या निमित्ताने करण्यात येणारी नकारात्मक पत्रकबाजी रोजेदारांना त्रासदायक ठरणारी व मनःस्ताप देणारी असल्याचे म्हटले आहे.
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़,
बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा