Breaking News

..... तर केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी पाच लाख रुपये देऊ;हा जुमला नसून सत्यवचन आहे - आय.एम.काज़ी 
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील नागरिक आय.एम.काज़ी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी दिलेले वचन व आश्वासन पाळले तर आपण केंद्र व राज्य सरकार ला प्रत्येकी 5 लाख रुपये देऊ आणि प्रत्येक भारतवासी देखील सढळ हस्ते ही रक्कम आपल्या देशासाठी देऊ करेल यात वाद नाही असे नमूद केले आहे.
         
       याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 च्या लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान भारतीय जनतेला वचन देऊन आश्वस्त केले होते की, त्यांच्या पक्षाचे सरकार केंद्रामध्ये स्थानापन्न झाल्यास सरकार कडून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये टाकले जातील. त्यांच्या या वचन व आश्वासनामुळे  जनतेने त्यांच्या पक्षाला त्या वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतदान देऊन देशाच्या सत्तेवर बसविले परंतु पहिल्या वेळेस त्यांच्या सत्ता काळाचे पूर्ण 5 वर्ष संपले तरीही जनता त्यांच्याकडून येणाऱ्या 15 लाखाच्या प्रतीक्षेतच राहिली परंतु ही रक्कम काही जनतेच्या खात्यावर आली नाही. त्यानंतर सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा जनतेने त्यांच्याकडून या निवडणुकीनंतर तरी जनतेच्या खात्यावर ते 15 लाख रुपये येतील. या आशेवर पुन्हा त्यांच्या व त्यांच्या पक्षावर विश्वास दाखवून दणदणीत बहुमत देत केंद्राची सत्ता दुसऱ्यांदा त्यांच्या हाती दिली. त्यालाही आता 2 वर्षं उलटून गेली आहेत. पहिल्या वेळेसचे त्यांचे 5 वर्ष आणि हे 2 वर्ष असा एकूण 7 वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांनी अजूनही जनतेच्या खात्यावर 15 लाख रुपये काही टाकले नाही. 15 लाख नाही तर निदान पुढील प्रमाणे तरी जनतेच्या खात्यावर रक्कम टाकावी. यातून काही रक्कम जनता केंद्र आणि राज्य शासनाला सुद्धा देईल. प्रत्येक भारतीयाला त्यांच्या व त्यांच्या पक्षाकडून म्हणजेच केंद्र शासनाकडून गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून कोरोना महामारी मुळे त्रस्त असलेल्या काळात जर रक्कम देण्यात आली तर "बुडत्याला काडीचा आधार", "फुल नाहीतर फुलाची पाकळी" या दृष्टिकोनानुसार मदतीचा हात मिळेल. म्हणून त्यांचेकडून येणे असलेले 15 लाख राहू द्या. त्यातून जनतेला फक्त प्रति व्यक्ती दरमहा 10 हजार रुपये प्रमाणे फक्त 5 महिने जनतेच्या खात्यावर रक्कम टाकावी. अशाप्रकारे पाच महिन्यात जनतेला 50 हजार रुपये त्यांच्याकडून येतील. 5 महिन्यानंतर प्रत्येक भारतीयाला प्लॉट खरेदी साठी 2 लाख रुपये त्याच्या खात्यावर टाकावे. त्याने प्लॉट खरेदी केल्यावर घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये त्याच्या खात्यावर टाकावे. याप्रमाणे त्यांच्याकडून प्रत्येक भारतीयाच्या खात्यावर 5 लाख रुपये जमा होतील. उरलेल्या 10 लाख रुपयांपैकी केंद्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मदतनिधी म्हणून 5 लाख रुपये वर्ग करावे. आणि उरलेले 5 लाख रुपये आमच्या महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे वर्ग करावे. अशाप्रकारे त्यांच्याकडून प्रत्येक भारतीयाला 15 पैकी फक्त 5 लाख रुपये येतील परंतु त्यापेक्षा जास्त रक्कम राज्य आणि केंद्रशासनाच्या तिजोरीत जमा होईल. या रकमेतून आपल्या देशाला जागतिक महासत्ता होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तेव्हा विचार करा, याप्रमाणे आपण जर ही योजना राबविली तर नक्कीच फक्त त्यांची किंवा त्यांच्या पक्षाचीच नाही तर सर्वसामान्य नागरिका पासून  आपल्या देशाची भरभराट होईल आणि पुढे येणाऱ्या वर्षानुवर्षे कितीही पंचवार्षिक निवडणुका झाल्या तरी त्यात जनता पूर्ण इमानेइतबारे तुमच्या पक्षाला मतदान करेल. तुम्ही हयात राहो न राहो परंतु त्यांचा पक्षच सत्तेवर राहील हे नक्की. तेव्हा त्यांच्या समोर आणि त्यांच्या नंतरही त्यांच्या पक्षाचा सदासर्वदा दर 5 वर्षानंतर राज्याभिषेक होईल आणि त्यांच्याच पक्षाच्या हातात देशाची सत्ता राहील. यासाठी तरी आपल्या देशाच्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकाच्या खाती रक्कम टाकण्याची कृपा करावी. अशी विनंती आय.एम.काज़ी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली असून हा फक्त जुमला नसून सत्यवचन असल्याचे म्हटले आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत