भर उन्हाळ्यात पाणपोया तहानलेल्याच;गौतम भाऊ तुम्ही तरी लक्ष घाला!
चंगळवादाच्या काळात गोरगरिबांची तहान कोण भागविणार?- एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - शहरात असलेले जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, एस.टी.स्टँड, जिल्हा रुग्णालय अशा सर्व सामान्यांची रेलचेल असणाऱ्या ठिकाणी मोठा गाजावाजा करत निर्माण करण्यात आलेल्या पाणपोया भर उन्हाळ्यात पाण्याविना तहानलेल्या असल्याने पैसे देऊन जार आणि बिसलेरीच्या पाण्याची बॉटल वापरणाऱ्यांच्या या चंगळवादाच्या काळात गोरगरिबांची तहान कोण भागविणार ? असा मर्मस्पर्शी प्रश्न उपस्थित करत धडाडीचे समाजसेवक आणि माणुसकी असणारे खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम भाऊंनी तरी याकडे लक्ष घालून गोरगरिबांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे लक्षवेधी आवाहन केले आहे.
याविषयी सविस्तर असे की, जिल्हाभरातील सर्व प्रशासकीय कार्यालयांचे मुख्य कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातील सर्वसामान्य जनता आपले प्रश्न विविध आंदोलने, उपोषणे, धरणे, मोर्चे इत्यादीतून मांडतात. यामुळे काही वर्षांपूर्वी जैन सामाजिक संघटनेने आंदोलनकर्त्यांसाठी येथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चांगले मोठे लोखंडी स्टॅन्ड बनवून त्यात चार रांजण ठेवले होते. ज्यात काही काळ नियमितरित्या पाणी भरले जायचे. ज्याचा लाभ सर्वसामान्यजनांना मिळायचा परंतु कालांतराने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने चार पैकी तीन रांजण राहिले असून एकाची तुटफूट झाली आहे. उर्वरित तिन्ही रांजण पाण्याविना कोरडेठाक पडून आहेत.
तहसील कार्यालयात ही अभ्यागतांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. परंतु त्या टाकीमध्ये सुद्धा तहसील प्रशासनाकडून पाणी भरले जात नसल्याने तीही पाण्याविना तहानलेलीच आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणाचे मुख्य बस स्थानक असलेले बीड शहरातील एस.टी.स्टँड जिथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह दररोज हजारो लोकांची वर्दळ असते, अशा एस.टी.स्टँड मध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये याकरिता एस.टी.स्टॅन्ड प्रशासनाकडून एक आणि जैन संघटनेकडून एक असे दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु एस.टी.स्टँड प्रशासन आणि सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही टाक्या पाण्याविना कोरड्याठाक पडून आहेत.
जिल्हा रुग्णालय येथे रुग्णालय प्रशासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेली भली मोठी टाकी सुद्धा पाण्याविना कोरडीठाक पडून आहे. विशेष म्हणजे या पाण्याच्या टाकीला लावलेल्या डझनावारी तुट्ट्या काढून त्याजागी निप्पल लावून टाकण्यात आले आहे. यामुळे आता यात पाणी जरी भरले तरी तुट्ट्या लावल्याशिवाय त्यातील पाण्याचा लाभ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घेता येणार नाही अशी अवस्था आहे.
याशिवाय क्षीरसागर बंधूंनी मोठा गाजावाजा करत थंड पाण्याच्या ए.टी.एम. चा खोका जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणून ठेवला होता. या नावाला ए.टी.एम. असलेल्या खोक्या मध्ये ऑल टाइमचं सोडा चुकून कधीतरी सुद्धा पाणी मिळत नाही. हे पाण्याच्या ए.टी.एम. चे खोके साधारण वर्षभरापेक्षा जास्त काळापासून पाण्याविना ठणठणीत पडून आहे. तसेच त्याच्याच बाजूला समाजसेवकाने लोखंडी स्टॅन्ड बनवून त्यात ठेवलेले दोन रांजण सुद्धा पाण्याविना धूळखात पडून आहेत.
अशाप्रकारे या एकूण सहा पाणपोयांची अवस्था आहे. त्या भर उन्हाळ्यात पाण्याविना तहानलेल्या असल्याने पैसे देऊन जार आणि बिसलेरीच्या पाण्याची बॉटल वापरणाऱ्यांच्या या चंगळवादाच्या काळात या ठिकाणी कामानिमित्त ये-जा करणाऱ्या गोरगरिबांची तहान कोण भागविणार ? असा मर्मस्पर्शी प्रश्न उपस्थित करून शासन-प्रशासनासह इतर सामाजिक संस्था व संघटनांची अनास्था पाहता शहरातील खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम भाऊ यांनी तरी याकडे लक्ष घालून सर्वसामान्यांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी असे आवाहन केले आहे.
ये इंतज़ाम बेकार है;हर तरफ बिक रहा जार है!
या सर्व ठिकाणी तहानलेल्या गोरगरिबांना जेव्हा पिण्याचे पाणी सहजासहजी मिळत नाही, तेव्हा पाणी विकत घेऊन पिऊ न शकणारे लोक मोठ्या निराशेने व उपहासाने म्हणत आहेत की, "ये इंतजाम बेकार है, हर तरफ बिक रहा जार है।"
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक
तथा
मुक्तपत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा