काकू-नाना च्या नावांचे आडत मार्केट आणि गॅरेज लाईन विकासापासून कोसो दूर !आगामी बीड न.प. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तरी विकास करा - एस.एम.युसूफ
बीड (एस.एम.न्युज) - शहरातील खास बागेत असलेले आडत मार्केट आणि जालना रोड येथील गॅरेज लाईन ला काकू-नाना यांचे नाव देण्यात आले खरे ! परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही दोन्ही ठिकाणे विकासापासून कोसो दूर असल्याने निदान येणाऱ्या आगामी बीड नगर परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तरी या दोन्ही ठिकाणचा विकास करावा. अशी मागणी केली आहे.
याविषयी सविस्तर असे की, खास बागेतील आडत मार्केट ला सुरुवातीपासूनच काकू-नानाचे नाव देण्यात आलेले आहे. त्यांचे नाव देण्यात आल्याने येथे सगळे काही चांगभले होईल. अशा भ्रमात बागवान व शेतकऱ्यांसह जनता ही होती. परंतु भ्रमाचा भोपळा गेल्या अनेक वर्षापूर्वीच फुटला असून या आडत मार्केटच्या दोन्ही बाजूचे रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. या रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की, तिथे वाहन चालविणे तर दुर पायी चालणे सुद्धा अवघड झालेले आहे. भाजीपाला लिलावाकरिता मांडण्यासाठी जमिनीवर उंच काँक्रीट केलेले नाही. जमिनीवर जनावरांचे शेण, डुकरांचे व कुत्र्यांचे लेंडे, शेळ्या व मेंढ्यांच्या लेंड्या दररोज मोठ्या प्रमाणात असतात. सर्व जनावरांनी केलेले मूत्रविसर्जन वेगळेच. त्याच जागी भाजीपाला टाकून लिलाव करण्यात येतो. लाइट्स चे खांब सुद्धा हवे त्या प्रमाणात लावण्यात आलेले नसल्याने अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. हिरव्या पालेभाज्यांसाठी व शेतकऱ्यांसह माळवं विकणाऱ्या विक्रेत्यांसाठी पाण्याचा बंदोबस्तही नाही. अशा अवस्थेत येथे गेल्या अनेक वर्षांपासून आडत मार्केट सुरू आहे. परंतु याचे गांभीर्य ना आडत्यांना आहे, ना शासन-प्रशासनाला. आडत मार्केट साठी रस्त्यांसह काँक्रीटचे वट्टे, पाण्याची सोय, लाईट्सची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
जालना रोडवरील काकू-नाना गॅरेज लाईन येथे रस्त्याच्या दुतर्फा गाड्या दुरुस्त करणारे अनेक गॅरेज आणि स्पेअर पार्टस् ची दुकाने आहेत. दररोज या रस्त्यावर गाड्या आणि हजारो लोक ये-जा करतात. या काकू-नाना गॅरेज लाईनच्या मुख्य रस्त्याला निर्माणापासून आतापर्यंत एक पळी डांबर किंवा एक टोपलं काँक्रीट बीड नगर परिषद कडून मिळालेलं नाही. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत कामे करणाऱ्यांची आणि करून घेणाऱ्यांची येथील फुफाट्याने तोंडं माखतात. म्हणून नागरिकांना वेगवेगळे श्वसन विकार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या काकू-नाना गॅरेज लाईनचंही कोणालाच सोयरसुतक नाही. या रस्त्याला लवकरात लवकर डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून घेणे आवश्यक आहे. म्हणून आडत मार्केट आणि गॅरेज लाईन येणाऱ्या आगामी बीड नगरपरिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तरी त्यांचेच सुपुत्र असलेल्या नगराध्यक्षांनी व नातू असलेल्या आमदारांनी तसेच उपनगराध्यक्ष व नगरसेवक असलेले दोन्ही नातू या चौघांनी मिळून या दोन्ही ठिकाणांचा विकास करावा. अशी मागणी केली आहे.
काका-पुतण्याचे ट्वेंटी-ट्वेंटी संघ !
गेल्या बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष काकांच्या पदरात मतदारांनी वीस नगरसेवक तर पहिल्यांदाच काकू-नाना आघाडी स्थापन केलेल्या व नंतर आमदार झालेल्या पुतण्याच्या पदरात सुद्धा वीस नगरसेवक टाकले. या दोन्ही कर्णधारांचे ट्वेंटी-ट्वेंटी नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी शहराच्या खेळपट्टीवर विकासाच्या धावा काढण्याऐवजी त्यांनी आपापल्या ट्वेंटी-ट्वेंटी संघाची आपसात दाटूम ची लढाई व लुटूपुटू चा संघर्ष जनतेला दाखविण्यास प्राधान्य दिले. यामुळे गेल्या चार वर्षात शहरासह विकासाचाही पार बट्ट्याबोळ झालेला आहे. यामुळे काका-पुतण्यांच्या या ट्वेंटी-ट्वेंटी संघाच्या सामन्यात जनतेच्या गळ्यात मात्र अधोगतीची घंटी बांधली गेली आहे.
संपादक, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा