ना.जयंत पाटलांनी बिंदुसरा नदी पात्र पाहण्यासाठी नाही तर पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठीच यावे !
बीड (एस.एम.न्युज) - बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. संदीप क्षीरसागर यांनी नुकतीच प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती दिली की, खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाला राज्याचे जलसंपदामंत्री यांनी मंजुरी दिली असून लवकरच ते बीड ला येऊन नदी पात्राची पाहणी करणार आहे. तेव्हा ना. जयंत पाटलांना सर्व बीडकरांच्या वतीने कळकळीची विनंती की, त्यांनी बिंदुसरा नदी पात्राची फक्त पाहणी करण्यासाठी न येता जेव्हा पुलाच्या बांधकामास सुरुवात करायची असेल त्यावेळीच यावे आणि बीडकरांना पूल प्रत्यक्षात निर्माण करून देण्याची मागणी केली आहे.
याविषयी सविस्तर असे की, गेल्या जवळपास पस्तीस वर्षात बीड विधानसभा मतदारसंघात जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून जेवढ्या आमदारांना निवडून दिले त्यापैकी माजी आ. सुरेश नवले यांनी शहरात जिल्हा स्टेडियम बांधून दिले तर माजी आ. सय्यद सलीम यांनी माजलगाव बॅक वॉटर प्रकल्प योजना रात्रंदिवस एक करून निर्माण करून दिली. या दोन आमदारांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही आमदाराने शहरासाठी किंवा शहरातील जनतेसाठी नाव घेता येईल असे नवीन विकासात्मक काम केलेले नाही. सध्या असलेल्या विद्यमान आमदारांचाही एक वर्षापेक्षा जास्त काळ संपलेला आहे. या काळात त्यांच्या हातूनही आजपर्यंत नाव घेता येईल असे कार्य घडलेले नाही. तर जनतेमधून निवडून न येताही बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले विधानपरिषद सदस्य आ. विनायक मेटे यांनी बिंदुसरा नदीवरील बार्शी रोड चा मोठा पूल स्वतः लक्ष घालून युद्धपातळीवर निर्माण करून दिला. हे पाहता खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील पूल आता बीडकरांसाठी त्यांनीच निर्माण करून द्यावा. अशी मागणी दिनांक २० आणि २१ सप्टेंबर २०२० रोजी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून केली होती. याची दखल घेत आ. विनायक मेटेंनी बातमी प्रकाशित झाल्यानंतर जातीने येऊन बिंदुसरा नदी पात्राची पाहणी केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या पुलाचा प्रश्न मांडून मंजुरी मिळवून घेतली. तसे त्यांनीही प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केले होते. आता बीड विधानसभेचे विद्यमान आ. संदीप क्षीरसागर यांनीही येथे पुलासह बंधारा निर्माण करायचा असल्याचे आणि त्याला ना. जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असल्याचे तसेच पाटील स्वतः जातीने बिंदुसरा नदी पात्र पाहण्यासाठी येणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केले आहे. आजपर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात अनेक आमदार झाले त्यातून काही मंत्रीही झालेत. या सर्वांनी आपल्या कार्यकाळात अनेकदा अनेक विषयांची व प्रश्नांची पाहणी केली. परंतु कार्य काय तर काहीच नाही. बीडकर जनतेला आता आमदार, खासदार, मंत्र्यांचे असे वांझोटे पाहणी दौरे पाहून उबग आला आहे. तसेच जनतेला आता अशीही शंका येत आहे की, या पुला प्रश्नी आ. विनायक मेटे यांनी घेतलेला पुढाकार आ. संदीप क्षीरसागरांना रुचला नसल्याने त्यांनी यात उडी घेतली आता या पुलाचे काही खरे नाही ! कारण दोन मुल्ल्यांमध्ये सुसंवाद नसेल तर कोंबडी कधीही मुर्दाडच होते. याचे ठळक उदाहरण म्हणजे अलीकडच्या काळात प्रस्तावित करण्यात आलेले साठे चौक ते शिवाजी चौकापर्यंत च्या संभाव्य उड्डाणपुलाचे देता येईल. अशाच प्रकारे खासबाग-मोमीनपुरा या नियोजित संभाव्य पुलामुळे आ. मेटे यांचे नाव होऊ नये म्हणून आ. क्षीरसागरांनी हा खटाटोप चालविला असल्याचे ही बोलले जात आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेला आता लोकप्रतिनिधींकडून वारंवार दिसून येणारा श्रेयवादाचा खेळ नवा राहिला नाही. विकासात्मक कामाबाबत नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न हा अनुभव नित्याचा झाला आहे. तेव्हा बीडकर जनतेला खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील संभाव्य पूलाबाबत पुन्हा एकदा असा अनुभव येऊ नये म्हणून ना. पाटील यांनी फक्त बिंदुसरा नदी पात्र पाहण्यासाठी न येता येथील पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यास यावे आणि बीडच्या जनतेला हा पूल प्रत्यक्षात निर्माण करून द्यावा. अशी मागणी केली आहे.
एस.एम.युसूफ
मुख्य संपादक , बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा