Breaking News

जि.प.माध्यमिक शिक्षकांचा दसरा व दिवाळी पगाराविना, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला सहाय्यक बाईंनी दाखवली केराची टोपली

बीड - जिल्ह्यातील जि.प.च्या माध्यमिक शिक्षकांचा पगार ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत देण्यात आलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून माध्यमिक शाळेचे शिक्षक पगारापासून वंचित आहेत. म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी शिक्षण संचालक कार्यालयाला याबाबत पत्र व्यवहार केला असता  सहाय्यक असलेल्या बाईंनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून कळाले आहे.
          याबाबत सविस्तर असे की, बीड       जिल्ह्यातील  खाजगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक च्या सर्व शिक्षकांसह माध्यमिक शिक्षकांचे वेतन ही दरमहा नियमानुसार काढण्यात येत आहे. असे असताना माध्यमिक विभागात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील माध्यमिक शाळेतील जेमतेम २६५ शिक्षकांचे वेतन का काढण्यात येत नाही? असा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक विचारीत आहेत. कोरोना काळातसुद्धा सर्वांचे वेतन वेळेवर होत आहे. मात्र आमच्यासोबतच ही सावत्र वागणूक का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने जि.प. माध्यमिक शिक्षकांचे सर्व आर्थिक गणित पार बिघडून गेले आहे. किराणा, भुसार, अन्नधान्य, भाजीपाला, दूध, मटन इत्यादी जीवनावश्यक वस्तू सुद्धा आता उधारीवर मिळत नसल्याने माध्यमिक शिक्षक खवळलेले आहेत. कारण गेल्या तीन महिन्यांची उधारी त्यांना फेडता आलेली नाही. याच अवस्थेमध्ये सर्वात मोठा असलेला दसऱ्या सारखा सण आनंदा विना साजरा करावा लागला आहे. त्यातच आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी सुद्धा वेतनाविना रिकाम्या खिशाने साजरी करावी लागणार असे चित्र माध्यमिक शिक्षकांच्या समोर आवासून उभे राहिले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष उत्पन्न झाला आहे. ही परिस्थिती पाहता बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक बाईंनी त्या पत्राला केराची टोपली दाखविल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळाले आहे. दसरा-दिवाळी सारख्या मोठ्या सणांना जर नवीन पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या हातात शासन त्यांच्या हक्काचे वेतन देत नसेल तर अशा वेळी शिक्षकांनी काय करावे? असा प्रश्न केला असून, वेतनाबाबत शिक्षकांवर होत असलेला हा अन्याय दूर करून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याचे वेतन एकरकमी देण्यात यावे. अशी मागणीही केली आहे.

एस.एम.युसूफ
पत्रकार तथा शिक्षणमित्र, बीड.
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत