Breaking News

ऐतिहासिक दगडी पुलावरील खड्डे बुजवून दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारा - एस.एम.युसूफ

बीड - ऐतिहासिक दगडी पुलावरून जनतेला यमसदनी धाडायचंय का ? पुलावर पडलेल्या खड्ड्यांचं काय ? संरक्षक कठडे कोण उभारणार ? असे प्रश्न उपस्थित करून दणक्यांपासून मणक्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होवून जीव जाण्याची शक्यता असल्याने येथील खड्डे त्वरित बुजवून पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बांधण्यात यावे. अशी मागणी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
        
       याबाबत सविस्तर असे की, बिंदुसरा नदीवरील ऐतिहासिक दगडी पुलावर भले मोठे लांब व रुंद दोन खोल खड्डे पडल्याने पुलावरून ये-जा करणारी वाहने खड्डे चुकवताना आकस्मिकपणे नदीत पडण्याचा धोका निर्माण झाला असून अशी घटना घडली तर वाहन चालकांसह इतरांना जीव गमवावा लागू शकतो. हे लक्षात घेता या पुलावरील खड्डे त्वरित बुजवून संरक्षित कठडे उभारण्याची आवश्यकता आहे. बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या वसाहतींमध्ये जाण्या-येण्यासाठी चांदणी चौकातील या ऐतिहासिक दगडी पुलाचा वापर करण्यात येतो. एक तर हा पुल कमी रुंदीचा व पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षित कठडे नसल्याने या पुलावरून ये-जा करताना वाहन चालकांना धोका पत्करून वाहन चालवावे लागत आहे. कठड्याविना असलेल्या या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून जर वाहन चालविण्यात आले तर वाहनांना जोरात दणके बसत आहे. दणक्यांपासून शरीरातील मणक्यांना वाचवण्यासाठी वाहन चालक खड्डे चुकवून वाहन चालविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नात अनेक वाहन याठिकाणी नदीत पडता-पडता वाचताहेत. परंतु दरवेळी ते वाचतीलच याची शाश्वती नाही. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात थोडी जरी चूक झाली तर दुचाकीसह तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणतेही वाहन बिंदुसरा नदीत कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र याकडे बीड नगरपरिषदेचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. या ऐतिहासिक दगडीपुलावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बांधून संभाव्य धोका व अपघात टाळावे. अशी मागणी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करत जर या ऐतिहासिक पुलावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात आले नाही व संरक्षक कठडे बांधण्यात आले नाही तर याविषयी जिल्हाधिकारी साहेबांना भेटून तक्रार करण्यात येईल. असा इशारा ही दिला आहे.

एस.एम.युसूफ
पत्रकार तथा शहराध्यक्ष निर्भिड पत्रकार संघ,बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत