Breaking News

नवीन मुताऱ्यांची बांधणी सदोष असल्याने 'त्या' लवकरच अडगळीत पडणार;लाखोंचा खर्च वाया जाणार!

            बीड शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मुताऱ्यांची बांधणी सदोष असल्याने त्यांची वेळीच दुरुस्ती केली नाही तर त्या लवकरच अडगळीत पडणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
         दिलेल्या निवेदनात सविस्तरपणे नमूद केले आहे की, एक तर शासन-प्रशासनाकडून शहरातील विकासात्मक कामे लवकर होत नाहीत. आणि जर करण्यात आली तर ती चुकीच्या पद्धतीने करण्यात येतात. अशाच प्रकारे नुकतेच शहरात अनेक ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या मुताऱ्यांचे सदोषरित्या करण्यात आलेल्या बांधकामामुळे त्या लवकरच अडगळीत पडणार आहेत. या नवीन मुताऱ्यांचे बांधकाम बहुतेक सहा फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या पुरुषांना नजरेसमोर ठेवून करण्यात आले आहे. बहुदा यामुळेच मुत्र विसर्जनाचे भांडे आवश्यकतेपेक्षा जास्त उंचीवर बसविण्यात आले आहे. शिवाय लघु शंका करणारा ज्या उंचवट्यावर उभा राहणार आहे ते उंचवटे पाहिजे त्यापेक्षा खाली ठेवण्यात आले आहे. यामुळे साधारण पावणेसहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंची असलेले पुरुष जेव्हा या नवीन मुताऱ्यांमध्ये लघवी करण्यासाठी जाताहेत तेव्हा मुत्र विसर्जनासाठी तिथे बसविलेल्या भांड्यांमध्ये पुरुषांना लघवी करता येत नाहीये. म्हणून नाईलाजास्तव पुरुष मंडळी भांड्यांऐवजी भिंत आणि उभ्या फरशीच्या कोपऱ्यांमध्ये लघवी करीत आहेत. यामुळे भांड्यांमधून मूत्र नालीत जाण्यासाठी असलेले पाइप निकामी ठरत असून ज्यासाठी भांडे व पाईप लावलेले आहेत ते साध्य होत नाहीये. पुरुष मंडळी भिंत व उभ्या फरशीच्या कोपर्‍यात लघवी करत असल्याने ती पाईपद्वारे नालीत न जाता मुताऱ्यातच तुंबून राहत असल्याने उग्रवास व गलिच्छता पसरत आहे. शिवाय आतील गलिच्छ अवस्था पाहून लघुशंका करणाऱ्यांना लघवीसाठी मध्ये जाण्याची हिंमत होत नाहीये. यामुळे लवकरच या नवीन मुताऱ्या अडगळीत पडणार असून एक-एका मुताऱ्यांच्या बांधकामावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे. असे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
भांडे खाली घ्या किंवा उंचवटे उंच करा!
चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेले भांडे लघवी करणाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. हे भांडे लघुशंका करणाऱ्यांना सुसह्य व्हावे, याकरिता ते खाली लावण्यात यावे. किंवा लघुशंका करताना उभे राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या उंचवट्यांची उंची कमीत कमी चार ते पाच इंच अजून उंच करावी. तेव्हाच या मुताऱ्या वापरणाऱ्यांना सुसह्य होतील व गलिच्छतेमुळे अडगळीत पडणार नाही.

अभियंता व गुत्तेदार वेस्ट इंडिज चे आहेत काय?
मुताऱ्यातील उंचवट्यांची कमी उंची व आवश्यकतेपेक्षा जास्त उंचीवर बसविण्यात आलेले भांडे पाहता असे वाटते की, याचे डिझाईन तयार करणारे अभियंता आणि बांधकाम करणारे गुत्तेदार बहुतेक वेस्टइंडीज मधील असावेत. म्हणूनच त्यांनी सहा फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंची असलेल्या पुरुषांसाठी सुसह्य होतील अशा मुताऱ्या बनविल्या आहेत. यामुळे पावणे सहा फुट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या भारतीय पुरुषांना या मुताऱ्या बांधूनही उपयोगाचे नसल्याचे दिसून येत असून जर बांधकामात करण्यात आलेली चूक वेळीच सुधारण्यात आली नाही तर एक-एका मुतारी वर करण्यात आलेला लाखोंचा खर्च वाया जाणार यात दुमत नाही.

एस.एम.युसूफ
पत्रकार तथा शहराध्यक्ष
(निर्भिड पत्रकार संघ), बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत