Breaking News

भंगारवाले पितामह गेले😭.......


पितामह म्हटले की, आम्हा सर्व भारतीयांसमोर दादाभाई नौरोजी यांचे नाव व फोटो येतो. कारण आम्ही सर्वांनी थोरांची ओळख या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी असलेला धडा अनेकदा वाचला आहे. दादाभाई नौरोजी यांचे कार्य देश पातळीवर होते. परंतु आज मी एक अशा माणसाला पितामह म्हणत आहे, जे फक्त त्यांच्या कुटुंबियांपुरतेच नाही तर त्यांच्या संपूर्ण खानदानासह समाजातील इतरांसाठी सुद्धा पितामह सारखेच होते. ते होते शेख इस्हाक़ अन्सर भंगारवाले. ज्यांचे नुकतेच १२ ऑक्टोबर २०२० सोमवार रोजी दुःखद निधन झाले. यामुळे फक्त शेख कुटुंबीयांनीच नव्हे तर अनेकांनी भंगारवाले पितामह गमावले. या पितामह ला जवळून पाहण्याचे, अनुभवण्याचे भाग्य मला लाभले ते  शेजारी म्हणून. त्यांच्या निधनानंतर जड अंतकरणाने त्यांचे काही पैलू माझ्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे पैलू वाचून वाचकांनाही अभिमान वाटेल.

थोडक्यात कौटुंबिक पार्श्वभूमी
शेख इस्हाक़ अन्सर हे अशिक्षित होते. परंतु तहहयात माणुसकीचे शिक्षण घेत व देत राहिले. अत्यंत गरिबी मध्ये जन्मले. मात्र कष्ट करण्याची, लागेल तेवढी मेहनत उचलण्याची, ठरविलेले करण्याची जिद्द त्यांच्या ठायी-ठायी भरलेली होती. हे करताना कधी कोणावर रागावणे नाही, की कुणाचे मन दुखावणे नाही. जे काही करायचे ते कोणताही त्रागा न करता. आलेल्या विपरीत परिस्थितीला धैर्याने तोंड देताना शांत चित्त राहायची त्यांची खुबी अनेकांना जाम आवडायची. त्यांचे पहिले लग्न झाले आणि दोन मुलं झाल्यानंतर पत्नी चे निधन झाले. भंगार चा धंदा करत आता दोन लहान मुलांचा सांभाळ एकट्याने कसा करावा ? हा विचार करून सासऱ्यांशी बोलून मेहुणीशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर आपल्या मोठ्या बहिणीच्या दोन्ही मुलांचे स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणेच या माउलीने संगोपन केले. या दोन्ही मुलांचे संगोपन करत असतानाच या द्वयीला सहा मुली आणि दोन मुले झाली. असे एकूण बारा जणांचे मोठे कुटुंब झाले. सर्व मुला-मुलींना लिहिण्यावाचण्यापुरते शिक्षण मिळाले की बस! या धोरणाने त्यांनी सर्व मुलामुलींना जेमतेम शिक्षण दिले. तसेच फक्त नोकरी मिळविण्याकरिता शिक्षण घेत राहायचे आणि नोकरीच्या मागे लागून जर ती मिळाली नाही तर निराश होऊन आयुष्य जगायचे. या धोरणाला त्यांचा कायम विरोध होता. ते नेहमी म्हणायचे नोकरीच्या मागे लागून माणसाने आपले आयुष्य वाया घालवू नये. लिहिण्यावाचण्यापुरते शिक्षण आले की, आपला उद्योग-व्यवसाय सुरू करावा. त्यात जम बसवून आयुष्य जगावे. याकरिता ते पैगंबर मुहम्मद रसुलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलेले प्रवचन म्हणायचे. पैगंबरांनी म्हटलेले आहे की, ताबेदारी (नोकरी) करण्यापेक्षा तिजारत (व्यवसाय) करा. त्यात नोकरीपेक्षा ७० पट अधिक लाभ आहे. हे धोरण त्यांनी तहहयात जपले. त्यांची चारही मुले वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत. ६ मुलींपैकी चौघींचे जावई वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. तर फक्त २ नोकरी धारक आहेत. जवळपास ९५ वर्षांचे आयुष्य जगताना त्यांनी स्वतःच्या मुलांची मुलंच नाही तर त्यांच्या मुलांची मुलंसुद्धा पाहिली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व मुला-मुलींसह त्यांच्या मुला-मुलींचे मुले-नातवंडे-पतवंडे सुद्धा त्यांना कधी दादा-नाना न म्हणता मोठ्या प्रेमाने अब्बा च म्हणायचे. या आत्मियतेमागे कुटुंबियातील प्रत्येक लहान मोठ्यांना त्यांनी लावलेला जिव्हाळा होता. परंतु १२ ऑक्टोबर रोजी जिव्हाळा लावणारे हे पितामह सर्वांना पोरके करत जग सोडून गेले.

तरुण मुला-मुलींची लग्न जुळविण्यात नेहमी पुढाकार
स्वतःची चार मुलं आणि सहा मुलींचे लग्न करून देणारे हे पितामह आपल्या भावा बहिणीच्या मुला-मुलींचे लग्न जुळविण्यासह आपल्या गल्लीतील, मित्रपरिवारातील, परिचयातील असलेल्यांच्या तरुण मुला-मुलींचे लग्न जुळविण्यासाठी सुद्धा नेहमी पुढाकार घ्यायचे. फक्त लग्न जोडायचे नाही तर समोरच्याला गरज असल्यास आपल्याकडून शक्य होईल तेवढे सहकार्य सुद्धा करायचे. आणि म्हणायचे, तरुण मुला-मुलींचे लग्न जुळवून दिले तर अल्लाह तआला आणि रसूल (पैगंबर) आपल्यावर प्रसन्न होतात. या धारणेमुळे त्यांनी अनेक जोडपी जुळवून दिली.

धार्मिक कार्यातली अग्रेसरता
नियमितपणे दररोज पाच वेळेची नमाज पठण, रमजान महिन्यामध्ये नियमितपणे रोजे धरणे. या इस्लाम धर्मात फर्ज असलेल्या वैयक्तिक बाबी ते नित्य नेमाने करत असत. याशिवाय ते राहत असलेल्या आसेफ नगर येथील क़ुबा मस्जिद, शहँशाह नगर येथील मेहराज मस्जिद आणि रहेमत नगर येथील रहेमतिया मस्जिद या तिन्ही मशिदी निर्माण करता वेळी त्यांनी तन-मन-धनाने आपल्याकडून शक्य होईल तेवढे कार्य या तिन्ही मशिदीसाठी केले आहे. याशिवाय त्यांच्या समोर कोणीही मस्जिद किंवा कब्रस्तान च्या कार्यासाठी प्रश्न घेऊन आला तर ते आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्यास सदैव तत्पर राहत असत.

नगरसेवक निवडून आणण्यातही मोठा वाटा
ते वैयक्तिकरित्या कधी राजकारणात उतरले नाही किंवा कधी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार या पदांसाठीच्या निवडणुकात कधीही कोणत्याही नेत्याचा किंवा पक्षाचा प्रचार-प्रसार केला नाही. परंतु बीड नगर परिषदेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये आसेफ नगर प्रभागातून पहिल्यांदा आसमा बशीर तांबोळी आणि त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचे सर्वात मोठे जावई असलेले नसिमोद्दिन इनामदार यांच्या मागे आपल्या संपूर्ण खानदानाची ताकत उभी करून या दोघांना नगरसेवक बनविले होते.
अशा या मनमिळावू व तहहयात माणुसकी जपलेल्या व्यक्तिमत्वाला माझ्याकडून या लेखाद्वारे भावपूर्ण, अश्रुपूर्ण मनस्वी श्रद्धांजली आणि अल्लाह कडे दुवा करतो, "अल्लाह उनकी मगफिरत करे और उनके रूह ए पाक को जन्नत मे आलामक़ाम अता करे!
आमीन-सुम्माआमीन!
 🌹🌹🌹
लेखक
एस.एम.युसूफ
आसेफनगर, बीड.
मो.- ९०२१ ०२ ३१२१.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत