सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वे लाईन चे लॉलीपॉप - एस.एम.युसूफ
सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वे लाईन चे लॉलीपॉप-एस.एम.युसूफ
बीड (प्रतिनिधी) - नुकतेच खासदार ताईंनी प्रसिद्धी माध्यमातून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोलापूर-जळगाव या नवीन रेल्वेमार्गासाठीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. हे सर्वेक्षण म्हणजे जनतेला दाखविलेला लॉलीपॉप आहे. असे परखड मत पत्रकार एस. एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून मांडले आहे.
दिलेल्या पत्रकातून मत व्यक्त करताना नमूद केले आहे की, अर्ध शतकापेक्षा जास्त वर्षांपासून खितपत पडलेला परळी-बीड-अहेमदनगर हा रेल्वे मार्ग एवढ्या वर्षात सुरू करून त्यावर रेल्वे धावणं तर सोडा आजपर्यंत ही रेल्वे लाईन सुद्धा शासनाला पुर्ण टाकता आलेली नाही. अन् त्यात आता पुन्हा जिल्ह्याच्या खासदार ताईंनी प्रसिद्धी माध्यमातून कळविले आहे की, नुकतेच सोलापूर-तुळजापूर-बीड- जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण झाले आहे. ही बातमी वाचून हसावं की रडावं ? हेच कळेनासे झाले आहे. कारण स्वातंत्र्यापूर्वीच्या पारतंत्र्यात निजाम राजवटीपासून ते आज पर्यंत च्या लोकशाहीत परळी-बीड-अहेमदनगर हा रेल्वे मार्ग हवा म्हणून बीडकर जनता बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. परंतु जनतेची ही ओरड हवी त्या प्रमाणात शासन-प्रशासन दरबारी पोहोचत नसल्याचे आजपर्यंत वेळोवेळी दिसून आले आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये रेल्वे संघर्ष समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे. बीड मध्ये रेल्वे यावी याकरिता आतापर्यंत अनेकदा आंदोलने झालेली आहेत. दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान मोदींनी परळी-बीड-अहेमदनगर रेल्वेमार्गाची नोंद घेऊन आदेश दिलेले आहे तरी सुद्धा रेल्वे लाईन च्या कामात ना गती आहे, ना आत्मियता. यामुळे ही रेल्वे लाईन कधी पूर्ण होईल ? याबाबत ना शासन, ना प्रशासन ठामपणे सांगायच्या स्थितीत आहे. परळी-बीड-अहेमदनगर हि रेल्वे लाईन कधी पूर्ण होईल ? त्यावरून कधी रेल्वे धावेल ? असे प्रश्न असताना अशा अवस्थेमध्ये आता सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे लॉलीपॉप बीडच्या जनतेला दाखविण्यात आले आहे. याचप्रमाणे पुढे चालून सोलापूर-औरंगाबाद या रेल्वे लाईन चे ही लॉलीपॉप दाखवले जाऊ शकते. मात्र त्याला काय अर्थ आहे ? परळी-बीड-अहेमदनगर हा रेल्वे मार्ग जवळपास पाऊणशे वर्षापासून पूर्णत्वास जाऊ शकला नाही. तेथे अशाप्रकारे नवनवीन रेल्वेमार्गासाठी कागदोपत्री सर्वेक्षण करून लॉलीपॉप दाखविण्यात उपयोग काय ? त्या सर्वेक्षणाला मूर्त रूप कधी येईल ? कोण देईल ? जनतेला त्याचा लाभ कधी होईल ? याबाबत सगळ्या पातळीवर आनंदी-आनंद असल्याने जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आता बीडला रेल्वे खेचून आणण्यासाठी गंभीर होऊन गांभीर्याने कार्य करणे अत्यावश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. खासदार ताई म्हणतात की, रेल्वेमार्ग करिता केंद्राने पैसा दिला आहे. मात्र राज्य शासन पैसा देत नाहीये. यामुळे काम रखडत आहे. असेच चालू राहिले तर मग बीडला रेल्वे कधीच येऊ शकत नाही. कारण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन सरकार चालवू लागले आहेत. यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाचा सोबती असेल ? आणि कोण कोणाचा विरोधक ? हे कोणीही राजकारणी किंवा कोणताही पक्ष सांगू शकत नाही. सत्ताबदल किंवा खांदेपालट झाले की सुरू असलेल्या कामांना गतिरोध निर्माण होत आहे. राजकारणी फक्त कागदी घोडे नाचवून जनतेला भुलवून ठेवत आहे. आत्ताही सोलापूर-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुद्धा जनतेला भुलवून ठेवण्यासाठी दाखविलेला लॉलीपॉप असल्याचे परखड मत पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून मांडले आहे.
पत्रकार , बीड.
संपर्क - 9021 02 3121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा