ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जडलंय मोबाइलचं व्यसन - एस.एम.युसूफ
बीड (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मोबाइलचं व्यसन जडल्याचे नमूद करून पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून चिंता व्यक्त केली आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, १५ जून पासून शाळा प्रत्यक्षात सुरू न करता शासनाने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. ते यासाठी की शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाविना ठेवण्याऐवजी ऑनलाइन का होईना, शिक्षण तरी मिळेल. परंतु पहिल्या तिमाहीतच या ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांवर होणारे साइड इफेक्ट्स मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. तसे शासनाने सर्वे केलेल्या यंत्रणेकडून अहवाल आलेला आहे की, ऑनलाइन शिक्षण जेमतेम ४० टक्के विद्यार्थी घेत आहेत. ६० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. अशा स्थितीत जेव्हा हे शैक्षणिक वर्ष संपत येईल तेव्हा एकूण एक विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कशी घेतली जाईल ? हे माय-बाप शासनच ठरवेल. हा विषय पुढे चालून समोर येणारच आहे. मात्र तूर्तास तरी ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या ४० टक्के विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी हे पालकांच्या मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत तर सधन परिस्थिती असलेल्या पालकांनी पाल्याच्या ऑनलाइन शिक्षणाचा आपल्याला व आपल्या मोबाईलला ताप नको म्हणून आपापल्या पाल्यांना स्वतंत्र मोबाईल घेऊन दिले आहेत. अशाप्रकारे स्वतंत्र मोबाईल मिळालेले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण संपल्यावरही सततपणे मोबाईल हातात ठेवून त्यावर नको ते कुटाणे करत बसल्याचे आढळून येत आहे. थोडक्यात ऑनलाईन शिक्षणाचा अभ्यास कमी आणि इतर वायफळ प्रकार जास्त होत आहेत. अति मोबाईल वापरामुळे आरोग्य स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांबाबत पालकांनी केलेल्या सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांचे त्रास, डोकेदुखी, झोप कमी, निद्रानाश अशा रोगांना निमंत्रण मिळणार आहे. म्हणून आतापर्यंत जसे दारू, गांजा, अफ़ीम, चरस, कोकेन अशा प्रकारच्या व्यसनात गुरफटलेल्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या व्यक्तींना तसेच शाळाबाह्य असलेली निर्धन कुटुंबातील मुले अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झंडू बाम, सोल्युशन, फेविक्विक, खोकल्याच्या औषधी सह इतर अन्य प्रकारचे सेवन करून नशेच्या आहारी जात असल्याने समाजात मोठ्या प्रमाणात व्यसन मुक्ती केंद्रे निर्माण करावी लागली आहेत. पुढे चालून ऑनलाइन शिक्षणामुळे लागलेल्या मोबाईलच्या व्यसनातून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करावे लागतील. असे भाकीत वर्तवून पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून चिंता व्यक्त केली आहे.
एस.एम.युसूफ
पत्रकार तथा शिक्षणमित्र
आसेफनगर, बीड.
संपर्क - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा