Breaking News

शेतकऱ्यांनो, वीजयंत्रणेच्या सुरक्षेसाठी कृषीपंपांचा वापर कॅपॅसिटर बसवूनच करा

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - रब्बीचा हंगाम सुरू झाला की कृषीपंपाचा वापर वाढत जातो. अनेकदा रोहीत्रांसोबतच पाण्याची मोटर जळाल्याच्या तक्रारी वाढत जातात. विजेचा भार नियंत्रित करणारे कॅपॅसीटरचा वापर फार कमी शेतकरी करतात. त्याचबरोबर ॲटोस्विचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परिणामी अचानक विजेचा भार वाढल्याने वीज यंत्रणेसोबतच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाचा वापर योग्य ते  कॅपॅसीटर लावूनच करावा असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषीपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने बहूतांश शेतकऱ्यांनी कृषीपंपाना ॲटोस्विच बसविले आहेत. यामुळे परिसरातील अनेक कृषीपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होणे तसेच पाण्याची मोटर जळण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान होवू नये तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ॲटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

*कॅपॅसिटरची गरज का?*

प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे योग्य दाबाचा वीजपुरवठा होतो. रोहित्र जळाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होते. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी कृषीपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. यामुळे ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत, त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते.  योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळतो. या सर्वांचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कॅपॅसिटर'चा वापर न चुकता करावा.

*ऑटोस्विचचा वापर टाळावा*

राज्यात ४५ लाखांहून अधिक कृषीपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषीपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ॲटोस्विच' लावले असल्याचे दिसून येते. यामुळे वीज येताच कृषीपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ॲटोस्विच' लावू नये तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास त्वरीत काढून टाकावेत असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत