Breaking News

शिक्षकीपेशातला विरोधाभास .....!



          शिक्षकीपेशा बाबत शासनाने अवलंबलेल्या धोरणामुळे शिक्षकांसमोर फार मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजात वावरताना अनेक विद्यमान शिक्षक आपल्या शिक्षकीपेशा व्यतिरिक्त इतर कामे करताना सहज नजरेस पडत आहेत. एकीकडे गलेलठ्ठ वेतन मिळविणाऱ्या शिक्षकांची जमात तर दुसरीकडे विनावेतन किंवा अल्पवेतन असणारे शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही परिस्थिती पाहता शासनाच्या धोरणामुळे शिक्षकीपेशात निर्माण झालेला मोठा विरोधाभास पटकन नजरेत भरत असून वेळीच यावर जर योग्य पावले उचलली गेली नाही तर भावी पिढी समोर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. या सर्व परिस्थितीवर दृष्टिक्षेप टाकून लिहिलेला हा लेख !
                शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देऊन भविष्यातील चांगले नागरिक बनविणारे किमयागार. मी तर शिक्षक या तीन अक्षरी शब्दाची फोडणी अशाप्रकारे करतो शिक्षण, क्षत्रिय, कर्मदाता. अर्थातच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन क्षत्रिय (लढवय्या) बनविणारा कर्मदाता म्हणजेच शिक्षक होय.
         तर अशा या शिक्षकांना शासनकर्ते वेठबिगारी पेक्षा वाईट वागणूक देऊन त्यांच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे. इतर कोणत्याही क्षेत्रात नसतील असे प्रकार शिक्षकांबाबत शासनाने तयार करून ठेवले आहेत. ज्यात कायमविनाअनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व पूर्णतः अनुदानित असे हे चार प्रमुख प्रकार शिक्षकीपेशात शासनाने अवलंबलेले आहे. यामुळे शिक्षकीपेशात फार मोठी तफावत निर्माण झाली आहे.
         कायमविनाअनुदानित शिक्षकांना शासनाकडून कधीही व कोणत्याही प्रकारे वेतन मिळण्याचा हक्कच नाही तर विनाअनुदानित प्रकारातील शिक्षकांना शासनाचे अनुदान कधी मिळेल ? याची वर्षानुवर्षे वाट पहावी लागते तर अंशतः अनुदानित प्रकारातील शिक्षकांना २०, ४०, ६०, ८० नंतर पूर्णतः १००% अनुदानित कधी होणार ? याची वाट पाहत विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. या पद्धतीने कर्तव्य पार पाडत असताना शिक्षकांसमोर अनंत अडचणी उभ्या राहतात. वेतन मिळो अथवा न मिळो खर्च तर प्रत्येक दिवस उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सुरूच असतो. या चक्रामुळे आज-काल च्या युगात शेंबडं पोर सुद्धा जर काही काम करत असेल तर त्याचा मोबदला हवा म्हणून अडून बसतो किंबहुना मोबदला घेतल्याशिवाय ते सुद्धा काम करत नाही. येथे तर वयाची पंचविशी ओलांडल्यानंतर शिक्षकाची पदवी घेऊन नोकरी मिळवू पाहणाऱ्यांना जेव्हा या वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जावे लागते तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकतात. यातून वयाची तिशी गाठेपर्यंत अनेकांची लग्न झालेली असतात तर काहींना एक-दोन मुलंही झालेली असतात. एकाचे दोन किंवा तीन-चार जीव झालेले असतात. अशा अवस्थेमध्ये बहुतेक शिक्षकांना विनावेतन किंवा अल्प वेतनामध्ये आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे.
        या परिस्थितीतून मार्ग काढताना व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा शिक्षकांना शाळेत कर्तव्य पार पाडण्यासह अर्थार्जनासाठी इतर कामे करावी लागत आहेत. सध्या अनेक शिक्षक गवंडी काम, रंगकाम, घरोघरी दूध वाटप करत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर बांधकाम करणाऱ्या मिस्त्री च्या हाताखाली बिगारी कामगार म्हणून तर पडकी घरे-वाडे तोडण्याचे कार्य सुद्धा शिक्षकगण करत असल्याचे दिसून येत आहे.
          जिथे अशिक्षित बांधकाम कामगार किंवा रंगकाम करणारे कामगार सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करताना आढळतात तिथे विनावेतन किंवा अल्पवेतन असलेले  शिक्षक मात्र सकाळच्या सत्रात कर्तव्यावर असताना शाळा सुटल्यावर दुपारनंतर कामावर जातात आणि रात्री चक्क ११ किंवा १२ वाजेपर्यंत सुद्धा काम करत आहेत तसेच शाळेत सकाळच्या सत्रात असो की दुपारच्या सत्रात असो काही शिक्षक पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत कोणत्याही दूध डेअरीचे नसलेले कोरे दुधाचे पाकीट घरोघरी रतीब लावलेल्यांना घरपोहोच करत आहेत. जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह यथायोग्य व्हावा. कामगार म्हणून कार्य करणारे शिक्षक असो की, दूध वाटप करणारे शिक्षक असो ते जर या कामात रुळले ओळखीपाळखी झाल्या तर उसनवारी करून एखादी सेकंड हॅन्ड मोटारसायकल घेऊन ही कामे करत आहेत. जर शिक्षक या कामात नवीन असेल तर असे शिक्षक सायकलवर किंवा पायी जाऊन सुद्धा अशी कामे करत आहेत. अशाप्रकारे शिक्षक जेव्हा दर दिवशी विद्यार्थ्यांना अध्यापन देण्याव्यतिरिक्त अंगमेहनतीची कामे करत असतील तीही पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत तर मग अशा शिक्षकांकडून ते विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देतील याची शाश्वती त्या शिक्षकांसह शासन देऊ शकेल काय ? हा एक कळीचा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे. तसेच जेव्हा असे शिक्षक बुद्धी ऐवजी अंग मेहनतीचे श्रम करून आपला उदरनिर्वाह चालवीत असतील तर त्यांची मानसिकता ही विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याची राहिल काय ? असाही प्रश्न समोर उभा राहत आहे.
याचे उत्तर निश्चितपणे नकारात्मक येईल ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. काम कोणतेही असो त्यातून जर योग्य तो मोबदला मिळत नसेल तर या महागाईच्या युगात अशी कामे करण्यात आता कुणालाही स्वारस्य उरलेलं नाही. याला विनावेतन किंवा अल्पवेतन असलेले शिक्षक सुद्धा अपवाद ठरू शकत नाही. ही विनावेतन व अल्प वेतन असलेल्या शिक्षकांची अवस्था आहे.
         पूर्णतः अनुदानित शिक्षकांची तऱ्हा यापेक्षा एकदम उलट आहे. मोठ्या प्रमाणात भेटत असलेले गलेलठ्ठ वेतन काही शिक्षक आपल्या मुला-बाळांना उच्च विद्याविभूषित करण्याकरिता, जमीन जुमला खरेदी करण्याकरिता किंवा बँक बॅलन्स वाढविण्याकरिता भरपूर पगाराचा सदुपयोग करीत आहे तर काही शिक्षक मात्र या भरपूर वेतनाचा दुरुपयोगही करत असल्याचे समाजात दिसून येते. ज्यात प्रामुख्याने वाम मार्गावर खर्च करणे जसे - दारू, जुगार, मटका किंवा लेखात उल्लेख करू इच्छित नसलेल्या इतर बाबींवर सुद्धा मुक्तहस्ते धनलक्ष्मी उधळीत असल्याचेही दिसून येते. या बाबी फक्त त्या शिक्षकांसाठीच नाही तर शिक्षक अर्थातच गुरु या पेशाला सुद्धा शरमेने मान खाली घालायला लावत आहे. या दोन्ही पातळीवरील शिक्षकांचे अवलोकन केल्यावर असे लक्षात येते की, एकीकडे विनावेतन किंवा अल्पवेतन असलेले शिक्षक प्रपंच चालविण्यासाठी परिस्थितीशी सामना करत दोन हात करत बुद्धी व ज्ञानासह मजूर व कामगार होऊन अंगमेहनतीची कामेही करीत आहे तर दुसरीकडे मात्र पूर्णतः अनुदानित असलेले व शंभर टक्के वेतन उचलणारे शिक्षक (सगळेच नाही बरं का !) मात्र नको त्या ठिकाणी पैशांची उधळपट्टी करीत आहे. शिवाय चोवीस तासांपैकी जेमतेम साडेपाच ते सहा तास कर्तव्य बजावून मिळणारा मोबदला गलेलठ्ठ असल्याकारणाने अनेक शिक्षक पुढारपण करण्याच्या नादी ही लागलेले दिसून येतात. असे पुढारी असलेले शिक्षक भरगच्च वेतन असूनही आपल्या कर्तव्याशी फटकून राहतात व शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये येरझाऱ्या मारण्यात धन्यता मानतात. असे पुढारी असलेले व बनलेले शिक्षक हे शिक्षण क्षेत्राला लागलेली एक कीड असून या शिक्षकांनी चांगले शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या जागा अडवून ठेवल्याने सुद्धा विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणाचे वांदे होत आहेत. दुसरीकडे कायमविनाअनुदानित, विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक मात्र एक-एक पैशासाठी बेजार झालेले समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या दोन्ही प्रकारातील शिक्षकांची अवस्था पाहता हा शिक्षकीपेशातला मोठा विरोधाभास प्रत्यक्षात दिसत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- एस.एम.युसूफ़ (मुक्त पत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत