Breaking News

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ही आता तलवारीने हल्ला ! शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेच्या कार्यालयावरील घटना

 

बीड(एस.एम.न्युज़): शहरातील गुलजार पुरा स्थित तकिया मस्जिद च्या अलीकडे असलेल्या शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेच्या  कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याला अज्ञात माथेफिरू किंवा भुरट्या चोराने ६ जून च्या मध्यरात्री ००.२३ वाजे दरम्यान लांबलचक नंग्या तलवारीने तोडफोड केली. या घटनेबाबत संस्थेचे अध्यक्ष आय.एम. काजी यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे ७ जून रोजी सकाळी निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे.

    सदरील घटनेबाबत संस्थेचे अध्यक्ष आय.एम.काजी यांनी शहर पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे कार्यालय लॉक डाऊन काळात गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण वेळ बंद ठेवण्यात आले होते. मात्र नुकतेच जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार ७ जून पासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लॉक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात येऊन सर्व शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय आणि सर्व उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात आली. यामुळे ७ जून रोजी सकाळी १०.०० वाजता शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेचे कार्यालय उघडण्यासाठी आय.एम.काजी आले असता त्यांना कार्यालयाबाहेर लावलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटलेल्या अवस्थेत दिसून आला. कार्यालय उघडून त्यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज बघितले असता जूनच्या मध्यरात्री ००.२३ मिनिटांनी अज्ञात इसम कॅमेरा फोडत असल्याचे दिसून आले. तोडफोड करणाऱ्या या इसमाच्या हातात भलीमोठी तलवार होती. हा प्रसंग तोडफोड होण्याअगोदर कॅमेऱ्याने कैद केला आहे. सदरील कार्यालय हे शासनमान्यता प्राप्त असून गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी आहे. तरी अशाप्रकारे मध्यरात्री भलीमोठी तलवार हातात घेऊन रस्त्यावर येत तोडफोड करणारा माथेफिरू किंवा भुरट्या चोर कोण आहे ? त्याने ही तोडफोड का केली ? या प्रश्नांचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. तसेच अशा माथेफिरु कडून समाजाच्या जीवितास धोका असून सदरील तलवारधारी तरुण किंवा इसमाला सहज न घेता पोलिस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास करून गजाआड करावे आणि योग्य ते शासन करावे. असे शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेचे अध्यक्ष आय.एम. काजी यांनी पोलीस विभागाला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत