आमदार साहेब, जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान वर ही मेहेरनजर टाका! कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांचे आ.संदीप क्षीरसागरांना साकडे
बीड (प्रतिनिधी) - शहरातील वीरशैव लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमी कंपाउंड वालचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त करून मुक्त पत्रकार तथा जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान चे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी जमाअत ए महेदवीया दायरा कब्रस्तान वर ही मेहेरनजर टाका आणि कब्रस्तान ची दुरावस्था दुर करा. असे साकडे विद्यमान आ. संदीप क्षीरसागर यांना प्रसिद्धी पत्रकातून घातले आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील मोमीनपुरा भागात असलेले ४५० वर्षांपूर्वीचे महेदवीया जमाअतचे ऐतिहासिक कब्रस्तान आहे. परंतु काही वर्षांपासून कब्रस्तान च्या ऐतिहासिक भिंती मोडकळीस आल्याने याचा फायदा घेत काही लोक भिंतीचे घडीव दगड काढून नेत असल्याने पश्चिम बाजूची भिंत अर्धी गायब झाली असून उत्तर बाजूची भिंत जवळपास जमीनदोस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. कब्रस्तान च्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही भिंती नव्याने बांधणे गरजेचे आहे.
तसेच काही वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेने मोमीनपुरा-ढगे कॉलनी बायपास रोड बनविताना महेदवीया कब्रस्तान ची विहीर बुजवून टाकली. कब्रस्तान मध्ये मयत दफन करण्यासाठी तसेच ज़ियारत साठी येणाऱ्यांकरिता लागणाऱ्या पाण्यासाठी ही विहीर पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे.
तसेच कब्रस्तानची मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या सहन जागेवर संरक्षक भिंत बांधणे ही आवश्यक आहे. मात्र कब्रस्तान च्या या जागेचे बीड नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या नावावर पी.टी.आर. बनवून घेतले. याविषयी कब्रस्तान कमिटीचे नगरपरिषदे सोबत वाद सुरू असतानाच एका तोतया इनामदाराने ही जागा त्याची असल्याचे म्हणत बीड नगर परिषदेवर न्यायालयात दावा दाखल केला. ही बाब कब्रस्तान कमिटीला कळाल्यावर या दाव्यामध्ये तिसरा पक्ष म्हणून कमिटी उतरली. आजमितीला हे प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे.
तरी सुद्धा नगरपरिषदेने ती जागा एका समाजाच्या शादी खाण्यासाठी दिली. हे प्रकरण कमिटीने हाणून पाडले असता काही वर्षांनंतर पुन्हा बीड नगर परिषदेने एका तोतया व्यापाऱ्याला ९९ वर्षांच्या करारासह भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर करून अशा मार्गाने कब्रस्तान ची जमीन राजकीय लागेबांधे असलेल्याच्या घशात घालण्याचे नियोजन केले होते. तेही कमिटीने हाणून पाडले.
नंतर पुन्हा काही वर्षांनी मोमीनपुरा प्रभागातील एका विद्यमान नगरसेवकाने तेथील काही लोकांना हाताशी धरून महेदवीया कब्रस्तान समोर असलेल्या दुसऱ्या एका कब्रस्तान साठी नमाज ए जनाजा पठण करण्याच्या नावावर पुन्हा एकदा ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. तोही कमिटीने हाणून पाडला.
या सर्व बाबींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कब्रस्तान ची दुरावस्था दूर करणे आवश्यक असताना सुद्धा बीड नगर परिषदेसह नगराध्यक्ष आणि आतापर्यंत मतदार संघातून निवडून आलेल्या आमदारांनी महेदवीया दायरा कब्रस्तान कडे साफ दुर्लक्ष केल्याने कब्रस्तान ची अवस्था अत्यंत दयनीय व शोचनीय झालेली आहे. आता विद्यमान आमदारांनी तरी जसा वीरशैव लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमी कंपाउंड वालचा प्रश्न मार्गी लावला तसा सहानुभूतीपूर्वक विचार करून महेदवीया दायरा कब्रस्तान चा प्रश्न हातात घेऊन मार्गी लावावा आणि कब्रस्तान ची दुरावस्था दूर करावी. असे साकडे मुक्त पत्रकार तथा महेदवीया दायरा कब्रस्तान चे कार्याध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून घातले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा